‘काय हवंय? देणगी? अरे, कोण आहे रे तिकडे, यांना हजार रुपये देऊन टाक.’ असे म्हणून ते वळले. नोकराने दिलेले पैसे बॅगेत ठेवून त्याची पावती त्यांच्या मेजावर ठेवत तो बंगल्यातून बाहेर पडला. फाटक ओलांडल्यावर त्याने मागे वळून पाहिले तर ते नेते पहिल्या मजल्यावरून त्याच्याकडेच बघत होते. ते छद्मी हसत असल्याचा भास त्याला झाला. काय वाईट दिवस आले. एकेकाळी पक्षाच्या मुख्यालयातील आपल्या टेबलाभोवती नेते पैशाच्या बॅगा घेऊन उभे राहायचे. पावत्या फाडता फाडता हात दुखायचे. आता आपल्यालाच दारोदार भटकायची वेळ आलीय. पक्षाशी निष्ठा आहे म्हणून चार दशकांपूर्वी लेखपालाची जबाबदारी स्वीकारली. पगाराची अपेक्षा न ठेवता काम केले. आता पक्ष सत्तेबाहेर काय गेला तर सारेच माना झटकायला लागले. नेतृत्वाचे चुकलेच. जमीनदाराने दिवाणजीला जादाचे अधिकार दिल्यावर आणखी काय वेगळे होणार म्हणा! देशातला सर्वात जुना असलेला हा पक्ष आज गरिबी अनुभवतोय पण  नेते श्रीमंती. काय नाही दिले या नेत्यांना पक्षाने? खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद, बोलण्याचे तसेच टीकेचे स्वातंत्र्य. त्या बळावर गब्बर झालेले हे लोक आज मलाच तुच्छतेने वागवतात. पक्षातले ते दोन नामवंत वकील तर स्वपक्षीयांची केस लढायची असेल तरी मोजून पैसे घेतात. एकीकडे पक्षाला कुटुंब म्हणायचे व दुसरीकडे व्यवहार सोडायचा नाही. पुन्हा प्रत्येकवेळी राज्यसभा हवीच. आताचे सत्ताधारी बघा. पक्षच गतीने श्रीमंत झालाय. नेत्यांना श्रीमंत होऊ न देता. आपल्याकडे तर निधी मागितल्याबरोबर रडगाणे गाण्यात सारे तरबेज. परवा त्या नेहमी मदत करणाऱ्या उद्योजकाकडे गेलो तर मला पाहताच बावरला. कुणी बघितले तर नाही ना, असे दहादा विचारत होता. शेवटी लाखभरावर बोळवण केली. पावती नकोच, कशाला पुरावा ठेवायचा असे म्हणत होता. सत्तेत असताना हाच माझ्या खोलीत पाचपाच तास बसून राहायचा थैली घेऊन. आता पक्ष अडचणीत आला, साऱ्या ठेवी मोडायची वेळ आली. निवडणुकांसाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न निर्माण झाला म्हणून नेत्यांकडे चकरा मारतोय. काय अनुभव येतो एकेकाचा. या नेत्यांची आलीशान घरे, नोकरांचा मोठा लवाजमा. ‘आईए श्रीमानजी’ म्हणून होणारे स्वागत पण देणगीच्या नावावर कधी नन्नाचा पाढा तर कधी गणपतीची वर्गणी. काय एकेक बहाणे सांगतात हे लोक. आता पक्ष सत्तेत नाही, पैसा येणे थांबलेय, त्यात  मध्यंतरी धाडी पडल्यामुळे पैसा ब्लॉक झालाय, अशी हजारो कारणे. राहणीमानात मात्र अजिबात फरक पडलेला दिसत नाही. पक्षाच्या बैठकीत पदे वाटायची वेळ आली की हेच नेते हिरिरीने बोलणार. वारंवार घराण्यावरची निष्ठा सिद्ध करणार आणि हवे ते पदरात पाडून घेणार. अजिबात शिस्तच राहिली नाही पक्षात. त्या पोलादी बाईंच्या काळात कसे चळाचळा कापायचे हे नेते. नुसता माझ्या नावाचा उच्चार केला की रांग लावायचे माझ्या कक्षात. आता तर बैठका घेऊन, आवाहन करूनही निधी द्यायला कुणी पुढे येत नाही. पक्ष राहिला तर आपण राहू याचाच विसर पडलेला दिसतो साऱ्यांना. तसेही आजकाल निष्ठेशी काही घेणेदेणे नाही या लोकांना. अनेकजण तर कुंपणावरच दिसतात!

विचार करता करता लेखपालाने पक्षाच्या मुख्यालयात प्रवेश केला. त्याला पाहताच श्रेष्ठींना भेटायला आलेले दोन राज्यातले तीनचार मंत्री पटकन तोंड फिरवून मागच्या गेटने बाहेर जाण्यास वळले. आजकाल या सगळ्याची सवय झालेल्या वृद्ध लेखपालाला त्याही स्थितीत हसू आले.