दिवस उजाडला की सायकलवर टांग मारत एका शहरातून दुसऱ्याकडे जात रस्त्यात चांगल्या स्वच्छ भिंती दिसल्या की त्या रंगवायच्या. गेली कित्येक वर्षे त्याचा हा दिनक्रम. पक्षाचे नाव व चिन्ह सर्वत्र सारखेच असायला हवे, असा आदेश असल्याने नवतेच्या कल्पनाही त्याच्या डोक्यातून कधीच्याच बाद झालेल्या. हे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे लक्षण. आधी साहेब व नंतर बहेनजींवर अपार श्रद्धा ठेवणाऱ्या या कार्यकर्त्यांचे हात आज रंगवताना प्रथमच थरथरू लागले. भिंतीवर हत्ती रेखाटताना त्याच्या बाजूला कमळाचे फूल काढावे अशी अनिवार इच्छा त्याला झाली. त्याला आवर घालत त्याने काम संपवले, पण मनातले विचारचक्र थांबायचे नाव घेईना! सत्तेतील भागीदारीचा हा प्रवास जिथून सुरू झाला तिथेच तो पुन्हा येऊन थांबल्याचे लक्षात येताच तो दु:खी झाला. एक काळ होता. पक्षाच्या उत्कर्षांचा. आता लवकरच बहेनजी पंतप्रधान होणार असे साऱ्यांनाच वाटायचे. सोशल इंजिनीअरिंगचा तेव्हा बोलबाला होता. नंतर सारीच चक्रे उलटी फिरत गेली. राजकीय आकांक्षा वाढवण्याच्या नादात राजकीय जमीन घसरत चालली आहे हे बहेनजींच्या लक्षातही आले नाही. नंतर नंतर तर कमळाच्या देठांनी ही जमीनच व्यापून टाकली व उत्तरेतला जनाधार लयाला गेला. प्रारंभी पक्ष म्हटले की सामाजिक अभिसरण असेच चित्र साऱ्यांच्या डोळ्यासमोर तरळायचे. नंतर त्याची जागा बहेनजींची श्रीमंती व दरबारी राजकारणाच्या चर्चानी घेतली. मग बातम्या येऊ लागल्या. पक्षाचे इकडचे आमदार फुटले, तिकडचे पळाले. हे होणारच होते. पैसे घेऊन उमेदवारी वाटप केल्यावर कोण कशाला निष्ठेची पत्रास ठेवणार? आता बहेनजी आगपाखड करतात पण स्वत:ची चूक त्यांच्या लक्षात येत नसेल का? जिथे कुठे जिंकण्याची संधी असेल तिथे बाहेरच्याला संधी द्यायची याच धोरणाने घात केला हे खरे! साहेबांचे तसे नव्हते. ते जमिनीवर राहायचे. बहेनजीचे एकदम विपरीत. त्यांना स्वत:ला खुर्ची लागते. बाकी सारे जमिनीवर! आता काळ बदलला हे त्यांना कोण सांगणार? सुरुवातीच्या काळात ‘वोटकटवा’ म्हणून सारेच पक्षाला हिणवायचे. तरीही स्वतंत्र लढण्याची वृत्ती पक्षाने कायम ठेवल्याने तेव्हा हे हिणवणे सुद्धा आवडायचे. वाटायचे, कधीतरी आपले दिवस येतील. नंतर सत्तेतील सहभागाने व निवडणूकपूर्व आघाडीने सारे समीकरणच बिघडवून टाकले. सोबत आलेल्या साऱ्यांनी पक्षाच्या मतपेढीवर डल्ला मारण्याचेच तेवढे काम केले. हे लचके तोडणे आमच्या लक्षात यायचे पण हस्तीदंती मनोऱ्यात वावरणाऱ्या बहेनजींना कोण सांगणार? शेवटी सत्तेच्या मागे फरफटत जाण्याची वेळ आली. जातीचे राजकारण धर्माच्या उंबरठय़ावर जाऊन थांबले, दुसरे काय? आता आठवले आणि बहेनजी एकाच रांगेत. ते आतल्या वर्तुळात तर या बाहेरच्या वर्तुळात! धर्माचे ताबेदार म्हणतील तसे वागायचे. तरीही बहेनजी ऐकायला तयार नाहीत. सीबीआयचा धाक दाखवला जात आहे म्हणे त्यांना ! छी! काय अवस्था झाली पक्षाची! आज काय तर कमळाला पाठिंबा देऊ, उद्या काय तर अजिबात देणार नाही आणि परवा काय तर पाठिंब्यावर विजय. अरेरे! त्यापेक्षा आपणच खरे निष्ठावान. भिंती रंगवणारा कार्यकर्ता हीच पक्षाची प्राचीन ओळख. ती पुसू द्यायची नाही, या निर्धाराने तो निघाला. नव्या शहराकडे. भटांच्या ओळी गुणगुणत : एक साधा प्रश्न माझा, लाख येती उत्तरे

हे खरे की ते खरे, ते खरे की हे खरे!