अंगावर झूल, शिंगांना तोरण, कपाळावर मोठे कुंकवाचे मळवट अशा सजून त्या दोघी राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्या मुख्यालयात जाण्यासाठी सज्ज झाल्या तेव्हा इतर गाईंच्या मनात उगीच असूया दाटून आली. आजवर आपला केवळ वापर ठाऊक असलेल्या मानवजातीला उशिरा का होईना, पण हे सन्मानाचे शहाणपण सुचले म्हणून अवघी गोशाळा आनंदली होती. एक आनंदी हुंकार देत त्यांनी साऱ्यांचा निरोप घेतला. आयोगातर्फे देशभर घेण्यात आलेल्या गोप्रचार-प्रसार परीक्षेच्या मूल्यांकनाची जबाबदारी या दोघींवर होती. मुख्यालयात पोहोचल्यावर परीक्षकांनी तपासलेल्या व चांगले गुण मिळालेल्या काही निवडक उत्तरपत्रिका त्यांच्यासमोर पर्यवेक्षणासाठी ठेवण्यात आल्या. ‘बघू या, आजची नवीन पिढी आपल्याविषयी काय म्हणते ते!’ असे मनात घोळवत त्यांनी उत्तरपत्रिका वाचायला सुरुवात केली. तेवढय़ात कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकू लागले. सरकारचा हा प्रसिद्धीचा सोस बघून दोघींनाही राग आला. पण आनंदाच्या क्षणी उगीच मिठाचा खडा कशाला म्हणून गप्प राहिल्या. प्रश्नोत्तरांपेक्षा निबंध वाचू असे त्यांनी आधीच ठरवले होते. ‘गाय ही पशू नाही, तर माता आहे. घरात अन्न शिजवल्यावर सर्वात आधी तिला खाऊ घातले पाहिजे. तसे केले तर पूर्वजांना खूश करता येते. रस्त्यात कुठेही गाय दिसली तर थांबून नमस्कार करावा. घरातले शिळे अन्न गाईला खाऊ घातले तर पुण्य मिळते. रोज गाईची पूजा करावी. रोज गायीला चारा खाऊ घातला तर मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्यात गाईला केळी खाऊ घातली तर उत्तम अर्थयोग संभवतो. गाय पाळणे शक्य नसेल तर तिची पितळी मूर्ती देवघरात ठेवावी. उपासना करताना धष्टपुष्ट गाय शोधावी, भाकड नको. गायीचे दूध पौष्टिक असून गोमूत्रापासून कर्करोग बरा होतो. गाईला पशू म्हणणे एकांगीच!’ यानंतर दोघींना पुढे वाचवेचना. पहिली दुसरीला म्हणाली, ‘काय हे, आपणही हाडामांसाचे प्राणी आहोत हे हा देश विसरत चाललाय. घरात शिजवलेले अन्न हे आपले खाद्य नाही हे यांना ठाऊकच नाही. आपल्या पोटात प्लास्टिक, बॅटरीचे सेल, त्यातला जस्त जाऊ नये याविषयी ही जमात साधा विचारही करत नाही. बरे, भाकडांना हे तुच्छ समजतात. ‘गोशाळा बांधली की झाले समाधान’ या मानसिकतेतच अडकलेत सारे. हे दैवतीकरण आपल्या मुळावर उठणार! ‘यातल्या एकालाही क्रमांकात आणायचे नाही,’ हे म्हणताना पहिलीचा आवाज जरा चढला, तसे दुसरीने तिला शांत केले. ‘आताच्या राजवटीत असा नकार देता येत नाही. आलोच आहोत तर कुणालातरी क्रमांक देऊन स्वत:ची सुटका करू. हवे तर बक्षीस समारंभावर बहिष्कार टाकू.’ ‘अगं, पण बहिष्कार टाकणे तरी आपल्या हातात आहे का?’ यावर दुसरी म्हणाली, ‘न्यायला आले की उधळल्याचे नाटक करू.’ दोघींची कुजबूज थांबली. कसाबसा निकाल लावून त्या तिथून निघाल्या तर सरकारच्या संस्कृती खात्याचे पथक त्यांचे औक्षण करण्यासाठी उभे. थोडासा हसरा चेहरा करत तो सोपस्कार आटोपल्यावर दोघी रागाने धुसफूसतच गोशाळेत परतल्या. सायंकाळच्या बैठकीत त्यांनी जाहीर केले- जॉर्ज ऑर्वेलचे ‘अ‍ॅनिमल फार्म’ हे पुस्तक देशभर फुकट वाटायचे. किमान काहींना तरी आपली ताकद कळेल यानिमित्ताने!