‘आज सात्तेतीनला नाहियेत त्या.. तीन्तेअक्राला या’ – हे ऐकून तो मागे वळला. आता याची सवय करावी लागणार आणि नरीमन पॉइंटच्या या भव्य वास्तूत आता एकाच दिवशी दोन हेलपाटे घालावे लागणार, असे मनाशी म्हणत तो खाली उतरू लागला. जिना उतरून आता बाहेर पडणार तोच संघटनेच्या फलकावर खडूने काही सूचना लिहिल्या जात असल्याचे त्याला दिसले आणि कुतूहलाने तो रेंगाळला. या रेंगाळण्याचा एक फायदा असा की, साऱ्या सूचना त्याला मनोमन टिपून घेता आल्या, त्या अशा :

(अ) अभ्यागतांसाठी सूचना :

(१) दुहेरी कार्यवेळा (शिफ्ट) लागू झाल्या आहेत, याची सर्वानी नोंद घ्यावी.

(२) सकाळी सात ते दुपारी तीन व दु. तीन ते रात्री अकरा अशा कार्यवेळा असल्या, तरी अभ्यागतांसाठी बदललेल्या वेळेचा उल्लेख जीआरमध्ये नाही. संबंधित जीआर निघाल्यावरच अभ्यागतांना नवीन वेळापत्रकानुसार प्रवेश दिला जाईल, याचीही नोंद घ्यावी.

(३) एकाच दिवशी एकाच कामासाठी एकाच व्यक्तीस दोनदा प्रवेश मिळणार नाही.

(४) नव्या वेळापत्रकात सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचे खाणे यांच्या वेळांचा समावेश नसला, तरी त्या पाळल्या जातील.

(५) दुपारी तीन ते रात्री ११ या वेळेतील मधल्या मोठय़ा सुटीला ‘लंच टाइम’ असेच म्हटले जाईल. (रात्री डिनर घेतात वगैरे सांगून आम्हाला इंग्रजी शिकवू नये).

इमारतीवर पाच मजले चढत  जातात तशा या पाच सूचना एकाखाली एक लिहिल्या जात असताना तो तल्लीन होऊन वाचत होता. या सूचनांचा ‘सहावा मजला’ तयार होण्याआधीच त्याची तंद्री भंगली, ती आसपासच्या आवाजांनी. यापैकी एक आवाज, ‘वरच्या लोकांची मजा आहे आता.. रात्री जातील कुणाकुणाबरोबर लंचला’ असा होता; तर त्याला उत्तर देणारा आवाज, ‘अरे खरी सजा कामावरून सरळ घरी न जाणाऱ्यांना आहे.. बसणार कधी आणि कुठे? आता आदित्यसाहेबांनी चोवीसतास मुंबई सुरू केली तरच जरा बसूनबिसून घरी जाता येणार.. तेही फक्त दुपारपाळीनंतर. सकाळपाळी आली की सगळे निव्र्यसनी. संध्याकाळी भाजी आणायला जायचं फक्त!’..

पुरुषवर्गाची ही व्यथा समजून घेताघेता काही मंजुळ आवाजही कानांवर पडले. ‘आपली सात्तेतीन म्हणून पोळ्यावाल्या बाईंना सक्काळी पाचला यायला सांगितलं गं मी, तर रागारागानं सोडूनच गेल्या’, ‘मी तर सरळ सांगते, मी कॅन्टीनमध्ये खाणार, तुम्ही तुमचं बघा.. मुलं मॅगीबिगी करून खातात हल्ली’, ‘ए पण परत जाताना बाजारात काही बघताच येत नाही गं..’, ‘अगं बाजारातच काय, लोकलगाडीतले विक्रेतेही नसतात आपल्या वेळांना’ .. एकंदरीत, आपले काम आज(ही) न झाल्याचे दु:ख फारच कमी, हे उमगून शीळ घालतच तो चालू लागला.