बिच्चारे वैदर्भीय! किती डोळे लावून बसतात हो ते या अधिवेशनाकडे. केला न शेवटी हिरमोड. कारण काय तर करोना म्हणे! उगीच त्याचा बाऊ करून नागपूरला येणे टाळता काय? मग इथल्या परंपरावादी व उत्सवप्रिय माणसांनी जायचे कुठे? ऐतिहासिक अन्यायाचे परिमार्जन करण्याचा हाच तर एक सोपा उपाय शिल्लक ठेवला होता तुम्ही, तोही हिरावून घेतला भाऊ. या निमित्ताने होणाऱ्या चहलपहलीत किती लोकांना काम मिळायचे. त्यांचा विचार कोण करणार? आधीच हा प्रदेश मुंबैपासून दूर. त्यामुळे इकडे काय चाललेय याचा मुंबैकरांना पत्ताच नसतो. अधिवेशन हीच एकमेव संधी. तीही घालवता काय? आता मोर्चे काढून नेतृत्वाच्या डोळ्यात भरण्यासाठी तडफडणाऱ्यांनी काय करायचे? मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हे मोर्चे नसतातच मुळी, हेही तुमच्या लक्षात आजवर आले नाही काय? आता उपराजधानीभर फलक लावायचे कुणी? शहर विद्रूप करण्याची संधी घालवण्याचे पाप तुमच्या हातून घडले आहे हे लक्षात ठेवा. बिचारे ताडोबाचे वाघ. बातमी ऐकताच हिरमुसले. डरकाळी फोडायलासुद्धा तयार नाहीत. कागदी वाघांना भेटण्यासाठी किती आसुसलेले असतात ते दरवर्षी! तेवढेच बिचाऱ्यांना पांढऱ्या कपडय़ांचे दर्शन होते. अधिवेशनात मिरवणाऱ्या हौशा, नवशा, गवशांची नाराजी तर विचारूच नका. ऐन थंडीत पाहुण्यांसाठी धडपडणाऱ्यांचे कामच काढून घेतले तुम्ही! यापैकी किती तरी जणांनी वाणीची कणसे जतन करून ठेवली होती. शिवारातील घरे सजवून ठेवली होती. थंडी घालवण्यासाठीचा ‘इंतजाम’ही ठेवला होता. आता या तयारीचे करायचे काय? दरवर्षी डिसेंबर आला की अशी ‘सेवा’ करायची व एक-दोन कामाचा ‘मेवा’ मिळवायचा एवढेच हाती असते बिचाऱ्यांच्या. मुंबै लई महाग. त्यापेक्षा ही स्वस्तातली सरबराई केव्हाही परवडणारी. आता त्यांनी करायचे काय? या रद्दमुळे संत्रीही हिरमुसली हो! यंदा तर नागपूरच्या नितीनभौंनी बर्फीसोबतच संत्र्याच्या सुपाचाही बेत केलेला. आता ते कोण चाखणार? इथले अधिवेशन म्हटले की राज्यकर्त्यांवर गंडांतर ठरलेले. कधी आमदार फुटणार तर कधी कुणाचे विरोधी पक्षनेतेपद जाणार. म्हणून थंडीच्या बचावासाठी जॅकेट घालूनही सारेच धास्तावलेले. यंदा हे चेहरेच दिसणार नाही ना! तसेही यातले बरेचसे विदर्भासाठी अनोळखीच. अपवादानेच इकडे फिरकतात. अशा वेळी हा तो आहे, हा हा आहे ही सांगायची संधीसुद्धा काढून घेतली राव तुम्ही! ऐन थंडीत सावजी चिकन ‘सुतण्याची’ मजाच न्यारी! एका हाताने घाम पुसत पोटात जाळ करणारा रस्सा पचवणे केवळ इथेच शक्य. आता तुम्हीच सांगा या सावजीवाल्यांनी करायचे काय? खुराडय़ात जमवलेल्या कोंबडय़ा काय जंगलात सोडायच्या? त्या ‘लंबी रोटी’वाल्यांच्या तर पोटावरच पाय पडला हो! बिचारे मडकी गरम करून वाट बघत होते. अधिवेशन इथे नाहीच म्हटल्यावर पॅकेज नावाचा बुडबुडासुद्धा नाही, मग इकडच्या लोकांनी वर्षभर चर्चा तरी कशावर करायची? यानिमित्ताने नागपूरला जायचे म्हणजे खाणे, भटकणे, मौज, मजा होणारच.. म्हणून तर आम्ही विकासाचे काय असे आजकाल विचारतसुद्धा नाही. तो होत राहील त्याच्या गतीने. आलेल्या पाहुण्यांची ‘तबीयत’ खूश करून सोडणे हेच वैदर्भीयांचे वैशिष्टय़. त्यालाच पाठ फिरवता भाऊ तुम्ही. अहो, सरबराईनेसुद्धा करोनाचा विषाणू पळतो म्हणे! जरा पुनर्विचार करा की! आलात तर थोडे चलनवलन वाढेल व थोडी ‘ट्रॅफिकजाम’ची मजा घेता येईल. बघा, जमलं तर!