राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलजबावणी कशी करावी, त्यादृष्टीने सध्याच्या रचनेत काय बदल करावे लागतील याबाबतची रूपरेखा ठरवण्यासाठी संशोधक, कुलगुरू, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, उद्योजक अशा बडय़ा तज्ज्ञांची समिती सरकारने नेमली, तीही ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली! आता नव्या पिढीच्या मनीचे धुमारे या ज्येष्ठांना कसे कळणार, असा प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री आणि ‘परीक्षा रद्द करा’ असा सूर गडावरून उमटताक्षणी त्या रद्द करण्यासाठी सरसावलेले निष्ठावंत उदय सामंत यांना पडला. पण पुन्हा खासे युवराज आदित्यराजे हेच मदतीला धावून आले असून माशेलकर आदी जुन्यांना नवे वळण कसे घ्यायचे याचा कानमंत्र देणार आहेत. नतद्रष्ट माध्यमांनी ज्येष्ठांना कनिष्ठांचे धडे असा सूर लावणाऱ्या बातम्याही दिल्या. त्यावरच थांबले नाहीत तर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील बैठकीत पर्यावरणमंत्र्यांना रस का असा मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है छाप प्रश्नही उपस्थित केला. हे कळल्याबरोबर विरोधकांच्या कुजबुज आघाडीने नेहमीप्रमाणे मोहीम सुरू केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा करोनाचा इतका दांडगा अभ्यास की, ते जागतिक आरोग्य संघटनेला म्हणजेच जगालाच करोना नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करू शकतात, असे खुद्द संपादक- खासदारांनीच जाहीर केले होते. मग पुत्र तरी का मागे राहणार, युवराजांचा पहिला धडा आता परीक्षांचे काय महत्त्व असा असल्याच्या अफवाही कुजबुज आघाडीने उठवल्या. पण वय कमी असले म्हणून काय झाले..  मुळात वय-ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व याचा काही संबंध नाही हे या विरोधकांनी आपल्या घरात पाहून तरी ध्यानात घ्यावे. शैक्षणिक धोरण एकविसाव्या शतकातील तरुणांसाठी असताना या तरुण पिढीला शिक्षणाकडून काय हवे आहे हे या विसाव्या शतकातील तज्ज्ञांना समजायला नको का? ते कोणीतरी सांगायला नको का? बरे ते केवळ मंत्री नाहीत तर युवासेनेचे प्रमुख आहेत. विविध कसोटय़ांवर टिकला नसला म्हणून काय झाले पण ‘परीक्षा रद्द करा’ या निर्णयाला तरुणांचा किती पाठिंबा मिळाला होता हे कसे विसरता येईल?

म्हणजे तरुणांच्या भावना-आकांक्षांची दिशा युवराजांना चांगलीच माहिती आहे. मग अशा युवा नेत्याने चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या आणि ज्येष्ठांनी त्या घटकाभर मन लावून ऐकल्या तर तोटा होईलच कसा? झालाच तर फायदाच होईल. आणि  पर्यावरणाचा शिक्षणाशी संबंध काय तुमच्या मुलांच्या- तुम्हालाच करावा लागलेल्या- ‘प्रोजेक्ट’ पुरता असतो असे समजलात की काय?  पाहा पाहा लोक काय म्हणताहेत –  ‘शिक्षणक्षेत्रातील पर्यावरण बिघडले आहे’ , ‘आर्थिक-बौद्धिक भ्रष्टाचार, नवनवीन कल्पनांचा अभाव यामुळे शिक्षणातही प्रदूषण शिरले..’  मग ते दूर करून शैक्षणिक पर्यावरणाचे संवर्धन करायचे तर धडे द्यायला येणार कोण? युवासेनाप्रमुख- पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याशिवाय आहेच कोण?