नेहमीप्रमाणे रोज सकाळी पार्कात बसणाऱ्या त्या चौघांनी ती बातमी पुन्हा पुन्हा वाचली. त्यातील मजकुरामुळे साऱ्यांचे चेहरे चिंतामग्न झालेले. तेवढय़ात त्यातल्या उजव्याने बोलण्यासाठी घसा खाकरला. सध्या देशात सत्ता असल्यामुळे प्रथम बोलण्याचा मान आपल्यालाच हे त्याने जणू गृहीत धरले होते. ‘काय तर म्हणे पाश्चात्त्यांपेक्षा भारतीयांचे हृदय लहान! अरे असे कसे शक्य आहे? हा नक्कीच आंतरराष्ट्रीय कट दिसतो. आपली संस्कृती विशाल परंपरा सांगणारी. विशाल हृदयाशिवाय हे शक्य झाले असते का? गेल्या सहा उत्कर्षीय वर्षांत देशभरात ५६ इंच छाती असणाऱ्यांची संख्या कैक पटींनी वाढली आहे. मग त्यांचे हृदय लहान कसे काय असू शकते? साऱ्या जगावर हुकमतच गाजवण्याची वेळ जवळ आली असताना अशा बातम्या पेरणे हा कटाचाच भाग दिसतो. याची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी. ते कोण संशोधन करणारे डॉक्टर्स, त्यांना चौकात फटके मारायला हवेत. भारतवर्षांची अखंड बदनामी चालवलीय साऱ्यांनी.’ हे म्हणताना त्यांचा स्वर टिपेला गेला व हात नकळत छातीवर स्थिरावला. मग शांत लयीत पुरोगाम्याने बोलायला सुरुवात केली. ‘संशोधनाला नाव ठेवण्यात काय अर्थ आहे? डॉक्टरांनी त्यांचे काम केले. जरा आजूबाजूला काय चाललेय तेही बघा ना! भेदाभेद व विषमतेमुळे  सारा समाज पोखरत चाललाय. गेल्या सहा वर्षांत तर त्याने कळस गाठलाय. उन्मादाने अनेकांची मतीच कुंठित झालीय. हृदयाला साक्षी ठेवून विचार करणारे कमी झाले. मग आकार कमी नाही तर काय होणार? ज्या अवयवाचा वापर माणूस कमी करतो तो एक तर गळून पडतो किंवा त्याचा आकार कमी होतो हे उत्क्रांतीवादाचा सिद्धांतच सांगतो. आधी भारताला साप- गारुडय़ांचा देश म्हणून हिणवले जायचे. आता छोटय़ा काळजाचा म्हणतील. पार रसातळाला घेऊन चाललात तुम्ही आम्हाला. तरीही तुमचे डांगोरा पिटणे, ढोल बडवणे सुरूच. धार्मिक द्वेषापायी माणूस खुजा झाला, मग हृदयाचा आकार मोठा कसा राहील? सारासार विचार, सभ्यता ही सारी विवेकवादाचीच लक्षणे खुंटीला टांगल्यावर दुसरे काय होणार? ज्याची वृत्ती व्यापक त्याचे हृदय मोठे या साध्या गोष्टीचा विसर पडत चाललाय साऱ्यांना.’ हे दु:खी उद्गार ऐकून कम्युनिस्टाला राहावले नाही. ते त्वेषाने बोलू लागले. ‘या साऱ्याला जागतिकीकरणच जबाबदार आहे हे माझे ठाम मत आहे.

अलीकडच्या काळात तर भारतीय कमालीचा स्वार्थी बनलाय. समाजातील पीडित शोषितांशी आपला काहीच संबंध नाही असेच त्याचे वागणे झालेय. मग हृदय आकुंचन पावणार नाही तर काय होणार? सत्ताधारी भांडवलदारांच्या हातचे खेळणे झालेत व समाज प्रत्येक अन्यायात जात, धर्म शोधू लागला. हे असे लोक विशाल हृदयी कसे असणार?’ पराभूत मानसिकता दर्शवणारा हा आवाज थांबल्यावर मग तिघे चौथ्याकडे बघू लागले. हा कवी. तो मान खाली घालून कागदावर काही तरी रखडताना दिसला. त्याने मान वर केली तर त्याचे डोळे डबडबलेले. ‘या बातमीने सर्वाधिक नुकसान माझे केलेय. हृदय हातात घेऊन चालण्याची आम्हाला सवय. आता त्याचाच आकार लहान झाला म्हटल्यावर कवितेची लांबी पण खुंटणार ना! अशा आकुंचित हृदयातून प्रेमाला अथांगता कशी बहाल करायची तुम्हीच सांगा? तुमच्यातल्या विसंवादामुळेच ही वेळ येऊन ठेपलीय. तेव्हा हे जरा ऐकाच :

‘संस्कृती म्हणता महान। तरी हृदय म्हणे लहान।

काढा भेदाभेदाचे बाण। निखंदून!’’