गेल्या आठ महिन्यांपासून तो न थकता काम करत होता. आन्हिके उरकली की स्वत:ला खोलीत बंद करून घ्यायचे व दिवसभर वेगवेगळे, आकर्षक आणि लोक पटकन विश्वास ठेवतील असे संदेश तयार करून ते प्रसारित करायचे. उसंत क्षणभराची नाही. करणार काय. शेवटी मुद्दा भारतीय संस्कृती, परंपरा व धर्मश्रद्धेशी निगडित आहे ना! त्याला मार्चमधले ते दिवस आठवले. कोणतेही औषध नसलेल्या करोनाशी लढण्यासाठी साऱ्या जगाने अ‍ॅलोपॅथीची मदत घेण्याची तयारी सुरू केल्यावर परिवारात उडालेली खळबळ, मग लगेच संस्कृती प्रसार विभागाची झालेली बैठक. करोनाच्या भीतीमुळे लोक शास्त्रीय उपचार पद्धतीला शरण गेले तर भारतीय उपचाराचे काय? करोना दीर्घकाळ टिकला तर लोक अरिष्ट, आसव, काढा, चूर्ण हे परवलीचे शब्द विसरून जातील. एकदा हे विसरणे सुरू झाले की त्यांचा संस्कृती व परंपरेशी नाते सांगणाऱ्या आयुर्वेदावरील विश्वास उडेल. एकदा का माणूस विज्ञाननिष्ठ व्हायला लागला की तो धर्मापासून दूर जातो, हा अनुभव ताजा असल्याने शेवटी परिवाराला त्याची फळे भोगावी लागतील. हा धोका टाळायचा असेल तर लोकांना खऱ्याखोटय़ा ‘फॉरवर्ड’ अस्त्राचा काढा पाजणे केव्हाही योग्य. बैठकीत हा निर्णय होताक्षणी त्याने ‘परंपरारिष्टा’ची दीक्षाच घेतली व झोकून देत कामाला सुरुवात केली. त्याच्यासारखे हजारो भक्त ठिकठिकाणाहून याच कामात मग्न झाले. लोकांना भले रुग्णालयातील ऑक्सिजन वाचवू दे. त्यांच्या कानावर प्राचीन उपचार पद्धतीचे महत्त्व सांगणारे काही तरी आदळायलाच हवे, हा परिवाराचा आदेश साऱ्यांनीच मनावर घेतलेला. मग दिल्लीपासून गल्लीपर्यंत वेगवेगळे उपाय सुचवण्याचे लोणच सुरू झाले. कधी पापड तर कधी काढा, तर कधी गरम पाणी अशा नानाविध उपायांच्या चर्चानी भारत गजबजून गेला. प्रारंभीच्या दोन महिन्यांत या चर्चाना गती मिळाल्यावर मग त्याने रुग्ण बरे झाल्याच्या कथा पसरवायला सुरुवात केली. एकाने ती लिहायची व प्रांतस्तरावर १४ भाषांमध्ये रूपांतर करायचे. या साऱ्यावर तो लक्ष ठेवून असायचा. सामान्यांचा अशा दृष्टांती कथांवर लवकर विश्वास बसतो हे त्याला व परिवाराला ठाऊक होतेच. नवीन कोणताही रोग आला तरी त्याचे उत्तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या उपचारपद्धतीत लिहून ठेवलेच आहे, या आशयाच्या संदेशांची संख्या कोटीवर पोहोचली तेव्हा त्याला अपार आनंद झाला. प्रारंभीचे दोन महिने हे सर्व उपाय योजून झाल्यावर मग बैठकीत ठरल्याप्रमाणे देशी बाबा, गुरू नवी औषधे घेऊन मैदानात उतरले तेव्हा कुठे परिवाराने समाधानाचा पहिला सुस्कारा सोडला. आता लोक घरातल्या घरात बऱ्यापैकी ‘कंठशोष’ करू लागल्याचे लक्षात आल्यावर परिवाराने त्याला संदेशाची संख्या कमी करायला सांगितले. त्यातून थोडी उसंत मिळाली तरी देशीवादाचा हा प्रचार करण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप’सारखे विदेशी माध्यम वापरावे लागले ही खंत होतीच. तेवढय़ात त्याची आईच आजारी पडली. करोना झाल्याचे निष्पन्न होताच त्याने तिला थेट अ‍ॅलोपॅथी उपचारासाठी दाखल केले. आई बरी झाल्यावर त्याला लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवली. ‘एकाच्या घरात साप शिरतो. त्याला मारण्याच्या प्रयत्नात साप घरातील एका बिळात शिरतो. बाहेर काढण्याचे सर्व प्रयत्न थकल्यावर तो त्या बिळाभोवती जाळ पेटवतो. त्याचे लक्ष नसताना जाळ घरभर पसरतो व घरच पेटते. लोक धावतात. आग विझवतात. जळून खाक झालेल्या घरातला साप मेला असेल असे समजून तो घरात शिरतो, तर साप फणा काढून उभा.’

भक्ती, निष्ठा, परंपरा, प्रसार वगैरे  ठीक पण कुटुंबीय महत्त्वाचे, हे तारतम्य आपण बाळगले याच समाधानात तो परिवाराच्या पुढच्या आदेशाची वाट पाहू लागला.