डाबराच्या त्या जाहीर सभेत बोलण्याच्या ओघात नकळत झालेल्या चुकीमुळे राजे चांगलेच वैतागले होते. इतके की रात्रीचे भोजनही त्यांनी ‘स्किप’ केले. पहाटेच उठून शयनगृहातल्या भव्य आरशासमोर भाषणातील शेवटच्या वाक्याचा सराव त्यांनी सुरू केला. ‘कमळ या चिन्हाचे बटन दाबून उमेदवाराला विजयी करा’ असे म्हणताना ते वारंवार कमळ या शब्दावर जोर देत होते. ठरवून एखादे वाक्य घोकायला घेतले की सहसा चूक होत नाही. तेव्हा भाषणाच्या शेवटचा पूर्ण भाग म्हणायचा असे त्यांनी ठरवले व हावभावासकट सराव सुरू केला. त्यांची तंद्री लागलेली असतानाच अचानक महालातील सेवक दरवाजा लोटून चहाची ट्रॉली घेऊन आत आला. त्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले व नकळत पुन्हा त्यांच्या तोंडून ‘पंजा’ शब्द बाहेर पडला. राजे रागाने सेवकावर ओरडले. गर्भगळीत झालेल्या सेवकाला पळायचेही सुचेना! ‘गेटआऊट’ असा शब्द कानावर आल्याबरोबर तो माघारी वळला. ७५ हजार रुपये किलोच्या भावाने खरेदी केलेल्या चहापत्तीने तयार केलेल्या चहाचा आस्वाद घेतल्यावर ते थोडे शांत झाले. आपले चुकलेच, किशोरवयात आपण काही काळ आजीच्या सहवासात राहायला हवे होते. निदान दोन्ही आत्यांकडे काही काळ घालवायला हवा होता. त्यातून निदान ‘कमळ’ संस्काराची ओळख पटली असती. तरुण वयात दोन्ही बाजूने विचार कळले असते तर तारतम्याने वागण्याची  व बोलण्याची सवय जडली असती आणि अशा फजितीला सोमोरे जावे लागले नसते. आपण कायम वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालत राहिलो. भिन्न विचाराचे म्हणून नातलगांशी फारकत घेतली. हे चुकलेच! विचार करता करता ते भानावर आले. रात्री जयपूरच्या आत्याने पाठवलेला धीर देणारा संदेश त्यांना आठवला. दु:खी मनाने आपण पक्षांतर करून निष्ठा बदलली पण मनावर झालेल्या संस्काराचे काय, असा प्रश्न तेव्हा लक्षातच आला नाही. तो काल अचानक दत्त म्हणून उभा ठाकला. राजकारणात असे ‘स्लिप ऑफ टंग’ चालायचे म्हणून साऱ्यांनी सावरून घेतले तरी ‘राजाही चुकला’ हे खूपच जिव्हारी लागल्याची जाणीव त्यांना झाली व ते ओशाळले. महत्प्रयासाने तोंडाशी आलेला केंद्रीय मंत्रीपदाचा घास अशा क्षुल्लक कारणाने निसटायला नको, असा विचार मनात येताच पुन्हा त्यांनी सरावाला सुरुवात केली. तेवढय़ात घराण्याचे पंतप्रतिनिधी आत आले. तेही कालपासून अस्वस्थ होतेच. त्यांनी हळूच विचारले, ‘महाराज तिकडे त्या भिंडच्या खोऱ्यात मनावरचे आधीचे संस्कार पुसून टाकणारी एक जडीबुटी मिळते. तातडीने सेवकांना पाठवून ती मागवायची काय?’ या प्रश्नासरशी राजेंनी चमकून त्यांच्याकडे पाहिले. आपण तसे प्रागतिक, विज्ञानावर विश्वास ठेवणारे. या जडीबुटीच्या नादाला लागावे की लागू नये असा प्रश्न त्यांना पडला. तेवढय़ात त्यांना आठवले, अरे ज्या पक्षात आपण गेलो तो तर प्राचीनतेवर विश्वास ठेवणारा, साधूसंतांना महत्त्व देणारा, आयुर्वेदावर श्रद्धा असणारा. मग त्या औषधावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? लगेच त्यांनी प्रतिनिधींना औषध आणायची सूचना केली. औषधाने का होईना निष्ठेगणिक दृष्टिकोनातही बदल करायला हवा, तरच स्पर्धेत टिकता येईल व आजकाल हे टिकणे महत्त्वाचे अशी मनाची समजूत घालत सोफ्यावर बसले. डोळे मिटताच त्यांना राजमाता आशीर्वाद देत असल्याचा भास झाला. आशीर्वाद व जडीबुटीचा परस्पर संयोग मनात जुळवत ते प्रचारसभेच्या तयारीला लागले.