रस्त्याच्या मधोमध बंद पडलेली कार मित्रांच्या मदतीने ढकलत जवळच्या गॅरेजमध्ये नेईपर्यंत तात्या घामाघूम झाले होते. आजवर कधीही दगा न देणाऱ्या या गाडीला आज काय झाले असेल असा प्रश्न त्यांना सतावत होता. मेकॅनिकला वारंवार विनवणी केल्यावर तो त्रासिक चेहऱ्याने कारजवळ आला. जुजबी पाहणीनंतर त्याने निर्वाळा दिला. ‘यात कुणी तरी विमानाचे इंधन टाकले. त्यामुळे इंजिन बसले. आता ते पूर्ण खोलावे लागणार. मोठा खर्च येईल. आजकाल अशाच गाडय़ा दुरुस्तीला येत आहेत.’

हे ऐकताच तात्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला.  ‘ही नक्कीच त्या दिवटय़ा नचिकेतची करामत ’असे पुटपुटत ते  मेकॅनिकला दुरुस्तीचे पाहायला सांगून घराकडे जायला निघाले. दारात पाऊल ठेवताच त्यांचा आवाज चढला, ‘कुठाय तो नच्या..  हा कारभार करायला त्याला सांगितलाच कुणी? अरे, होऊ दे पेट्रोल शंभर नाही तर दोनशेचे. भरीन मी. पाहिजे तर कर्ज काढीन, घर गहाण ठेवेन, पण माझ्या नेत्यांना अडचणीत आणणार नाही. विकासासाठी हे सारे सहन करण्याची तयारी आहे माझी. सहा वर्षांपूर्वी विकासही होत नव्हता आणि दर वाढत होते म्हणून आंदोलन करायचो आम्ही. आता विकास होतोय तर वाढ होणारच ना! ही सत्ता म्हणजे ७० वर्षांच्या कष्टाचे फळ आहे आमच्या. साध्या पेट्रोलसाठी ती सोडून देणार का? काय गरज होती त्याला स्वस्तात मिळणारे विमानाचे इंधन कारमध्ये टाकायची. अरे, नसेल पटत ही दरवाढ तर पायी फिरायचे ना!  बापाचे नाव खड्डय़ात घालण्याचा अधिकार याला दिला कुणी? अरे, राष्ट्रभक्ती, प्रेम काही आहे की नाही? आता शाखेत मी कोणत्या तोंडाने जाणार? गेल्या चार दिवसांपासून समोरच्या चौकात ‘निम्म्या दरात पेट्रोल ’असे एक तरुण पुटपुटत होता तेव्हाच मला शंका आली होती. तरीही विश्वास ठेवला मी याच्यावर. रात्रभर उनाडक्या करायला याला कार पाहिजे. अरे, मागायचे होते पेट्रोलसाठी पैसे. दिले असते ना!’ आता मात्र काकूंना राहावले नाही. कमरेला पदर खोचत त्यांनीही आवाज चढवला. ‘अजिबात माझ्या नचूला बोल लावू नका. काय ते नेता, नेता, सत्ता, सत्ता घेऊन बसलात सारखे. आंधळेपणालाही काही सीमा असते. सारा देश या वाढीवर ओरडत असताना तुमचे भक्तीपुराण सुरूच! या महागाईने पार वाट लावलीय घरखर्चाची. ती कामवाली दुप्पट पगार मागतेय. आणि तुम्ही बँकेतल्या ठेवी पटापट तोडत चाललात त्या नेत्याच्या नादात. उद्या तब्येतीचे काही झाले तर पैसा नको का जवळ? नेते येतील का उपचाराचा खर्च करायला? ऊठसूट त्या नेहरूंना बोल लावता. अरे, तुम्ही काय केले ते सांगा ना! मूर्ख समजता काय आम्हाला?  पेट्रोलमुळे रिक्षा महाग, भाज्या महाग, याला विकास म्हणायचे का? हा तुमचा उलटा विकास. तो तुमचा एक मंत्री तर माझ्या गाडीत सरकार पेट्रोल भरते असे निर्लज्जपणे म्हणतो. अरे, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा. आणि हो, माझ्या लेकराला काही म्हणायचे नाही, सांगून ठेवते.’ तणतणतच काकू स्वयंपाकघरात निघून गेल्या. त्यांचे शांतपणे ऐकून घेणारे तात्या कारला येणाऱ्या दीड लाखाच्या खर्चासाठी कोणत्या बँकेतील ठेव मोडायची यावर विचार करू लागले. आणि नचिकेत.. तो तर भांडण ऐकून केव्हाच मागल्या दाराने पसार झाला होता.