बरे झाले, वन खात्याला एकदाची ओळख मिळाली. हे खाते तसेही आदर्श ओळखीसाठी धडपडत होतेच. काही वर्षांपूर्वी विदर्भातल्या भाऊंनी कोटय़वधी वृक्षलागवडीचा बार उडवून देत ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण त्यात अस्मितेचा अभाव होता. विदर्भातल्याच नव्या भाऊंनी ते बरोबर ओळखले. कारण ते पडले सेनेचे. या पक्षाचा अस्मितेशी संबंध अधिक. म्हणून मग या भाऊंनी चक्क झेंडाच समोर आणला. आता या खात्याच्या अपयशाचे सारे मुद्दे बाजूला पडलेच म्हणून समजा! उगीच उन्हातान्हात, पावसात खपून झाडे लावायची, त्याची मोजदाद ठेवायची, वरून ती जगली नाहीत तर टीका सोसायची, भ्रष्टाचाराचे आरोप सहन करायचे. त्यापेक्षा हा झेंडा बरा. एकदा हातात घेतला की झाले. आपसूकच न केलेल्या कामाचे समाधान मिळते. त्यातून येणारी स्फूर्ती वेगळीच. आता या झेंडय़ाचा प्रसार सर्वदूर कसा करायचा, त्यातल्या त्यात जंगलातल्या प्राण्यांना त्याची ओळख कशी पटवून द्यायची हा प्रश्न आहेच म्हणा! पण तो सोडवण्यासाठी खात्याचे अधिकारी तत्पर आहेत की! तसेही या अधिकाऱ्यांना जंगलातले सारे प्रश्न पंचतारांकित हॉटेलात बसून सोडवण्याची सवय आहेच. आता तिथेच उच्चस्तरीय चर्चासत्रे घेऊन प्राण्यांनी झेंडा कसा ओळखावा यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुचवल्या जातील. झेंडय़ात असलेला लाल आणि हिरवा रंग बघून वाघ व तत्सम प्राण्यांच्या हालचाली कशा असतील यावर शास्त्रीय तर्क काढले जातील. कोणत्या प्राण्याला कोणत्या रंगाचे वावडे आहे हे लक्षात घेऊन झेंडय़ाची वाहनावरची दिशा कशी असेल हे ठरवले जाईल. हा झेंडा जंगलात घेऊन फिरताना झाडावर त्याचा होणारा जीवशास्त्रीय परिणाम कसा असेल, यावर एखादे चकचकीत पीपीटी सादरीकरण केले जाईल. त्यामुळे आता या खात्याच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनी अजिबात चिंता करण्याचे काही कारण नाही. झेंडय़ामुळे या खात्याचे कामकाज अधिक वेगवान होईल यात शंका नाही. आता तुम्ही म्हणाल की गेल्या सात दशकांत जंगल झपाटय़ाने कमी झाले, वाघ मारले गेले. या अपयशातून बाहेर पडण्यासाठीच तर हा झेंडा आहे. या झेंडय़ातून निघणाऱ्या तरंगलहरी वाघ व जंगलाचे रक्षण करणाऱ्या असतील. त्यामुळे तो लावून साधा फेरफटका मारला तरी अनेक न सुटलेले प्रश्न सुटून जातील. कारण अभिमान बाळगावा असे अस्त्र हाती असेल. हा युक्तिवादही तुम्हाला पटणारा नसेल तर एक गोष्ट सांगतो. एक माणूस होता. त्याने समाजाला भरपूर त्रास दिला. त्यामुळे सारेच त्याला वाईट म्हणायचे. तो मृत्युपंथाला टेकल्यावर मुलाला म्हणाला, लोकांनी मला चांगले म्हणावे यासाठी मी खूप प्रयत्न केले पण यश आले नाही. आता माझ्या मृत्यूनंतर तू काहीतरी कर, ज्यामुळे लोक मला चांगले म्हणतील. वडील गेल्यावर मुलाने रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर दगड फेकायला सुरुवात केली. लगेच लोक म्हणू लागले, याच्यापेक्षा तर याचा बाप चांगला होता. बापाचे वाईटपण झाकण्यासाठी मुलगा आणखी वाईट झाला असे या गोष्टीचे सार. आता तुम्ही म्हणाल याचा वन खात्याशी काय संबंध? तर संबंध आहे. गोष्ट प्राचीन काळातील असल्याने मुलाने दगड हाती घेतला. आता आधुनिक काळ असल्याने झेंडा! अपयश लपवले जावेच पण ते विसरून लोकांनी चांगले म्हणावे यासाठी एखाद्याने झेंडा हाती घेतला तर काय वाईट? झेंडा कोणताही असो त्याला सलाम करण्याची सवय आपल्याला जडली आहेच ना!