जेव्हा बिहारमध्ये पूर आला तेव्हा मोदी कुठे होते? त्या एक लाख २५ हजार कोटींच्या पॅकेजचे काय झाले? हेच फडणवीस दुसऱ्या राज्यात असे बोलतील का? यासारखे फालतू प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत, हे लक्षात ठेवा. सत्ताधाऱ्यांच्या वतीने देवेंद्रभाऊंनी एकदा सांगितले ना! ‘मोदींचे बिहारवर सर्वाधिक प्रेम आहे’ म्हणून? मग बस्स. विषय संपला. सत्ताधाऱ्यांनी सांगितले तेच सत्य असाच सध्याचा काळ आहे हे समजून घ्या. राजकारणी कधीच कुणावर प्रेम करत नाहीत. त्यांना येणाऱ्या प्रेमाचा उमाळा हा सोयीच्या राजकारणाचा एक भाग असतो, असा विचार तर अजिबात करायचा नाही. आजचे सत्ताधारी अस्सल भारतीय आहेत. त्यामुळे त्यांचे प्रेमही अस्सलच असते. ते किंवा त्यांच्या वतीने कुणीही या प्रेमाची कबुली दिली की ते अंतिम सत्य समजायचे. अशी कबुली देणाऱ्याच्या मागे अजिबात लागायचे नाही. त्यांना ट्रोल तर करायचेच नाही. भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोदींचे प्रेम राज्यावर नव्हते का? असले प्रश्न तर अजिबात उपस्थित करायचे नाहीत. राज्याराज्यातल्या उभरत्या नेत्यांमध्ये मोदींचे सर्वाधिक प्रेम ज्यांच्यावर आहे त्याच भाऊंनी हे उद्गार काढले आहेत हे ध्यानात ठेवून यामागचा कार्यकारणभाव लक्षात घ्या. आता काही म्हणतील की निवडणूक आहे म्हणून असा प्रेमळ प्रचार सुरू केलाय. हे अजिबात सत्य नाही. निवडणूक काय आज आहे उद्या नाही, पण मोदींचे बिहारवरचे प्रेम कायम राहाणारे आहे. संकटाच्या वेळी धावून गेले, विशेष आर्थिक मदत दिली म्हणजेच प्रेम सिद्ध होते असे मानणाऱ्यांपैकी मोदी नाहीत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी या राज्यासाठी काय काय दिले हे जेव्हा ते सांगतील तेव्हाच अनेकांना या प्रेमाचा साक्षात्कार होईल. तेव्हा या वक्तव्याची खिल्ली न उडवता काही काळ वाट बघा. उद्या हीच संधी बंगालला मिळणार आहे. मोदींचे प्रेम हे विशाल व व्यापक स्वरूपाचे आहे. ते काळानुरूप प्रत्येकाला मिळत राहते. त्यामुळे यामागचा भावार्थ तेवढा लक्षात घ्या. मोदींचे प्रेम बिहारवर नाही तर ‘बिमारू’वर आहे. त्यामुळेच त्यांचे भक्त जास्त आहेत असले अचकटविचकट विनोद अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. प्रेम ही प्राचीन व वैश्विक संकल्पना आहे. परिवाराची नाळ प्राचीन युगाशी जोडली गेली असल्याने मोदींचे प्रेम हा समस्त राष्ट्रासाठी अभिमानाचा विषय ठरावा असाच आहे. तरीही समजले नसेल तर एक कथा सांगतो. ती ऐका. कृष्णाच्या आवडत्या राण्या दोनच. एक रुक्मिणी तर दुसरी सत्यभामा. रुक्मिणी समंजस, शांत, संयमी तर सत्यभामा आक्रस्ताळी व हक्कासाठी भांडणारी. एकदा कृष्णाने स्वर्गातून पारिजातकाचे झाड आणले. ते लावायचे कुठे, असा प्रश्न त्याला पडला. दोन्ही राण्या नाराज व्हायला नको अशी त्याला चिंता. अखेर कृष्ण झाड लावतो सत्यभामेच्या अंगणात, पण त्याची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडतील अशा रीतीने. तात्पर्य काय तर प्रेमाला चातुर्याची जोड दिली की साऱ्यांना खूश करता येते. आमच्या नेत्यामध्ये हे चातुर्य आहेच की! त्यामुळे आज जरी तुम्ही या प्रेमाला नावे ठेवत असाल तरी मोदीजी चातुर्याच्या बळावर बिहारच काय सर्व देशभरात पारिजातकरूपी प्रेमफुलांचा वर्षांव करतीलच. आपले देवेंद्रभाऊ तर याच पारिजातकाला पक्षाच्या वतीने खतपाणी घालत आहेत!