कधी याच्या मनात शीर तर कधी त्याच्या हृदयात घर कर. कधी एकाच्या शरीरात वास कर तर कधी दुसऱ्याच्या मेंदूत वास्तव्य कर असे करून करून थकलेल्या त्या दोघी उत्तररात्री एकमेकींना भेटल्या तेव्हा खरे तर बोलण्याचेही त्राण त्यांच्यात उरले नव्हते. थोडा काळ निवांत गेल्यावर हुरूप आलेल्या ‘आशा’ने सुरुवात केली. ‘मला थोरल्या पवारांकडे राहायला जाम आवडते. प्रचंड आशावादी आहेत ते. एवढे वय झाले पण उत्साह, नव्या कल्पनांना अजिबात तोटा नाही. अर्थात माझी ऊर्जा असतेच त्यांच्यासोबत. त्या बळावर काल काय सुनावले त्यांनी त्या दाजीला. सत्ता असो वा नसो त्यांचा सहवास उत्तमच.’ हे ऐकून ‘निराशा’चा चेहरा कसानुसा झालेला. ‘मला तर त्यांच्या घरात प्रवेशच नाही गं! जरा कुठून आत शिरायचा प्रयत्न केला की त्या सुप्रियाताई धावूनच येतात अंगावर! मग नाइलाजाने दादाच्या घराचा रस्ता पकडावा लागतो. तिथे थोडा काळ राहून दादांची चिंता वाढवायची, एकदा ते सीएमची स्वप्ने पाहायला लागले की लगेच बाहेर पडायचे असा शिरस्ताच पडून गेलाय माझा. तसेही सध्या राज्यात माझे खूपच काम वाढलेय. तिकडे देवेंद्रभाऊंकडे मला नेहमी वास करावा लागतो. ‘सागर’मध्ये मी शिरले की खुर्चीवर निवांत बसून असलेले भाऊ लगेच खोलीतल्या खोलीत येरझारा घालायला सुरुवात करतात. ‘पुन्हा कधी..’ असे पुटपुटत राहतात. अनेकदा मला बघवत नाही ते. मग मी हळूच वहिनींच्या खोलीत डोकावते. गाण्याचा रियाज करत असताना त्या मला जवळ फिरकूही देत नाहीत. पण बरेचदा मला त्या बंगल्याच्या आवारात घुटमळावे लागते. कारण काय तर भाऊंच्या कल्पनाशक्तीला बाधा पोहोचू नये म्हणून! त्या बंगल्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून ‘पुन्हा येईन’चे आवाज घुमू लागले की असह्य़ होत मी निघते व थेट चंद्रकांतदादांना गाठते. निराशावादी सुरातून आशावाद व्यक्त करण्याचे कसब त्यांनी सध्या चांगलेच आत्मसात केले गं! त्यांच्यात ऊर्जा निर्माण करणारी यंत्रणा दिल्लीत आहे. ऊर्जेचा पुरवठा कमी झाला की मग माझे काम वाढते. अनेकदा ते झोपेतही सरकार येणार, पवारांना दाखवतोच म्हणून बरळत असतात. भाऊंची दुसरी टर्म लवकर आटोपली असती तर आपल्याला संधी मिळाली असती या विचाराने ते अस्वस्थ व्हायला लागले की मला माझी ‘मात्रा’ थोडी वाढवावी लागते. तिकडे दानवेंच्या घरी फारसे टेन्शन नसते. सत्ता असो वा नसो ते तसेही अस्वस्थच असतात. त्यामुळे पवारांचेच काय पण कुणाचेही विधान ते फार मनावर घेत नाहीत. मला मात्र त्यांचे मन उमगते. माझा सहवास लाभला की त्यांच्या येरझाऱ्याही वाढतात व खास मराठवाडा शैलीतला उद्धारही! ते अस्वस्थ असले की कार्यकर्तेही जवळ फिरकत नाहीत. दिल्लीचा फोन आला की ते शांत होत उद्या काय बोलायचे याची ‘प्रॅक्टिस’ करत बसतात. हे दिसले की मी हळूच काढता पाय घेते.’ निराशाचे दीर्घ निवेदन ऐकून आशा जांभई देऊ लागते. तोच तिला आठवते: अरे, आपल्याला तर उद्धवजींकडे जायचे आहे. साहेबांचे नाव ऐकताच निराशाच्याही डोळ्यांत चमक येते! ते बघून आशा म्हणते, ‘सध्या तरी तुला तिथे एंट्री नाही. दीर्घकाळानंतर सत्तेत आल्याने मातोश्रीमध्ये मीच राहते. नको त्या जुन्या कडवट आठवणी, नको निराशेचा सहवास असे म्हणत तेथील सर्वानी तुला हद्दपार करून टाकले आहे. म्हणून तर तिथे सारखे पुढले बेत सुरू असतात. त्या सुखी कुटुंबात मीच बरी.. येते मी’ .. दोघी एकमेकांचा निरोप घेतात. पहाट  होत असते.