25 February 2021

News Flash

खुसपटे काढायची नाहीत..

आधीच बजावून ठेवतो. उगीच खुसपटं काढायची नाय! मग ते बिप्लब देबांचे विधान असो की चाणक्याचे

(संग्रहित छायाचित्र)

आधीच बजावून ठेवतो. उगीच खुसपटं काढायची नाय! मग ते बिप्लब देबांचे विधान असो की चाणक्याचे. सध्या आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा. त्यामुळे देबांनी नेपाळ व श्रीलंकेत पक्षाची सत्ता येणार आहे असे गमतीने म्हटले तरी ते खरे समजायचे. देब मूळचे एका नेत्याचे स्वीय सहायक. अशांना नेता व पक्षाविषयी बढाई मारण्याची सवयच असते. त्यामुळे ते राज्यप्रमुख झाले तरी त्यांची सवय सुटली नाही असे अजिबात म्हणायचे नाही. भले त्यांच्या विधानावर पक्षाने सारवासारव केलेली असू देत. आमचा गुप्त अजेंडा तोच आहे. डावे जगभर पोहोचू शकतात तर आम्ही का नाही? शेवटी पक्ष विश्वगुरूचा आहे हे ध्यानात ठेवायचे. सततच्या विजयामुळे असे अतार्किक भास होतात असा समज अजिबात करून घ्यायचा नाही. श्रीलंकेत नाक खुपसल्यामुळे एका उमद्या नेत्याला जीव गमवावा लागला अशी भीती दाखवायचीच नाही. सत्तेमुळे आमची भीती कुठल्या कुठे पळून गेली आहे. त्या नेत्याने चुका केल्या. आम्ही कधीच चुकत नाही. नेपाळमध्ये तर सारे आमचेच बांधव आहेत. त्यांच्या डोक्यात घुसलेले ते लाल बावटय़ाचे भूत काढायचाच अवकाश. मग आमचे काम फत्ते. तुम्ही त्यांना स्वतंत्र देश समजत असाल पण  आमच्यात अखंड भारताचे रक्त भिनलेले. विस्तारवादाच्या आमच्या कल्पना अगदी स्पष्ट आहेत. जगाने आमच्या देशात लुडबुड करायची नाही. आम्ही मात्र जग पादाक्रांत करू. त्यामुळेच शेतकरी आंदोलनावर बाहेरचे कुणी बोलले की आमची आग होते. आम्ही मात्र ट्रम्पचा प्रचार करू, कमला हॅरिसचे स्वागत करू. एका भारतीय मुळाला अमेरिकेने स्वीकारले म्हणून होमहवन करू. मात्र सोनिया गांधी आम्हाला देशप्रमुख म्हणून चालणार नाही म्हणजे नाही. त्यासाठी आम्ही केशवपन करायला आजही तयार आहोत.   चीनचा विस्तारवाद  तर आम्हाला मान्यच नाही. त्यांच्या अखंड चीनपेक्षा आमचे अखंडतेचे स्वप्न फार जुने व प्राचीन आहे म्हणून! ते देब बोलले ते अगदी खरेच आहे. आमची विश्वगुरू व चाणक्याची जोडी केरळ व तमिळनाडूत शिरली रे शिरली की बघा कसा चमत्कार होतो ते. या दोघांच्या वादळी वाऱ्यासमोर सारे विरोधक पालापाचोळ्यासारखे उडून जातील. मग तिथून श्रीलंका किती दूर? आमच्या विचारांचा प्रसार वाऱ्याच्या वेगाने होत असतो. आम्ही त्या चिन्यांसारखे आर्थिक गुंतवणूक कर, बंदराचे कंत्राट घे अशी आडमार्गाची कामे कधीच करत नाही. थेट राजकारणात उडी घ्यायची, निवडणूक लढवायची हेच आमचे सूत्र. त्यातच आम्ही माहीर आहोत. कागदोपत्री स्वतंत्र असलेल्या देशात ते कसे राबवणार, असले लोकशाहीवादी प्रश्न विचारायचेच नाहीत आम्हाला. आमचा सारा प्लान तयार  आहे तिथे जाण्याचा. लोखंडी पेटी घेतलेल्या स्वयंसेवकांची फौजही अगदी तयार आहे. सध्या बौद्धिक सुरू आहे त्यांचे. होय, आम्ही श्रीरामाचे नाव भक्तिभावाने घेतो. श्रीरामाने लंकेवर स्वारी करून विजय मिळवला पण सत्ता मात्र रावणाचा भाऊ बिभीषणाला चालवायला दिली. आम्ही तसे करूच असे नाही. आमच्याजवळ  विश्वगुरू आहे ना! एकाच वेळी तीन देशांचा प्रमुख होण्याची क्षमता आहे त्यांच्यात. समजले ना! म्हणून शेवटी पुन्हा बजावतो. खुसपटं काढायची नाही म्हणजे नाही. बिप्लव देब, आगे बढो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2021 12:00 am

Web Title: loksatta ulta chashma article abn 97 87
Next Stories
1 गोशाळा ते ‘अ‍ॅनिमल फार्म’!
2 पोरखेळाची (हवाई) लढाई..
3 स्वदेशीचे धडे..
Just Now!
X