रात्रीचे ९ वाजून गेले तरी मामाजींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ‘माथापच्ची’ सुरूच होती. मंत्रालयावर प्रथमच धडकणाऱ्या गाईंच्या मोर्चाला सामोरे कसे जावे यावर सर्वाची मते शांत, पण चिंतातुर मामाजी ऐकत होते. मोर्चाचे नेतृत्व करणारी गाय संकरित आहे, संस्कारित नाही या माहितीने त्यांच्या चिंतेत भरच पडली होती. गाईंची संख्या वाढवण्यासाठी परदेशी वळूंना आणणे चुकीचे ठरले याची जाणीव त्यांना झाली. मोर्चाला सामोरे जाण्यासाठी दोन प्रशिक्षित सेवक पाठवा अशी विनंती त्यांनी सकाळी नागपूर मुख्यालयाला केली होती तेव्हा त्यांना आदरणीयांकडून बरेच बोल ऐकावे लागले. लोकशाही आहे असे सतत भासवायचे असल्याने मोर्चा उधळण्याचा प्रयत्नही करू नका, अशी तंबीही तेथूनच मामाजींना मिळाली. रात्री उशिरा मामाजी निवासस्थानी पोहोचल्यावर नेहमीप्रमाणे गोठय़ात गेले. गाईच्या पाठीवरून हात फिरवण्याचा प्रयत्न करताच तिने झटक्यात मान खाली वळवून लाथा झाडल्या. त्या रात्री त्यांना झोप आली नाही. मोर्चाचा दिवस उजाडला. पहाटेपासून हजारो गाई मंत्रालयासमोर जमलेल्या. त्यांना हाताळताना पोलिसांची तारांबळ उडाली. त्यांच्याशी ‘संवाद’ साधण्यासाठी खास नागपूरहून आलेल्या दोघांचे भगवे कपडे बघून गाईंचा हंबरडा टिपेला पोहोचला. अखेर काही गुराख्यांनी मध्यस्थी केली व दुपारी गाईंच्या मागण्यांचे निवेदन मामाजींच्या टेबलवर पोहोचले. ‘हुश..’ करत ते निवेदन वाचू लागले. गाईला गोमातेचा अधिकृत दर्जा मिळावा व त्यासाठी घटनादुरुस्ती व्हावी. गाईंना मारहाण करणे हा दखलपात्र गुन्हा ठरावा. गोशाळेत गाईंच्या स्वातंत्र्याचा संकोच होत असल्याने त्यांना आठवडय़ातून एक दिवस बाहेर भटकायला परवानगी मिळावी. यातून ‘ऐतखाऊ’ असा बसलेला शिक्कासुद्धा पुसला जाईल. शेण, मूत्र व दूध यापासून नेमके किती उत्पन्न मिळाले याचा तपशील जाहीर करण्यात यावा व त्यानुसार प्रत्येक गाईला निर्वाह भत्ता देण्यात यावा. यामुळे ‘आत्मनिर्भर’ भारताचे स्वप्न लवकर साकार होईल. गोशाळेतील कर्मचाऱ्यांची वागणूक सौजन्यशील हवी, त्यांना स्वच्छतेचे धडे देण्यात यावेत, जेणेकरून ‘स्वच्छ भारत’ संकल्पनेला हातभार लागेल. प्रत्येक गाईचा विमा उतरवण्यात यावा तसेच भाकड गाईंना सांभाळायची योजना तयार करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. रेतनासाठी गाईंची परवानगी बंधनकारक करण्यात यावी तसेच त्यासाठी येणाऱ्या वळूची वागणूक ‘प्रेमळ’ असेल याची दक्षता घेण्यात यावी. वासरांना खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी. वारंवार मोर्चाची वेळ येऊ नये यासाठी गाईंचे प्रतिनिधी व सरकार यांचा समावेश असलेली एक संयुक्त समिती तयार करण्यात यावी. मागण्या वाचून मामाजींनी कपाळावरचा घाम पुसला. एक-दोन वगळता सर्व मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी मोर्चापर्यंत पोहोचवले तसेच काल दिवसभर विविध ठिकाणांहून गोळा केलेला हिरवा चारा गाईंसमोर टाकण्याचे आदेश त्यांनी दिले. यापेक्षा माणसांची आंदोलने परवडली असे म्हणत ते त्यांच्या कक्षात गेले. तिथे वाट बघत बसलेले दोन गुप्तचर अधिकारी लगेच त्यांच्या कानाला लागले. ‘हा मोर्चा बघून राज्यातले बैलही संघटित होऊ लागले असून तेही आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत’ हे ऐकताच मामाजींनी, गौमंत्रालयाचा कारभार दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे देण्यासाठी हालचाली सुरू केल्या.