पहिली लस – व्हॉट इज धिस? व्हॉट्स गोईंग ऑन.. काय चाललंय हे..

दुसरी लस – अगं, ते विधिवत पूजा करताहेत नारळ फोडून, हळदकुंकू लावून, आरती ओवाळून.

पहिली लस – बट व्हाय? कशासाठी हे?

दुसरी लस- हे बघ, आपला डीएनए ऑक्सफोर्डचा असला तरी येथे संवाद साधताना तुला देशी भाषाच वापरावी लागेल. सध्या सत्तेत देशीवादी आहेत.. त्यांचे चौफेर लक्ष असते.

पहिली – हो गं, पण हा प्रकार काय आहे?

दुसरी – या देशात जन्म-मृत्यूपासून प्रत्येक गोष्ट ‘विधिवत साजरी’ करण्याची प्रथा आहे. विज्ञानवादी माणसेही यात हिरिरीने सहभागी होतात. पूजाअर्चा केली की कामे मार्गी लागतात असा समज येथे दृढ आहे. याच समजातून राफेलसमोर लिंबूमिरची ठेवली गेली.

पहिली – समज कसला, हा तर गैरसमज, अंधश्रद्धा आहे ना ही!

दुसरी – येथे गैरसमजाला समज व अंधश्रद्धेला श्रद्धा मानण्याची परंपरा आहे.

पहिली – पण आपली निर्मिती हे पूर्णपणे वैज्ञानिक सत्य आहे. फुटणाऱ्या नारळाशी आपला संबंध काय? हे लशीकरण आहे की वशीकरण?

दुसरी – रागावू नको गं! ही तर सुरुवात आहे. जसे जसे आपण उत्तरेकडे जाऊ तसा या विधीला ऊत येत जाईल. तिकडे आपल्या कुपी आधी होमहवनापुढे ठेवल्या तरी नवल नाही!

पहिली – पण त्या हवनाच्या आचेमुळे आपल्यातली करोनामारक क्षमता कमी होईल त्याचे काय?

दुसरी – त्याच्याशी लोकांना काही घेणे देणे नाही. सत्ताधीशांवर त्यांची श्रद्धा आहे. त्यांनी पाण्याचे इंजेक्शन दिले तरी लस म्हणून ते आनंदाने टोचून घेतील. आपल्या जन्माचा पत्ता नसताना वाजवल्याच होत्या ना त्यांनी थाळ्या.

पहिली – शी बाई! अशा लोकांच्या शरीरात जाऊन काम करावे लागणार. कठीणच आहे. अजबच देश आहे म्हणायचा.

दुसरी – तरी एक बरे झाले. त्या राजकारण्यांचा नंबर आधी नाही लागला. त्यांच्या निबर शरीरात काम करताना आपल्या मारकशक्तीची दमछाक उडाली असती. शिवाय त्यात श्रद्धाळूही अधिक.

पहिली – माझ्यासाठी तर ते नावडते प्रकरण. देश कुठलाही असो. इंग्लंड, अमेरिका की हा!

दुसरी – ही भावनाप्रधान चर्चा राहू दे गं आता. अखेर आपण पैशाने विकल्या जाणाऱ्या वस्तू..

पहिली – म्हणजे भारतभर प्रवास करताना आपल्याला भरपूर अनुभव येणार असे दिसते.

दुसरी – हो. खरंय हे. तिकडे दक्षिणेत, मंदिरात शीतपेटय़ा ठेवल्या जातील. बाकी आरत्या ओवाळणे, फुलांच्या माळा चढवणे हेच सर्वत्र. सोबतीला हळदीकुंकू. यानिमित्ताने देशभरात नारळांची विक्री वाढेल ती वेगळीच.

पहिली – अगं पण भक्तीने, श्रद्धेने करोना जात नाही हे सिद्ध होऊनही हे लोक तसेच का वागतात?

दुसरी – अंतिम सत्य श्रद्धेतून गवसते या मूर्खपणावर अजूनही विश्वास ठेवला जातो ना!  विज्ञानात कधी शंभर टक्के परिणाम नसतो, हे यांना समजत नाही आणि परिणाम का होत नाही याची कारणे शोधायची सोडून स्वप्नवत गोष्टींच्या मागे धावत सुटतात. त्याचसाठी सारे ‘विधिवत’..

पहिली – या देशातले हे ‘विधिवत’ प्रकरण नष्ट करण्यासाठी निर्मितीकारांनी आता एखादी लस काढायला हवी.

दुसरी – शू :ऽऽऽ.. असे बोलू नको. शीतपेटीत असलो तरी प्रतिगामींचा पहारा आहे आपल्यावर. अशा वैचारिक लशीचा थेंब जरी बाहेर पडला तर आगडोंब उसळेल या देशात. आहे तेही कंत्राट रद्द होऊन जाईल. त्यापेक्षा राहू दे या साऱ्यांना श्रद्धेची डुबकी घेत.