दिवसभराच्या व्यग्र कार्यक्रमातून मोकळे झाल्यावर पलंगाला पाठ टेकली की केलेल्या कामाची उजळणी करत झोपी जायचे ही दादांची जुनी सवय. अगदी संघात सक्रिय असल्यापासूनची. आज सुभेदारीच्या विश्रामगृहात त्यांचे मन उजळणीत व्यग्र असताना अचानक त्यांच्या लक्षात आले की दिवसभरात आपण ‘नाराज’ हा शब्द २५ वेळा वापरला. त्यांचे मन जसजसे भूतकाळात डोकावू लागले तसतसा या शब्दाने त्यांच्याभोवती घातलेला गराडा त्यांना आठवू लागला. अध्यक्षपद स्वीकारल्यापासून कुठेही गेले की हा नाराज नाही, तो नाराज नाही असेच सांगण्यात आपला बराच वेळ जातो हे त्यांच्या लक्षात आल्यावर ते स्वत:च खजील झाले. पक्षाने पुण्यातून लढण्याचा आदेश दिला, पण सारा वेळ मेधाताई नाराज नाहीत असे सांगण्यातच गेला. अर्थात त्या नाराज होत्या, पण जाहीरपणे तर तसेच सांगावे लागणार ना! त्यामुळे म्हणावा तसा प्रचारच करता आला नाही. नंतर तरी हा शब्द पाठ सोडेल असे वाटत होते, पण तिथेही सेनेने घात केला. खरे तर विरोधी पक्षाचा अध्यक्ष म्हणून राज्यभर फिरताना या शब्दाचे काम असण्याचे काही कारण नव्हते. पण मध्येच खडसे प्रकरण सुरू झाले व मग वारंवार ते नाराज नाहीत असे सांगत फिरावे लागले. शेवटी तर या खोटे बोलण्याचा इतका कंटाळा आला की कधी एकदाचे ते सोडून जातात असे झाले. आता तरी या शब्दापासून मुक्ती मिळेल, असे वाटत असताना विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या! आज तर पत्रकारांसमोर अगदी हात जोडावे लागले. पंकजाताई नाराज नाहीत हे सांगण्यासाठी. या ताईसुद्धा वडिलांप्रमाणेच कसलेल्या राजकारणी दिसतात. माध्यमांसमोर आल्या नाहीत. पण संधी मिळाली की असे काही बोलतात की, त्या राहणार की जाणार या चर्चा कायम असतात. आता अशा वातावरणात हात जोडावे तरीही प्रश्न संपेचनात. पण अध्यक्षाला डोक्यावर बर्फ ठेवूनच वागावे लागते. नागपूरला परवा गेलो तर तिथेही नाराजीचाच सूर! खरे तर नागपूरवाल्यांनी त्यांचे त्यांचे आपसात ठरवून घ्यायला हवे : जोशी की सोले! एकमेकांशी बोलणार नाहीत, पण मला मात्र सुनावणार. मी फक्त ऐकून घेणारा- निर्णय घेणारा नाही हे साऱ्यांना ठाऊक असूनही नाराजीचा सूर मलाच ऐकावा लागतो. शेवटी किती काळ तोंडात साखर ठेवून बोलत राहायचे? गंमत म्हणजे हे सारेच माध्यमांपुढे बोलताना पक्षनिष्ठेची ग्वाही देत असतात. मी तावडीत सापडलो की नाराजीचा राग अगदीच बेसूरपणे आळवतात. माध्यमेही चतुर. कुणीही नाराज नाही असे माझ्या तोंडून वदवून घेत असतात. कंटाळा आला राव याचा! निर्णय नागपूरचे भाऊ घेणार, दिल्ली मोहोर उमटवणार आणि नाराजी मी झेलणार. अलीकडे तर या शब्दाचीच चीड यायला लागली मला. बंद खोलीत प्रत्येकाची समजूत काढायची. नवनवे प्रस्ताव ठेवत नाराजी दूर करायचा प्रयत्न करायचा व बाहेर येऊन सारे ठीक आहे असे सांगत राहायचे. तेच ते अन् तेच ते! उजळणी करता करता दादांना गाढ झोप लागली. सकाळी औरंगाबादहून पुण्याकडे जाताना आता मेधाताईंना समजावण्यासाठी काय शब्द वापरायचे, याचाच विचार डोक्यात असताना त्यांना ओवी सुचली.

नाही म्हणता म्हणता। झाला नाराजीचा गुंता।

आणि विवेक बेपत्ता। शिस्तीचा।।