मुंबई (सा. प्र.) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सेनेसंदर्भात केलेल्या एका वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून सत्तारूढ पक्षाच्या सैनिकांनी तापी नदीच्या पात्रात आज ठिकठिकाणी ‘प्रवाह रोको’ आंदोलन सुरू केले आहे. सरकारने त्याची तातडीने दखल घेत याच नदीवर धुळे जिल्ह्य़ात लोकसहभागातून तीन हजार कोटींचे धरण बांधण्याचा निर्धार जाहीर केला असून या आंदोलनाला आर्थिक बळ मिळावे म्हणून सत्तारूढ पक्षातर्फे राज्यभर निधी संकलन मोहीम हाती घेतली जाणार आहे.

शहा यांनी कोकणातील एका कार्यक्रमात बोलताना, सेनेने साहेबांच्या विचारांना तापी नदीत बुडवले असे म्हटले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या राज्यभरातील सैनिकांनी आज थेट उत्तर महाराष्ट्रात थडकून ‘तापी पाणी अडवणूक’ आंदोलन सुरू केले. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्य़ात प्रवेश करणारी ही नदी धुळे, नंदुरबार असा २०८ कि.मी. प्रवास करून तळोदाजवळून गुजरातमध्ये प्रवेश करते. त्या राज्यात या नदीवर असलेल्या उकई धरणात पाणीच जाऊ द्यायचे नाही या इराद्याने सैनिकांनी आज या तीन जिल्ह्य़ांत ठिकठिकाणी कृती आंदोलन सुरू केले. यावल, अंमळनेर परिसरात हजारो सैनिकांनी नदीकाठावरील दगड नदीच्या पात्रात आणून टाकले व पाण्याचा प्रवाह अडवण्याचा प्रयत्न केला. आमच्या पक्षावर टीका करणाऱ्या शहांना त्यांच्या गृहराज्यात या नदीच्या कोरडय़ा पात्रात बसण्याची वेळ या आंदोलनामुळे येईल, असा इशारा सैनिकांनी या वेळी दिला. हा दगडांचा देश आहे, त्यामुळे ही मोहीम यशस्वी होईल असे एका सैनिकाने एका कवितेचा हवाला देत सांगितले. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून निघणारे सैनिक पाणी रोखण्यासाठी सोबत दगड, सिमेंटची पोती, खराब टायर मालमोटारीत भरून आणणार आहेत, असे पक्षनेत्यांनी सांगितले. आधी विटा, मग लोखंड व आता पैसे गोळा करणाऱ्या विरोधकांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्याचा हा प्रयत्न सकारात्मक व विकासाकडे नेणारा आहे, असा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, सरकारनेही याची दखल घेत तळोदा परिसरात तापीवर धरण उभारण्याचा निर्णय आज जाहीर केला. विरोधकांनी हिणकस भाषेत केलेली टीका सामान्यांच्या लक्षात यावी यासाठीच लोकसहभागाचा पर्याय निवडण्यात आला असून सैनिक आंदोलनात सहभागी होण्यासोबतच घरोघरी जाऊन या मोहिमेसाठी निधी संकलन करतील. हे करताना विरोधक करतात तशी कुणावरही जबरदस्ती केली जाणार नाही, असे पक्षातर्फे सांगण्यात आले. दुसरीकडे सरकारने या धरणाच्या आराखडय़ासाठी आजच कृतीगटाची स्थापना केली असून त्यांना आठ दिवसांत अहवाल देण्याचे सांगण्यात आले आहे. कुणी अंगावर येत असेल तर त्याला शिंगावर घेण्याची आमची सवय आहे. त्यानुसार या मोहिमेसंदर्भात पक्षप्रमुख लवकरच फेबुलाइव्हमधून जनतेला सविस्तर माहिती देतील असे पक्षप्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, विरोधकांनी या मोहिमेची खिल्ली उडवली आहे. श्रद्धेची तुलना विकासाशी करण्याचा प्रयत्न हास्यास्पद असून लवादाच्या विरोधात जाणाऱ्या या मोहिमेला गुजरातकडून न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे विरोधकांचे म्हणणे आहे.