लेडीज सीटकडे त्या दोघीही धावतपळतच आल्या, तेव्हा ते दोघे ठरल्याप्रमाणे जागचे उठले. पैकी एकाला पहिलीने जवळपास ओरडूनच सांगितले : ‘मटकीची उसळ केल्येय मिसळ मसाला घालून, गॅसवरच ठेवल्येय झाकून. हवं तर फरसाण आण. पोळ्या आहेत, पण मुलांना हवं तर लादीपाव विकत घे..’  पाठमोराच, ‘हां, हां..’ म्हणत तो उतरला. आणि हां हां म्हणता म्हणता डोंबिवलीच्या मानपाडा रोडवरून बसगाडी धावूही लागली. दोघींनी एकाच वेळी एकमेकींकडे पाहिले. आता गप्पा सुरू करायला हरकत नाही, याचा तो संकेत. दुसरी पहिलीला म्हणाली, ‘उद्या बहुतेक चॅनेलवाले येतील अगं’

– ‘कुठे इथे बसमध्ये?’

– ‘नाही.. स्टॉपवरच. नवऱ्यांच्या मुलाखती घ्यायला!’

पहिलीचा प्रश्नार्थक चेहरा पाहून दुसरी पुन्हा म्हणाली, ‘अगं लोकसत्ता नाहीस का वाचला.. त्यात दिलंय ना आज, नवरे रांगा लावतात म्हणून’

– ‘मग?’

– ‘अगं पेपरवाल्यांनी बातमी दिली की चॅनेलवाले पण येतात ना, म्हणून म्हटलं’

– ‘होऽ ? ए  पुरुषांना सांगितलं पाहिजे नं, जरा चांगले कपडे घालून  रांगेत उभं राहायला?’

पहिली गमतीनेच म्हणाली. आता पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरचा ताण जरा कमी झालेला दिसत होता. तिच्या विनोदाला अजिबात दाद न देता दुसरी म्हणाली, ‘कसले चांगले कपडे गं, वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यापासनं हाफपँटवरच फिरतायत आमच्याकडे.  रांगेतपण आत्ता पाहिलंस ना, तीच मळकी हाफ कागरे घालून कसा उभा असतो.. ’

यावर पहिली काय बोलणार? घरोघरी हेच, म्हणून गप्प राहिली. बोलणंही थांबल्यासारखं झालं. दुसरी पुन्हा मोबाइलवर दोन बोटांची चिमूट मिटत-उघडत काहीतरी पाहात होती. बहुधा ईपेपर वाचत असावी. पहिली विचार करू लागली-  गेले दोन दिवस, ऑफिसला जाणाऱ्या बहुतेक बायकांचे नवरेच असतात रांगेत सकाळपासनं. आपण कधी लक्ष नाही दिलं पण सगळय़ाजणी घरचं आवरून, नीट तयार होऊन येतातच आणि त्यांचे नवरे मात्र कोपऱ्यावर पेपर आणायला जसे जातात तस्सेच येत असणार.. पुरुष सगळे गबाळेच. पण जाऊदे. आपण बोललं की लगेच रागबीग यायचा. करतोय एवढं तर करू दे. मुलांकडेही बघतोय, बरं चाललंय.

‘येतायत ना रांग लावायला तरी, तेवढी मदत तर नक्की होतेय..’ – पहिलीचं ऐकून दुसरी उसळलीच. ‘मदत काय? करायला नकोत कामं? चपात्याभाजीआमटीभात सगळं आपण करायचं. बुधवारी फिश नाही म्हणूनअंडय़ाचं कालवण. आणि ऑफिसं सुरू झाल्यापासनं हे सगळंच्या सगळं सकाळी साडेआठच्या आत करायचं. आणि हे रांगा लावतात म्हणून  यांचं कौतुक.. आज पेपरवाले कौतुक करतायेत, उद्या चॅनेलवाले  यांचंच करतील. इट्स अ मॅन्स वर्ल्ड गं, आपलं कौतुक कधी नाहीच कुणाला’

पहिलीला पटत होतं, पण ‘काय एवढं मनावर घ्यायचं’ असा प्रसन्न मूड कायम ठेवून ती म्हणाली, ‘मी ठरवलंय, पुढल्या वर्षी याला सांगायचं, गेल्या वर्षी रांग लावायचास ना, तसा यंदा वडाला दोरा बांधून ये!’ टाळी देण्याऐवजी ‘थम्सअप’ दाखवत दोघी खळखळून हसल्या.. आजच्या दिवसात पहिल्यांदाच!