27 November 2020

News Flash

मुसळ-नीती

गेल्या दोन दिवसापासून देशभरातून येणारे अभिनंदनाचे फोन स्वीकारूनसुद्धा उत्तरप्रदेशचे पक्षप्रमुख अजिबात थकले नव्हते.

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या दोन दिवसापासून देशभरातून येणारे अभिनंदनाचे फोन स्वीकारूनसुद्धा उत्तरप्रदेशचे पक्षप्रमुख अजिबात थकले नव्हते. भ्रमणध्वनीवर आलेल्या लाखो संदेशांना प्रतिसाद देता देता त्यांच्या हाताची बोटे दुखू लागली, तरीही जोश कायम होता. दहा कोटी कार्यकर्त्यांना व त्यांच्या माध्यमातून १३० कोटी जनतेला पक्षाशी बांधून ठेवणारा धागा आपल्याला सापडला याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. केवळ नावात ‘स्वतंत्र’ असले म्हणून काय झाले, आपण स्वतंत्रपणे विचारही करू शकतो याचा अभिमान त्यांना वाटू लागला होता. खरे तर बलियाचा तो कार्यक्रम छोटासा होता. पक्षाच्या दिल्ली मुख्यालयात नुकत्याच झालेल्या एका प्रशिक्षणादरम्यान कुठेसे ऐकलेले काहीअचानक त्यांच्या ओठावर आले आणि ते सहज बोलून गेले, नेत्यांनी ‘चीन व पाकिस्तानशी युद्धाच्या तारखा ठरवल्यात’ म्हणून!’ या वक्तव्याची चित्रफीत बाहेर आल्यानंतर ते थोडे धास्तावले होते. दिल्लीतील नेतृत्व खरडपट्टी काढेल की काय अशी भीती त्यांना वाटू लागली होती. त्यात भर पडली ती राजनाथांनी केलेल्या ‘चीनशी चर्चेतून मार्ग काढू’ या मिळमिळीत वक्तव्याची. पण वरिष्ठांकडून कुठलाही नाराजीचा सूर उमटला नाही. उलट चार्लीकडून समर्थन दर्शवणारा ‘अंगठा’ लगेच भ्रमणध्वनीवर उमटला तेव्हा त्यांना हायसे वाटले. आता प्रशिक्षणादरम्यान सांगितल्याप्रमाणे ‘मी तसे बोललो नाही, मला तसे म्हणायचे नव्हते. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला’ अशा वाक्यांची उजळणी त्यांनी सुरू केली. ही वाक्ये चपखल ठरावी यासाठी आपल्या वक्तव्यात कुठे फट सापडते का, याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी ती चित्रफीत पुन:पुन्हा पाहिली. ती सापडल्यावर समाधानाचा सुस्कारा सोडत ते उठले. आरशात बघितले तर आताशा त्यांची दाढी नेत्यासारखीच दिसू लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. स्मितहास्य करत त्यांनी ती थोडी आणखी वाढवण्याचा निर्णय मनाशी घेतला. रस्ते, पाणी, घर, वीज, रोजगार, उद्योग यासारख्या फालतू गोष्टींनी वारंवार निवडणुका जिंकता येत नाही. कुणीही सत्तेत आले तरी या मुद्दय़ावरून जनतेचे समाधान करू शकत नाही. त्यापेक्षा उन्मादी मुद्देच उपयुक्त ठरतात. गेल्या सहा वर्षांत बऱ्यापैकी यश आले. आता मतांचे आणखी ध्रुवीकरण हवे असेल तर युद्धाची भाषाच योग्य. ती एकदा सुरू केली की लोक सारे प्रश्न विसरतात. सीमेवर जाऊन लढण्यास तयार नसलेल्या पण लढण्याची खुमखुमी बाळगणाऱ्या सामान्यांत जोश जागवण्यासाठी एवढे पुरसे असते. मग आपसूक सगळे प्रश्न मागे पडतात व निवडणुकांमध्ये सहज विजय मिळवता येतो. तसेही विजयासाठी वाटेल ते, हे पक्षाचे सूत्र आहेच की!  या एका वक्तव्यामुळे आपण नेत्याच्या ‘गुडबुक’ मध्ये शिरलो तर भविष्यात फायदाच आहे. कदाचित राज्याचे प्रमुखपदसुद्धा मिळू शकेल, या विचाराने त्यांचे डोळे चमकले. तरीही एक शंका त्यांच्या मनात होतीच. भाषणात आपण युद्धातील विजयासाठी वाटेल ते असे सांगताना कृष्णाचा संदर्भ दिला. प्रत्यक्षात यादवांत जेव्हा यादवी माजली तेव्हा त्यांनी मुसळाने एकमेकांना संपवले. शत्रूला संपवण्याच्या नादात पक्षातच तसे काही झाले तर.. असा विचार येताच त्यांना ‘देव’ आठवले. पटकन ते माजघरात गेले, तर घराण्याची प्राचीन ओळखम्हणून एक मुसळ ठेवलेले त्यांना दिसले. त्याला ताबडतोब नष्ट करा, असा आदेश त्यांनी सहकाऱ्यांना दिला.

ते बाहेर आले तेव्हा त्यांचे स्पष्टीकरण ऐकण्यासाठी दांडकेधारी जमलेच होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 12:00 am

Web Title: loksatta ulta chashma article abn 97 50
Next Stories
1 साडीचा ‘सेल’ साथ सोडेना..
2 न बसलेला धक्का  
3 दु:खपर्यटनतंत्र!
Just Now!
X