च्या मारी हे विद्यापीठ आहे की धोकापीठ राव! कसला घोळ घालताय रोज रोज. आधी परीक्षा घ्यायची की नाही यावर वादाचे मजले चढवले. कधी होणार तर कधी नाही होणार अशा बातम्या पेप्रात वाचून भेजा फ्राय झालेला. रोज वेगवेगळी माहिती समोर यायची म्हणून आमच्या कंजूष पिताश्रीला विनवणी करून तीन चार पेपर घरी लावून घेतले. आता एकदाची तुम्ही घ्यायची व आम्ही द्यायची असे ठरल्यावर खराब झालेला ‘दिमाग’ शांत होईल असे वाटले असताना पुन्हा रद्दचा घोळ सुरू केलाय राव! एवढे धोके तर आम्हाला प्रेमातही कधी भेटले नाही, जेवढे तुम्ही आम्हा फायनलच्या पोरांना देत आहात. काय तर म्हणे सव्‍‌र्हर खराब झाले! आमच्या कॉलेजात हे घडले असते ना तर राडा करून एखाद्या सरांनाच वर पाठवले असते, दुरुस्तीला!हे कसले नवे तंत्रज्ञान.. पोरं किती? सव्‍‌र्हरची क्षमता किती? हे साधे प्रश्न या विद्यापीठाला सोडवता येत नाही? आणि आम्ही राडा करायला गेलो की लगेच पोलिसांना बोलावता? गुन्हे दाखल करायला सांगता. तुम्ही तंत्रज्ञानाचा पुरस्कार करायला सुरुवात केली म्हणून आम्ही कॉपी करणे सोडून दिले. पेपर फोडण्याची प्राचीन कला टाकून दिली. डिजिटल घुसखोरी करून पेपर फोडता येईल असा सल्ला आम्हाला काही टोळभैरवांनी दिला पण त्याकडेही आम्ही दुर्लक्ष केले. घरूनच पेपर द्यायचा ना, मग कशाला डोक्याला शॉट लावून घ्यायचा असा साळसूद विचार आम्ही केला. आम्ही एवढे संयमी झालो तरी तुमचा घोळ सुरूच. आमची ऑनलाइन परीक्षा घेण्याआधी एकदा विद्यापीठातल्या कर्मचाऱ्यांचीच घ्या. तेवढाच साऱ्यांच्या बुद्धीचा सराव होईल व अडचणी काय त्याही समजतील. साधा सव्‍‌र्हर सांभाळता येत नाही तुम्हाला! अरे आमच्याकडे बघा, कशा ‘जीएफ’ सांभाळतो आम्ही.. या तुमच्या परीक्षेच्या नादापायी कुणाला भेटता येत नाही सध्या. तारखावर तारखा देणे सुरू आहे तिकडे. इकडे घरचे बाहेर पडू द्यायला तयार नाहीत. अभ्यास तरी किती करायचा. वारंवार तेच तेच वाचून, घोकून आता मेंदूचा पार भुगा झाला! आमचे सगळे राईट फाईट असते. पटले तर टेक नाही तर रामटेक. त्यामुळे धोके खाण्याची ‘आदत’च नाही आम्हाला. आणि तुम्ही वरचेवर उल्लू बनवत चालले आम्हाला! आमच्या मेंदूची एवढी ‘मजाक’ कधी कुणी केली नाही. विद्यापीठ चालवता की झोलबा पाटलाचा वाडा? काही समजायला मार्ग नाही राव! आम्ही तर ऑफलाइन परीक्षा द्यायला तयार होतो. करोनाच्या नावावर तुम्हीच आमच्या वतीने आम्हाला न विचारता ऑनलाइनचा बागुलबुवा तयार केला. आता तोही तुम्हाला धड निस्तारता येत नाही. परीक्षा आज होणार, उद्या होणार म्हणून आम्ही आजवर कितीतरी ‘डेटापॅक’ घेतले. त्यावर ‘बूस्टर पॅक’ सुद्धा घेतले. सारा डेटा ‘फालतू’ कामात संपून गेला. दुसरीकडे खर्चात वाढ झाली ती वेगळीच. इकडे थ्रीजी-फोरजी मिळवण्यासाठी आमची मारामार सुरू असताना तुम्ही सव्‍‌र्हरवर कसा विश्वास ठेवता? परीक्षेचा फार्म भरताना पैसे तर मोजून घेतले आमच्याकडून. मग चांगली व्यवस्था करायला काय जाते? या परीक्षेच्या नादात वर्ष वाया चालले आमचे. जीएफला दिलेली आश्वासने वारंवार पुढे ढकलावी लागत आहेत. कुणाचाच कुणावर भरवसा राहिला नाही. सुटाबुटातल्या कुलगुरूंनो जरा आमच्या मन:स्थितीचा विचार करा. तरुणाचा मेंदू म्हणजे काय नवरगोल वाटला की काय तुम्हाला? जरा भानावर या व करा एकदाचे यातून आम्हाला मोकळे. तुम्ही बी खुश अन् आम्ही बी!