24 January 2021

News Flash

‘शक्ती’उपासना!

थोडे जरी खोकलो तरी ही पुन्हा करोना चाचणीसाठी नेणार याची जाणीव होताच त्यांच्या अंगावर शहारा आला.

(संग्रहित छायाचित्र)

 

पोटात पाण्याची मात्रा जास्त गेल्याने रात्रभर तात्या तळमळतच होते. पोट फुगल्यासारखे वाटत असल्याने या कुशीवरून त्या कुशीवर वळता वळता पहाटे केव्हातरी त्यांना झोप लागली. सकाळी जाग आल्यावर त्यांनी डोळे उघडले तर काकू लिंबूपाण्याचा पेला घेऊन पलंगाशेजारी उभ्याच. ते बघूनच त्यांना मळमळायला झाले. काकूंची तीक्ष्ण नजर बघून त्यांनी स्वत:ला आवरले. पेला तोंडाला लावताच खोकल्याची जोरदार उबळ आली, तीही त्यांनी दाबून धरली. थोडे जरी खोकलो तरी ही पुन्हा करोना चाचणीसाठी नेणार याची जाणीव होताच त्यांच्या अंगावर शहारा आला. चूळ भरून मागे वळत नाही तोच त्या हळदीचे दूध घेऊन उभ्या. ‘थोडे थांब जरा’ असे म्हणण्याचा मोह त्यांनी आवरला. मग, खुर्चीत बसून पेपर हातात घेतला तोच गरम पाण्यात टाकलेला तुळशीचा अर्क त्यांच्यासमोर आला. हे अती होतेय असे ते पेपराच्या आडून फक्त पुटपुटले. ते कानावर जाताच काकूंनी त्यांच्या मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेला एक लेखच त्यांच्यासमोर धरला. तो न वाचताच त्यांनी काकूंकडे बघितले. त्यांचा चेहरा बघून ‘पेपर खरा’ असे म्हणण्याची हिंमत त्यांना काही झाली नाही. थोडय़ा वेळाने चहा आला. त्यात इतके आले घातलेले की तो त्यांच्याकडून प्याला जाईना. शिल्लक ठेवला तर तणतण, म्हणून मग त्यांनी डोळे मिटून कप तोंडाला लावला. सकाळी नवाच्या सुमारास स्वयंपाकघरातून येणारा झणझणीत फोडणीचा वास व आवाज ऐकण्याची त्यांची अनेक वर्षांपासूनची सवय. अलीकडे तुटलेली. भरपूर काळे मिरे व जिरेपूड टाकलेली अळणी भाजी, ओवा घालून लाटलेल्या पोळ्या, लवंग टाकलेला भात व भरपूर हळद टाकलेले कडवट वरण. हे खाऊन खाऊन ते जाम कंटाळले. काय तर म्हणे यातून ‘क’ जीवनसत्व मिळते. त्यांना आवडणारी पुरी कित्येक दिवसात न बघितलेली; श्रीखंडाची तर चवही विसरलेली. कसेबसे जेवण पोटात ढकलून तात्या उठले तर ‘शहदपाणी’ घेऊन काकू तयार. हा रतीब बघून यापेक्षा करोना झालेला परवडला असे तात्यांना वाटून गेले. वामकुक्षीनंतर ते उठले. चूळ भरताना त्यांनी घाबरतच घसा खाकरला. थोडा कफ बाहेर पडताच त्यांनी मागे पाहिले तर काकू उभ्याच. लगेच लगबगीने आत जात त्या सुंठ घेऊन आल्या. त्यावर कसले तरी आयुर्वेदिक चाटण टाकून ते जबरदस्तीने त्यांना खायला लावले. वयोमानानुसार हे होणारच. थोडा कफ पडणारच असा युक्तिवाद तात्यांनी करून बघितला, पण काकूंनी तो न ऐकता व्हॉट्सअ‍ॅपवर नवे उपाय शोधायला सुरुवात केली. सायंकाळी उकळलेल्या चण्याची, विना तिखटाची भाजी खाताना आपण घोडय़ाच्या पोटी जन्म तर घेतला नाही ना, अशी शंका त्यांच्या मनाला स्पर्शून गेली. अगतिकपणे त्यांनी काकूंकडे बघितले पण बोलण्याची हिंमत झाली नाही. रात्री तात्या झोपण्याच्या तयारीत असताना काकू पुन्हा दोन पेले घेऊन हजर. एकात गुळवेलचा काढा तर दुसऱ्यात लेंडीपिपरीचा. नाइलाजाने दोन्ही पेले रिते केल्यावर त्यांना कसेतरीच वाटू लागले. तरीही तक्रार न करता ते झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी आन्हिक आटोपल्यावर तात्या हळूच घरातून सटकले व चौकातल्या हॉटेलात गेले. चमचमीत खावे म्हणून त्यांनी ‘पदार्थसारणी’ उघडली तर त्यातही जिरे, आले, ओवा, जीवनसत्व, रोगप्रतिकारशक्ती अशा शब्दांचीच रेलचेल.. उदास होत त्यांनी चहा मागवला, पण पुढय़ात आला तो हिरवा!

त्या करोनाची ऐसी की तैसी म्हणत ते घरी परतले तर डोळ्यातून जाळ काढत काकू दारातच उभ्या. अंगावर बादलीभर पाणी टाकून तात्यांना आत घेतल्यावर काकूंनी पुन्हा पेला समोर केला. आता मात्र, मनाचा दगड करून तात्याही घरी-दारी चाललेल्या शक्ती-उपासनेत सहभागी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 12:04 am

Web Title: loksatta ulta chashma article abn 97 65
Next Stories
1 त्या दोघींचा संचार
2 प्रात:काळ स्मरणात तरी हवाच..
3 ‘हम्मा’मा मोर्चा..
Just Now!
X