वृत्त निवेदिका – नमस्कार, सकाळी आठच्या ‘बातम्यां’मध्ये आपलं स्वागत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंग रावत यांनी सोमवारीच भावी राम कोण, यावर शिक्कामोर्तब केल्याने परमभक्त हनुमान कोण, यावर देशपातळीवर चर्चा सुरू झाली आहे. केंद्र स्तरावरील काहीजण स्वत:ला हनुमान म्हणवून घेत असले तरी आपला संघराज्यीय विस्तार लक्षात घेता राज्यातील नेत्यांची मते आम्ही जाणून घेतली. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव त्यांची ही मते  सादर करत आहोत.

शिवराजसिंग चव्हाण – मी एकदा अडवाणींसाठी हनुमान बनून हात पोळून घेतले. त्यामुळे आता मला त्यात रस नाही. तसेही बरेचदा कर्मचारी मला हातावर उचलून नेत असतात. त्यामुळे हनुमान असल्याचा साक्षात्कार मला अधूनमधून होतच असतो. आमच्या राज्यातला चित्रकूट पर्वत त्याने उचलून नेला. तो अजूनही परत आणून दिला नाही. तसेही सध्याची स्थिती बघता मला हनुमान व्हायचे नाही.

विजय रूपानी – अहो, मी भरत आहे. २०१४ पासून आम्ही रामाच्या पादुका ठेवून राज्य करतो आहोत. त्यामुळे मी हनुमान कसा होऊ शकेन?

योगी आदित्यनाथ – अरे, आम्ही रामाच्या राज्यात राहणारे लोक. हनुमान तर आमचा पाहुणा होता. भले त्याचे ‘लंकादहन’ मला आवडत असले तरी त्याच्यासारखे होणे मला आवडणार नाही. एक योगी काय होऊ शकतो यावर जरा लांब पल्ल्याचा विचार करा. आगे आगे देखो होता है क्या?

तिरथसिंग रावत – रामाची निवडच मी केल्यामुळे हनुमान होण्याचा पहिला हक्क माझाच आहे. आमचा प्रदेश पहाडी असल्याने ही भूमिका बजावण्यात मला काहीही अडचण येणार नाही.

येडियुरप्पा – मी तसा महाभारतप्रेमी आहे. त्यामुळे नुकतेच मी भैरप्पांच्या ‘पर्व’ कादंबरीच्या नाट्य रूपांतरासाठी एक कोटी रुपये मंजूर केले. त्यातल्या त्यात मला कृष्ण आवडतो. कृष्णभक्तीत मी नेहमी रममाण होत आलो. तसेही आता वयपरत्वे, पर्वत वगैरे उचलणे मला झेपणार नाही तेव्हा कृपा करून असले अडचणीचे प्रश्न विचारू नका.

नितीशकुमार – हनुमान? अहो मी बिभीषण आहे. प्रश्न विचारण्याआधी जरा इतिहास वाचत चला. रामाने लंकेवर विजय मिळवला पण राज्य चालवण्यासाठी रावणाचा भाऊ बिभीषणाची निवड केली. माझ्याही बाबतीत तसेच घडले ना! मला याच भूमिकेत राहू द्या. मी सुखी आहे इथे.

प्रमोद सावंत – हे बघा, आम्ही अस्सल गोंंयकार. दुपारी दोन तासाची वामकुक्षी घेतल्याशिवाय आमचे जमत नाही. हनुमानाला तर कायम सजग राहावे लागेल. त्यामुळे सध्यातरी तसा काही विचार नाही.

देवेंद्र फडणवीस – ‘या ठिकाणी’ मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी सध्या पदावर नाही. रामाचे वास्तव्य आमच्या भागात होते. त्यामुळे आमची रामभक्ती इतरांपेक्षा श्रेष्ठ होती, आहे व राहणार. राज्यात परत एकदा सत्ता आणून दिली की हनुमान व्हायला मी केव्हाही तयार आहे.

सर्बानंद सोनोवाल – आमच्या आसामात रामायण फार लोकप्रिय नाही हो! तरीही निष्ठावान कार्यकर्ता म्हणून माझी रामावर श्रद्धा आहेच. त्यामुळे वरून आदेश आला तर हनुमानही होऊ!

बिप्लब देब – पुराणकथांना आधुनिक संदर्भात मांडणे हा माझा आवडता छंद आहेच. मात्र मी फारच लहान राज्याचा प्रमुख असल्याने मला हनुमानाचा भक्त सुग्रीव व्हायला आवडेल.

वृत्तनिवेदिका : नक्कीच, हनुमान दक्षिणेकडचा होता पण तेथील नेते निवडणुकीत व्यग्र असल्याने त्यांचे ‘बाईट’ मिळू शकले नाहीत. इतर सर्वांची मते आपण जाणून घेतली आहेतच. आता प्रेक्षकांची मते जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत, नमस्कार!