07 July 2020

News Flash

मनात पांडुरंग हवा..

मन मोठं विचित्र असतं. कधी ही बाजू बरोबर म्हणतं, तर कधी ती. पण देव असतो की नाही, असले प्रश्न नास्तिक माणसंच विचारतात.

संग्रहित छायाचित्र

 

पावसाच्या सरी बरसू लागल्याहेत. मृद्गंधाच्या आनंदाला कसा येईल म्लानपणा? पेरणी झाली की वारी. ‘बा-विठ्ठला पुढेच सारे तुझ्या हाती’ असं म्हणायचं आणि वारीला निघायचं. माऊलीच्या गजरात माऊली होऊन जायचं. सज्जनपणाला घट्ट मिठी मारणं म्हणजेच माळकरी होणं. संत शिकवणीत पांडुरंग म्हणजे जगण्याची ऊर्मी, भविष्याच्या चिंतेचा पूर्णविराम. म्हणूनच त्याला भेटायला जाण्याचा सोहळा. पण त्यावर गदा आली. देवाला भेटायचे नाही, कारण ‘करोनाराक्षसा’ची शक्ती वाढेल. देवाला भेटणे हे निमित्त. उराउरी एकमेकांना भेटणे हे खरे कारण. आता तेच वारीत नसेल तर, पालख्या विमानाने नेल्या काय किंवा हेलिकॉप्टरने. पण हे सारं निर्णय घेणाऱ्यांना कसं कळणार? पण देव असतो का हो मंदिरात?

मन मोठं विचित्र असतं. कधी ही बाजू बरोबर म्हणतं, तर कधी ती. पण देव असतो की नाही, असले प्रश्न नास्तिक माणसंच विचारतात. देवच नसता, तर एवढी मंदिरे उभी केली असती का आपण? (त्यातील सोन्या-नाण्याचे विचाराल तर खबरदार.. विचारणाऱ्यांचा ‘पृथ्वीराज चव्हाण’ करतील ट्रोलभरव) काय केलं नाही आपण मंदिरासाठी. ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणत राजकारणाच्या दोन-चार पिढय़ा गेल्या. त्यामुळे असले प्रश्न निर्थक असतात. पण मग तुकाराम महाराज म्हणतात, ‘तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ त्याचे काय? सज्जन माणसांमध्ये देव असेल तर मैलोन् मैल फिरणे किती योग्य? (तुम्ही श्रमिक असाल आणि पायी चालत असाल तर लक्ष देणारच नाही, असे गेल्या काही आठवडय़ांत ठरले आहे.) आता सज्जन कोण, हा प्रश्न तुम्ही विचारू शकता? आताशा काय झालं वारीत हौशे- गवशे- नवशेही घुसतात. कपाळी टिळा लावला की झालो वारकरी असं समजतात. लगेच ‘स्वप्रतिमा’ पोस्टीतात फेसबुक किंवा इन्स्टावर. मध्येच एखादा सरकारी योजनेवालाही येतो, त्याची टिमकी वाजवतो. अर्थात सरकार कितीही भलेपणाचं सांगो, आपण ऐकतोच असं काही नाही. आता घरात बसा म्हटल्यावर, ‘कांदा मुळा भाजी..’ कसा आपल्या सर्वाचा जगण्या- मरण्याचा प्रश्न झाला की नाही? दिवेघाटातील फोटो छापून येतात म्हणून कार घेऊन अर्धा किलोमीटपर्यंत फिरून वारी केली अशी फुशारकी मिरवणारेही असतातच की. पण तसं म्हणायचं नसतं. एकदा टाळमृदंगाचा गजर ऐकला तरी सज्जनपणाचा साज चढविता येतो. पण सारे तसे नसतात. व्हिज्युअल मीडियासाठी तर वारीचा ‘इव्हेंट’च. पांढऱ्या शुभ्र कपडय़ातील टाळकरी टुणकन उडी मारतात किंवा रिंगण सोहळा होतो तेव्हा घोडा फिरताना पाहण्यासाठी होणारी गर्दी आणि त्या गर्दीला पकडण्यासाठी येणाऱ्या चॅनलच्या ‘ओबी व्हॅन’वाल्यांना इव्हेंट नसल्याचं दु:ख असू शकेल. संतांच्या पादुका पांडुरंगाचरणी विमानाने नेल्यामुळे वारी होते, असं समजण्याइतपत भागवत संप्रदाय कोत्या मनाचा नाही. वारी म्हणजे सज्जन माणसांच्या उराउरी भेटीचा सोहळा. आता न भेटण्यातच भले असेल तर वारी घराच्या घरी करू ‘विलगीकरणा’मध्ये. मनात पांडुरंग हवा. त्या काळ्यासावळ्या मूर्तीसमोर हात जोडणं मन:शांतीसाठी रास्तअसेल तर पंढरपुरी जाण्यात कोणाला रस असेल? असंही आता सरकारलाही प्रबोधनकारांची अधून-मधून आठवण येत असतेच की..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 12:00 am

Web Title: loksatta ulta chashma article abn 97 5
Next Stories
1 मुखपट्टय़ांची जगरहाटी
2 टोळधाडीची नवी रूपे..
3 प्रश्न विचारणाऱ्यांची गोष्ट..
Just Now!
X