काय भाऊ तुम्ही? आता म्हणता अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात. मग लक्षात काय ठेवायचे हो.. तुम्ही खडसे, मेहतांना दिलेला त्रास, इतरांना वेळोवेळी दिलेली ‘क्लीन चिट’, पंकजा मुंडे व तावडेंचा केलेला गेम, बावनकुळेंचा कापलेला पत्ता.. हे लक्षात ठेवायचे व ते पहाटेचे विसरायचे असेच म्हणायचे आहे ना तुम्हाला? भाऊ तुम्हीपण कधी कधी फारच गंमत करता बुवा. अहो, तुम्ही ज्या पक्षात आहात तिथे संस्कृतीला किती महत्त्व आहे हे ठाऊक आहे ना तुम्हाला? नसेल तर जरा ऐका. आपल्या संस्कृतीने पहाटेच्या संदर्भात अनेक उदात्त विचार रुजवले आहेत. काळाकुट्ट अंधार जाऊन प्रकाशाच्या किरणांना वाट मोकळी करून देते ती पहाट. याला गोपाल मुहूर्त म्हणतात. संस्कृतीत तो शुभ समजला जातो. आता अशा शुभमुहूर्तावर घेतलेला शपथविधी विसरायचा म्हणजे संस्कृतीशी द्रोहच ना! आता तुम्हीच सांगा असला द्रोह आम्ही कशाला करायचा? अशा शुभमुहूर्तावर स्थापन झालेले सरकार टिकले नाही हा काय आमचा दोष? तुमच्या चुकीसाठी तुम्ही आम्हाला संस्कृतीशी प्रतारणा करायला सांगता हे योग्य नाही भाऊ! उलट संस्कृतिरक्षकांच्या गोतावळ्यात राहूनसुद्धा तुम्हाला पहाटे अशी अवदसा का आठवली असा प्रश्न आम्हाला अजूनही छळतो आहे. तुम्ही काय किंवा तुमचा पक्ष काय, कधीही चुकत नाही याच भ्रमात वावरणारे! अशांची एखादीच चूक कायमची लक्षात राहते. काँग्रेसचे ठीक आहे हो. ते कधीच चुकत नसल्याचा टेंभा मिरवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या चुकाही लोक पटकन विसरतात पण तुमचे तसे नाही ना! तरीही तुम्ही म्हणता लक्षात ठेवू नका. वरून पुन्हा सांगतासुद्धा की आता सारे दिवसाउजेडी करू म्हणून! मग हा ‘पहाटसमयी’चा अपमान नाही काय? पूजा असो वा अर्चा, आम्हा संस्कृतीनिष्ठांना पहाटेची वेळच योग्य वाटते. तुम्हालाही ती योग्य वाटली असणारच. म्हणून तर तुम्ही तोच मुहूर्त साधला. तुम्हालाही घाई होतीच ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य खरे करून दाखवण्याची, पण नाही जमले. कदाचित काही सेकंदांनी मुहूर्त चुकला असेल. आता एवढय़ा क्षुल्लक कारणासाठी सारेच मनातून बाद करायचे हे बरोबर आहे का, तुम्हीच सांगा? लक्षात न ठेवण्याएवढी चिल्लर गोष्ट वाटते का ही तुम्हाला? ते दादा बघा. अजूनही पहाट झाली की आरती प्रभूंचे ‘नाही कशी म्हणू तुला’ ऐकत असतात. किमान तुम्ही सुरेश भटांचे ‘पहाटे पहाटे मला जाग आली’ तरी ऐकायला हवे. तेवढेच स्मरणरंजन, एका आकाराला न आलेल्या सरकारचे. ते करायचे सोडून ‘झाले गेले विसरा’ ही विरक्तीची भाषा शोभत नाही भाऊ तुम्हाला! आजकाल ते झुक्याचे व्यासपीठ. कोणत्याही गोष्टीला वर्ष झाले की बरोबर आठवण करून देते. त्यास लोंबकळणारे बोरूबहाद्दर नेमका तोच प्रश्न विचारतात. तुम्हाला नकोसा वाटणारा, अडचणीत आणणारा. त्यावर एवढी टोकाची प्रतिक्रिया द्यायची गरज काय? – तुम्ही पुस्तकात सविस्तर लिहिणारच आहात म्हणे! त्यासाठी तर ‘त्या’ पहाटेच्या साऱ्याच गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील ना भाऊ! मग आताच कशाला विसरण्याची भाषा करता? त्यापेक्षा ‘पुन्हा येईन’सारखे ‘मी लक्षात ठेवेन’ अशी भाषा वापरत चला. नेहमी कसे सत्ताधाऱ्यांना शोभेल असे बोलायला हवे. भलेही राज्यात नसेल पण केंद्रात तर आपलीच संस्कृती नांदत आहे ना! त्याचे भान ठेवत नवी वेळ ठरवायच्या मागे लागा. एकदा का नवा ‘मुहूर्त’ पावला की लोक आपसूकच आधीची ‘पहाट’ विसरून जातील.