‘हे बघा, तुम्ही कितीही आग्रह केला तरी मी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारणार नाही. धागा गुंडाळणार नाही. कथेवरच विश्वास असेल तर, त्या कथेतली सावित्री सत्यवानापेक्षा किती तरी बुद्धिमान होती. वडाच्या झाडाखाली लाकडे फोडत असलेल्या सत्यवानाचा जीव सोडून काहीही माग असे यमाने सुचवले तेव्हा सावित्रीने अतिशय हुशारीने सत्यवानाच्या अंध आईवडिलांना सांभाळण्यासाठी नातू हवा असा वर मागितला. त्यामुळे नाइलाजाने यमाला सत्यवानाचा जीव परत द्यावा लागला. खरे तर अशी बौद्धिक चतुराई दाखवली म्हणून सर्व पुरुषांनी सावित्रीसारखी पत्नी मिळू दे असे म्हणत हे व्रत करायला हवे. पण झाले उलटेच. परंपरेचे जोखड स्त्रियांच्या पायात बांधण्यात धन्यता मानणाऱ्या पुरुषांनी या व्रताची माळ हळूच स्त्रीच्या गळ्यात घातली. स्त्रियांनी कधी तरी या जोखडातून मुक्त व्हायला नको का?’

काकूंचा हा बिनतोड युक्तिवाद ऐकून काका क्षणभर स्तब्धच झाले. तरीही त्यांच्यातला पुरुष त्यांना स्वस्थ बसू देईना!

‘सारे आयुष्य आपण सुखसमाधानाने जगलो, व्रतवैकल्यांचे पालन केले. आयुष्यात मी तुला कायम सुखी ठेवले. तरीही तुला सात जन्म मीच पती म्हणून मिळावा असे वाटत नाही?’

या प्रश्नावर काकू क्षणभर थबकल्या. पण त्यांच्या नजरेतला करारीपणा कायम होता. ‘याच व्रताला पुढे नेणारी दुसरी कथाही आता ऐका. वडाला फेऱ्या घालतानाच स्त्रिया मला सवाष्ण मृत्यू हवा अशी कामना करतात. पत्नीला आधी मरण आले म्हणजे तिचा पुनर्जन्म आधी होणार. नंतर मृत्यू पावणाऱ्या पतीचा पुनर्जन्म साहजिकच उशिरा होणार. म्हणजेच नव्या जन्मात पत्नी पतीपेक्षा मोठी असणार. मग, लग्न कसे होणार?’

काकूंचे तर्कसंगत उत्तर ऐकून काका चाटच पडले. तरीही त्यांच्यातला अहंकार त्यांना स्वस्थ बसू देईना! ‘माझ्यासोबत एवढे सुखी आयुष्य जगल्यावरसुद्धा तुला पुढच्या जन्मी मी पती म्हणून नको असेन तर हा माझा पराभव आहे. मीच कुठे तरी कमी पडलो असे आता वाटायला लागले आहे.’  ‘हे तुम्ही नाही, तुमच्यातला पुरुष बोलतो आहे. तुम्हाला मीच हवी असेन तर वटसावित्रीचे व्रत तुम्ही का करत नाही?’

‘मी कसा करणार, मला सारे हसतील.’

‘मग मीच हवी हा हट्ट तरी सोडून द्या.’

हा वाद वाढतच जातो हे लक्षात आल्यावर काकू स्वयंपाकघरात निघून गेल्या. थोडा काळ अस्वस्थतेत फेऱ्या घातल्यावर काका हळूच काकूच्या मागे जाऊन उभे राहिले व प्रेमाने विचारते झाले, ‘तुला खरंच मी पुढच्या जन्मी नको?’  सुखावलेल्या काकू मागे वळत ठामपणे म्हणाल्या,

‘मला पुढचा जन्म पुरुषाचा हवा आहे. तुम्ही जसे जगलात तसे जगून बघायचे आहे. एक बदल म्हणून तुम्हीही स्त्रीजन्माचा विचार करायला काय हरकत आहे?’