News Flash

शशिकलानाटय़

काय, शशिकलांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला? अहो थांबा, एवढय़ाने घाईघाईत निष्कर्ष काढू नका.

(संग्रहित छायाचित्र)

काय, शशिकलांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला? अहो थांबा, एवढय़ाने घाईघाईत निष्कर्ष काढू नका. ती तमिळ राजकीय संस्कृती आहे. भल्याभल्यांना अचंबित करणारी. युतीसाठी मुंडावळ्या बांधून तयार असलेल्या त्या कमळाबाईंनाही जरा शांत राहायला सांगा. उगीच कुंडल्या बघून राजकीय मंगळ तर नाही ना, याचा शोधही घेऊ नका म्हणा! देशाला चकित करणारे राजकारण केवळ दक्षिणेत व त्यातल्या त्यात तमिळनाडूतच घडते. ठाऊक नाही? मग जरा इतिहासात डोकवा की! ‘एमजीआर’ गेल्यावर जानकीबाईसुद्धा आधी नाहीच म्हणाल्या होत्या राजकारणात यायला. मग अचानक त्या तयार झाल्या आणि नंतर सभागृहात जो इतिहास घडला तो अनेकांच्या मन:पटलावर अजून कोरलेला आहे. तोच तो झिंज्या ओढण्याचा. आता तसे घडणार नाही हो! कारण मामला दोन मैत्रिणींतील भावबंधाचा आहे. त्यामुळे शशिकलांची आताची राजकीय विरक्ती फार तर तात्पुरती समजा तुम्ही. पुढे काय होईल ते बघाच.. जसजशी राजकीय रणधुमाळी तीव्र होत जाईल तसतशी शशिकलांना पडणाऱ्या स्वप्नात वाढ होत जाईल. मग एक दिवस स्वप्नात थेट अम्माच येतील. त्या सांगतील ‘शशिकला, हो तू समोर. माझे स्वप्न साकार करण्यासाठी तुला मैदानात उतरावे लागेल. जनतेला ‘स्त्रियांसमोर लोटांगण घालणारे पुरुष’ असले प्रकार आवडतात. त्यामुळे तू रणांगणात उतरलीस की पाचदहा टक्क्यांचा फरक सहज पडून जाईल.’ मग हा स्वप्नदृष्टांत जनतेला ऐकवला जाईल. अगदी साश्रू नयनांनी. त्यावर राज्यभर चर्चा घडेल. छाती पिटून, ऊर बडवून रडण्याची नाटके ठिकठिकाणी यथासांग पार पडतील. हे बघून शशिकला मैदानात उतरतील. कारण अतिनाटय़ हाच येथील जनतेचा स्थायिभाव आहे. ते एकदा पचनी पडले की काम झाले. आजकाल तसेही नाटकाशिवाय राजकारण होतेच कुठे? डोळ्यांत पाणी येणे ही प्राथमिक अटच ठरली आहे हल्ली राजकारणाची. एकदा हे झाले की अम्माच्या राहिलेल्या स्वप्नांचा विजय ठरलेला. हो, आणखी एक सांगायचे राहिलेच. शशिकला म्हणतील, राज्याचा कारभार अम्मांच्या पादुका ठेवून चालवला जाईल. आता या पादुका काही वर्षांपूर्वीच्या छाप्यात जप्त केलेल्या असतील की आणखी कोणत्या, ते विचारू नका. या पादुकांनाही इतिहास आहे. रामायणात भरताने दक्षिणेकडे जाऊन वनवासातील प्रभू रामचंद्रांच्या पादुका आणल्या व उत्तरेत अयोध्येवर राज्य केले. त्याचीच री आता ओढली जाईल. फरक एवढाच की उत्तरेऐवजी दक्षिण. यामुळे कमळाबाई एकदम खूश. शेवटी दक्षिणेतही राम कामी आला म्हणून! त्यामुळे युतीच्या शोधात असलेल्या कमळाबाई तमिळनाडूत वारंवार तोंडघशी का पडतात, या प्रश्नाचे उत्तरसुद्धा आपसूकच मिळून जाईल. तेव्हा चॅनलीय चर्चेत तर्कट मांडण्याची घाई करणाऱ्या कथित विद्वानांनो, उगीच धाडकन् निर्णयावर येण्याची घाई करू नका. नाही नाही म्हणता चार वर्षे गजाआड घालवलीत शशिकलांनी. आजकाल तर ही पात्रता असते राजकारणप्रवेशाची. आणि कमळाबाईंनी उगाच नाही त्यांची सुटका करवून घेतली! त्यामुळे जरा धीर धरा. तुरुंगात घालवलेल्या एकेक क्षणाची पुरेपूर किंमत वसूल करण्यासाठी त्या येतीलच राजकारणात. अम्मांचे स्वप्न साकार करणे म्हणजे काय साधासुधा मामला वाटला की काय तुम्हाला? त्यात नाटय़ हवेच ना! शशिकलांचे हे नाटय़ उमगत नसेल, तर पाहा त्या चंद्राकडे.. तोही अमावास्येकडून पौर्णिमेपर्यंत पोहोचतोच ना?.. तेव्हा विश्लेषकांनो, सावधान!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2021 12:04 am

Web Title: loksatta ulta chashma article abn 97 93
Next Stories
1 आवाज पोहोचत नाही..
2 सत्तेचा ‘पुशअप’
3 परदेशात नव्हे, अंतराळात..
Just Now!
X