करोनाच्या संकटामुळे महाविकास आघाडी सरकारने नवीन वर्ष-स्वागताच्या पहाटेपर्यंत चालणाऱ्या पाटर्य़ाना आळा घालण्यासाठी ‘अकराच्या आत घरात’ असा आदेश जाहीर केल्यापासून घरातील प्रत्येक जणच खूश होता. मी कधीही मित्रमैत्रिणींबरोबर कुठे जाणार असे म्हटले की फार उशीर नको, सातच्या आत घरात पाहिजे, असा फतवा बाबा काढायचे. पण सरकारनेच ‘थर्टी फर्स्ट’साठी ‘अकराच्या आत घरात’ म्हटल्यावर आता बाबांना कळले असेल की अशी बंधने टाकल्यावर कसे होते ते.. असा विचार कन्येच्या मनात सुरू होता. एरवी स्वभावानुसार आतापर्यंत बाबांनी कुरकुर सुरू करायला हवी होती, पण ते तर शांत व खूश दिसत आहेत.. ते का, हे कोडेही तिला उलगडत नव्हते.

तिकडे गृहलक्ष्मींनाही या निर्णयाचा आनंदच झाला होता. दरवर्षी या दिवशी कटकट सुरू होते. सर्व कुटुंबाने एकत्र नवीन वर्षांचे स्वागत करावे, बाहेरून काही तरी मागवून घरातच राहावे किंवा आम्हाला तरी बाहेर न्यावे, अशी इच्छा असताना हे दरवर्षी मित्रांबरोबर पार्टी ठरवतात आणि त्यांच्याबरोबर मजा करत पहाटे कधी तरी अवतरतात. झोपमोड होते व चिडचिडही होते. यंदा त्या ठाकरेंनी ‘अकराच्या आत घरात’ असे जाहीर केल्याने परस्परच जिरली यांची. करोनाला व महाविकास आघाडीला त्यासाठी थँक्यू बरं का! शिवाय अकरानंतर घरपोच सेवेची हॉटेलांना मुभा दिली आहे. त्यामुळे आता घरीच सगळे जण पार्टी करू. बाहेरून छान जेवण मागवू, असा बेत सौ. मनाशी ठरवत होत्या.

सुधाकररावही खूश होते. बरे झाले, अकराच्या आत घरात व रात्रीच्या संचारबंदीचा आदेश काढला. आता त्याचे निमित्त करून पूर्ण रात्रच मित्राकडे घालवण्याचा बेत तडीस नेता येईल! दरवर्षी मध्यरात्र उलटल्यावर मोबाइलवर ‘कधी येताय’ हे इतक्या वेळा विचारायची की पार्टी ऐन रंगात येत असताना आता फक्त एकच प्याला म्हणत लवकर निघावे लागायचे. पण या आदेशामुळे सुटका झाली! आता काय ‘रात सारी आपुली..’ असा विचार मनात येऊन सुधाकररावांची कळी खुलली.

तिकडे ‘मातोश्री’वरही ‘अकराच्या आत घरात’वर चर्चा सुरू होती. पर्यटनाला चालना देण्याचे धोरण असताना अकराच्या आत घरात कशासाठी, असा प्रश्न युवराजांना पडला होता. अकरा वाजता तर पाटर्य़ा सुरू होतात. दिनो किंवा अन्य कोणा मित्राने पार्टीला बोलावले तर किती अडचण, अशी घालमेल मनात सुरू होती. तेवढय़ात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे अडीच दिवसांचे व आपल्या महाविकास आघाडीचे वर्षभराचे उपमुख्यमंत्री अजित पवार १ जानेवारीला पुण्यात एका कार्यक्रमात पुन्हा एकत्र येणार असल्याच्या बातमीकडे सचिवांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री त्यावर थोडे गंभीर झाले असे वाटत असतानाच; बरे झाले, तुम्ही ‘अकराच्या आत घरात’ हे आधीच जाहीर केले ते. म्हणजे निदान मध्यरात्री भलत्याच घडामोडी होऊन पुन्हा पहाटेचा शपथविधी होणार नाही याची खात्री बाळगून निश्चिंत मनाने झोपता येईल, असे म्हणत वहिनींनी मुख्यमंत्र्यांना टाळी दिली!