निषेध, निषेध, निषेध! आमच्या ‘जाणत्या’ नेत्यावर ‘सौम्य’ भाषेत टीका करणाऱ्या थोरल्या पवारांचा राहुल गांधी विचार अध्ययन केंद्रातर्फे जाहीर निषेध. काय तर म्हणे राजकारणात सातत्य नाही. अहो साहेब, सरकारवर सातत्याने टीका करणारे ते एकमेव नेते आहेत. तुमच्यासारखे अधूनमधून ते मोदी-शहांना भेटत नाहीत, खलबते करीत नाहीत. राहुलजींबद्दल थोरातांनी केलेले विधान योग्यच आहे. भले तुम्ही जाणते राजे असाल पण ही पदवी एका राज्यापुरती मर्यादित आहे हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणाचे आकलन तुम्हाला नाही, म्हणूनच राहुलजी तुम्हाला कळू शकले नाहीत. अहो, हा गांधी घराण्याचा वारस म्हणजे एक दुबरेध कविताच आहे. ती समजून घ्यायची असेल तर समीक्षकच लागतो, तुमच्यासारख्या नेत्याचे ते काम नाही. काय नाही केले आमच्या नेत्याने. शेतकरी कुटुंबात जाऊन त्यांच्या हातचे जेवणारा हा देशातला पहिला नेता. त्यानंतरच सारे नेते (विरोधकांसकट) झोपडीतले जेवण घेऊ लागले. चौपाल आंदोलन करून त्यांनी खाटेला राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. राफेल हा शब्द देशभर पोहोचवला. होय, मध्ये मध्ये त्यांना सुटीवर जाण्याची सवय आहे. बिहारमधील सभा आटोपल्यावर ते सिमल्याला गेले. यात गैर ते काय? आपले काम झाले की त्याक्षणी तिथून निघून जाणे ही पाश्चात्त्य सभ्यता आहे. काम नसताना उगीच रेंगाळत राहणे, नाक खुपसणे त्यांच्या स्वभावात नाही. याला तुम्ही सातत्याचा अभाव म्हणत असाल तर तुम्हाला राहुलजी समजलेच नाहीत. भले सत्ता नसेल किंवा ती आणता येत नसेल पण आमचे नेते वलयांकित आहेत. हे तेज त्यांना वारशाने मिळाले आहे. सिनेमातला नायक जसा प्रेम, राग व्यक्त करू शकतो, गाणी गाण्यासोबतच दुर्जनांचा नाश करू शकतो तसेच आमच्या नेत्याचे आहे. तो एकटाच सर्व काही करू शकतो. फक्त देशातील सामान्य लोक, इतर नेते त्यांना समजून घेण्यात कमी पडत आहेत. तुम्ही आता ऐंशीपार आहात, तुम्हाला तरुणाईची वैशिष्टय़े कशी कळणार? एकदाच काय तुम्ही पावसात भिजलात. अहो, आमचे नेते थेट रस्त्यावर उतरतात. पोलिसांशी पंगा घेतात. प्रसंगी अंगावर काठी झेलण्याची त्यांची तयारी आहे. सामान्यांच्या व्यथा ऐकून त्यांचे बाहू फुरफुरतात. मग सरकार आपले की विरोधकांचे असा भेदही ते करत नाहीत. आठवते ना ते तुम्हाला अध्यादेश फाडण्याचे प्रकरण? अशी धमक दाखवणारे ते देशातील एकमेव नेते. तरीही तुम्हाला यात सातत्य दिसत नसेल तर तो तुमच्या नजरेचा दोष आहे. एकदा चष्म्याचा नंबर तपासून घ्या साहेब! ते बराकभाऊ बोलले म्हणून तुम्हीही तसेच बोलले पाहिजे हे अमेरिकाधार्जिणे झाले. तुम्ही भले राजकारणातले धुरंधर असाल पण आमचे राहुलजीसुद्धा काही कमी नाहीत. तुमच्या सत्तेची सोय करून देण्यात आमच्याही नेत्यांचा वाटा आहे हे लक्षात असू द्या. राहुलजींचे धडाडीचे राजकारण समजून घेण्यासाठी किमान आता तरी इतर नेत्यांनी शहाणे व्हावे व त्यांच्यातील ‘प्रतिभा’ समजून घ्यावी. आम्ही लवकरच आमच्या अध्ययन केंद्रातर्फे ‘राहुल गांधी- समज, आकलन व सातत्य’ यावर एक राष्ट्रीय चर्चासत्र ठेवणार आहोत.. राहुलजींच्या तारखा मिळाल्या की चर्चासत्राचीही तारीख ठरेल. राहुलजींचा फोन लागत नाहीये सध्या, म्हणून!