महामहीम म्हणजे काय लहान चीज वाटली की काय या  निवाडेवाल्यांना? आणि हो, ते नुसतेच महामहीम नाहीत तर एका राज्याचे प्रमुखही होते. मग त्या नात्याने ठेवला एखादा बंगला ताब्यात तर बिघडले काय? ते राजकारणी बघा ना! जातील तिथे बंगले ताब्यात घेतात व मरेपर्यंत ठेवतात. आधी तर बंगले न सोडण्याची फॅशनच होती. ते या निवाडेदात्यांना दिसले नाही काय? भले आताचे सरकार बंगले सोडण्याबाबत आग्रही असेल पण हा आग्रह विरोधकांसाठी असतो हेही यांना कळू नये म्हणजे खूपच झाले. महामहीम कोण आहेत? कुणाच्या जवळचे आहेत हे बघून तरी निर्णय द्यायचा ना! मुख्यालयातून निघालेली ‘कानपिळी तत्त्वे’ या निवाडेदात्यांपर्यंत पोहोचलेली दिसत नाही. म्हणून आधी राज्यप्रमुखपदावर असतानाच्या कज्जाची झळ महामहिमांना! तेही कायद्याची पुस्तके शेजारी ठेवून म्हणे! घटनेने दिलेले संरक्षण काय गंमत वाटले का यांना. मनाची नैतिकता वगैरे या गोष्टी बोलण्यासाठी ठीक. त्या नेहमी इतरांनी पाळायच्या असतात हेही यांना कळत नाही का? एखाद्याचा कुटुंबकबिला नाही मावत एका बंगल्यात. मग दोन-चार ताब्यात ठेवले तर त्यात वाईट काय? एखाद्या राज्याच्या महामहिमांचे गणगोत भाडय़ाच्या घरात ही कल्पनाच महान देशाला मान खाली घालायला लावणारी ना! काय तर म्हणे बाजारभावाने भाडे भरा. महामहिमांना हे काय घरभाडे भत्ता घेणारे शिक्षक समजतात की काय? अहो, गेला तो भूतकाळ. जरा वर्तमानाचा विचार करा. भविष्यात पुन्हा राज्यशकट हाकण्याची वेळ आलीच तर मग राहायचे कुठे? ताब्यात घेतलेली वस्तू सहजासहजी सोडायची नाही ही सवय प्रत्येक राजकारण्यांना जडली आहे, याची कल्पना या निवाडेदात्यांना अजून झालेली दिसत नाही. तरीही नोटीस काय काढता, शेरेबाजी काय करता? मोगलांचे राज्य वाटले की काय तुम्हाला? सारेच सत्ताधीश बिचारे जनसेवा करण्यात हयात घालवतात. मग थोडय़ाबहुत सवलती पदरात पाडून घेतल्या तर त्याचा इतका गवगवा, अवमानाची भाषा? ती करणाऱ्या कुणालाही दिल्लीत बढती नको की काय? दिल्लीहून चपराक बसेल तेव्हा येतील भानावर.

हे कळले नसेल तर एक गोष्ट ऐका. अकबराचा आलिशान शयनकक्ष रोज झाडणाऱ्या नोकराला एक दिवस बादशहाच्या पलंगावर झोपण्याचा मोह होतो. कुणाचे लक्ष नाही असे बघून तो काही क्षण पलंगावर पहुडतो. एक दासी हे बघते व थेट अकबराकडे तक्रार करते. संतापलेला बादशहा त्याला शंभर फटक्यांची शिक्षा सुनावतो. ती ऐकून गर्भगळीत झालेला नोकर मदतीसाठी बिरबलाकडे धाव घेतो. मग बिरबल युक्ती लढवतो. शयनकक्षापासून थोडय़ा अंतरावर असलेल्या घरात झोपेचे सोंग घेत एका रात्री जोरात ओरडायला लागतो. ‘माझ्या बादशहाला वाचव. एवढी शिक्षा नको.’ हे ऐकून अकबर धावत बिरबलाकडे जातो व काय झाले म्हणून विचारतो. माझ्या स्वप्नात येऊन खुदा म्हणतो, क्षणकाळ झोपणाऱ्या नोकराला एवढी शिक्षा तर रोज झोपणाऱ्या बादशहाला हजार फटक्यांची शिक्षा. हे ऐकून खजील झालेला अकबर नोकराची शिक्षा रद्द करतो. आताच्या महामहिमांच्या दरबारात बिरबल नाही. त्यामुळे त्यांना उपरती होण्याचा प्रश्नच नाही.

किमान याचा तरी विचार निवाडेवाल्यांनी करायला हवा ना! म्हणे न्याय सर्वाना सारखाच.!