हे (खरे तर प्रत्येकच) सरकार समजते काय स्वत:ला ? आम्हाला नोकऱ्या देतात, वाटेल तितक्या सुटय़ा देतात, सहाव्याचे काम पूर्ण व्हायच्या आधी सातवा वेतन आयोग देतात.. म्हणून काय वाटेल ते आदेश द्यावेत की काय या सरकार म्हणवून घेणाऱ्यांनी ?

यांनी वेळेवर कामाला या असा आग्रह धरला.. आम्ही काहीही बोललो नाही. उशीरा आल्यास लेट मार्क लावून वेतन कापण्याचा इशारा दिला, आम्ही तो सहन केला. वेळेवर आल्यावर ऑफिसात काम करा म्हणाले तेही आम्ही ऐकले! सायंकाळी पाचच्या आत कार्यालय सोडण्यास मनाई केली आम्ही ती टाईम ऑफिससमोर पाच वाजेपर्यंत रांगेत उभी राहून सहन केली..

सर्व ऐकले. पण आता मात्र हद्द झाली. आम्ही कार्यालयात कोणते कपडे कसे घालून यावे हे देखील आता सरकार ठरवणार !

रंगीतसंगीत भडक कपडे घालायचे नाहीत. जीन पँट्स नाहीत. टीशर्ट नाहीत. हे सर्व म्हणे कार्यालयीन वातावरण बिघडवणारे, म्हणून त्यांना मनाई. काय म्हणावे या सरकारला?

रंगीत कपडे घातल्याने कार्यालयीन वातावरण बिघडते हे जर खरे मानायचे तर हे सर्व सरकार चालवणारे पांढऱ्या डगल्यांत असतात म्हणून सर्वत्र कशी शुभ्रता नांदावयास हवी. दिसतीये का ती नांदताना? नाही ना.

अहो.. आम्ही कोठून कोठून लांबून लोकल, बस मधे लोंबकळत कसेबसे कामावर येतो. यांच्यासारखी दक्षिण मुंबईत घरे नाहीत आमची. गेला बाजार ‘शलाका’ वा तसे काही मिळण्याची शक्यताही नाही आम्हाला. तेव्हा या गर्दीत परिटघडीचे कपडे घालून कार्यालयात येणे कसे जमणार आम्हाला? आम्ही ठरवले जरी पांढरे शुभ्र कपडे घालायचे तरी ते येथे येईपर्यंत तसेच राहतील याची शक्यताच नाही. बाकी पानाजद्र्याच्या नाहीत तरी आमच्याच घामाच्या रांगोळ्या आमच्या अंगरख्यांवर दिसतील. ते टाळायचे म्हणून आम्ही रंगीतसंगीत कपडे घालतो. तर आता तेही सरकारच्या डोळ्यावर येत असेल तर आम्ही करायचे तरी काय?

आणि दुसरे असे की अशा काही रंगीतसंगीत पेहरावात कार्यालयांत येणारे चेहरे हीच आमच्या नीरस आयुष्यातील रंगत. आठवडय़ातले कामाचे पाच दिवस हे चेहरे दिसतात, हसतात, बोलतात म्हणून तर दर सोमवारी सकाळी कार्यालयात येण्याची इच्छा जिवंत राहते. आता तुम्ही आमचा हा आनंदही काढून घेणार असाल तर आम्ही कोणाच्या ‘तोंडां’कडे पहायचे?

आणि हा नियम आम्हाला एकटय़ालाच काय म्हणून? लाखो रुपयांचे स्वनाम-कोरित सूट घालणाऱ्या सेवकापासून आठवले त्या रंगाचे मिळेल ते वस्त्र घालणाऱ्या दासापर्यंत वाटेल ते परिधान करणाऱ्या राजकारण्यांपर्यंत सर्वानाच ही वस्त्र संहिता लागू करा की !

ते करणार नाही तुम्ही. कारण ते तुमच्यातले ना ! म्हणून सर्व नियमसक्ती फक्त आमच्यावर. पण रंग आहेत म्हणून जगण्यात रंगत आहे. तुमच्या झेंडय़ातले रंग काढले तर फक्त पांढरे निशाण उरते हे विसरू नका म्हणजे झाले. नुसती शुभ्रता जीवघेणी असते..!