एका गरीब नम्र शेतकऱ्याची इच्छापूर्ती केल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे अभिनंदन. ‘गरीब नम्र शेतकऱ्या’ला काही जण माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा म्हणूनही ओळखतात आणि त्यांच्या विलासी इच्छांवर टीकाही करतात. पण हीदेखील पूर्वापार परंपरा- अगदी समाजवादी चळवळीतील साथी आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यापासून अनेकांनी अशी टीका केलेली आहे. पण देवेगौडांचेही कौतुकच; कारण टीका आणि निंदा कितीही झाली, तरीदेखील आत्मसंयमी प्रतिष्ठा राखणे, ही भारताच्या सर्वोत्कृष्ट परंपरेची शिकवण. ती सर्वोत्कृष्ट परंपरा देवेगौडांनी पाळली. तीसुद्धा आपल्या श्रद्धांना अंतर न देता पाळली. कुणी म्हणेल, देवेगौडा तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष, मग ते कसली श्रद्धा जपणार? श्रद्धासुद्धा धर्मनिरपेक्ष असू शकतात, हे या लोकांना माहीत नसावे. आता कर्नाटक सरकारने- म्हणजे मुख्यमंत्री येडियुरप्पांनी- राज्यसभा सदस्य झाल्याबद्दल देवेगौडांना दिलेल्या आलिशान ‘व्होल्व्हो एक्ससी- सिक्स्टी’ मोटारीचा क्रमांक हे टीकाकार पाहतील तेव्हा कळेल, ‘नऊ’ हा आकडा लाभकारक असल्याची श्रद्धा देवेगौडांनी ‘३६३६’ या क्रमांकातून कशी जपली ते! वय झाल्याने आपल्याला जरा अधिक चांगली गाडी द्यावी, ही देवेगौडांची इच्छा. ती येडियुरप्पांनी जाणली आणि स्वत:च्या ‘टोयोटा फॉच्र्युनर’पेक्षा अधिक मौल्यवान, किमान ६० लाख रुपयांची ही व्होल्व्हो देवेगौडांना दिली. तीही ‘३६३६’ क्रमांकाची. कुणाला यात केवळ ‘३६चा आकडा’ दिसेल, पण देवेगौडा यांचे पुत्र एच. डी. कुमारस्वामी यांना रिसॉर्टनीतीने सत्ताच्युत करून मुख्यमंत्री झालेल्या येडियुरप्पांनी पक्षनिरपेक्ष मैत्री काय असते, हे देवेगौडांची इच्छापूर्ती करून दाखवून दिले. या आकडय़ांची बेरीज ‘नऊ’च येते, हे काय सांगायला हवे? कर्नाटकात खासदाराला राज्य सरकारकडून वाहन उपलब्ध करून दिले जाते. देवेगौडा नव्याने खासदार म्हणून निवडून आल्याने त्यांना सरकारी खर्चाने गाडी आलीच. खासदारांच्या गाडीची २२ लाख रु. ही मर्यादा येडियुरप्पांनी जरा शिथिल केली, इतकेच. देवेगौडा हे कर्नाटकातील एकमेव पंतप्रधानपदावर पोहोचलेले. यामुळे कर्नाटकच्या या पुत्रासाठी राज्यातील भाजप सरकारने नियमाला अपवाद के ला. येडियुरप्पा यांनी देवेगौडा यांच्या साऱ्या मागण्या तत्परतेने मान्य करणे हे ज्येष्ठांची निरपेक्षता दाखवून देणारे. येडियुरप्पा यांनी आता भाजपच्या संकेतानुसार ७५ वयोमानही पार के ले आहे. यानंतर पदावर राहू नये, या संकेताचा प्रयोग उद्या आपल्यावर झाल्यास धर्मनिरपेक्ष श्रद्धा जपणारे पक्षनिरपेक्ष मित्रच येडियुरप्पांचे मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी उपयोगी पडतील!