आसाम विधानसभा निवडणुकीत कुठल्याशा राताबारी मतदारसंघातील मतदान आटोपल्यानंतर मतदान यंत्रे अर्थात ईव्हीएम एका भाजप नेत्याच्या गाडीत सापडल्यावरून नुसता गदारोळ उठला आहे. आधी म्हणत होते, भाजप ईव्हीएममध्ये गडबड करते. आता म्हणतात, भाजपच्याच गाडीतून मतदान यंत्रे नेण्यात येत होती. अरे, ईव्हीएम म्हणजे काय मतपत्रिकेचा डबा आहे का, की गाडीतल्या गाडीत मारले शिक्के आणि कोंबले मतपेटीत. चायबिस्कुट मीडिया कुठला! अरे, ते विरोधक आहेत- काहीही आरोप करतील. म्हणून तुम्ही काय लगेच त्यांना इतकी प्रसिद्धी द्यायची? खऱ्याची दुनिया नाही राहिली. साध्या मदतीचेही राजकारण. राईचा पर्वत केला नुसता. छेऽ छेऽ… कसे रामराज्य येणार या देशात! त्या रामराज्यातही सीतामातेवर शिंतोडे उडवणारे होतेच म्हणा. हे मीडियावालेदेखील तसलेच… गावची धुणी धुवत बसतात. आता साधी गोष्ट होती. त्या राताबारी का काय त्या मतदारसंघात मतदान झाले. शिरस्त्याप्रमाणे ती सगळी ईव्हीएम मतमोजणीपर्यंत सुरक्षित ठेवण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांचे पथक गाडीतून ठरल्या ठिकाणी निघाले. रात्री ९ वाजता त्यांची गाडीच बिघडली. आधीच रात्रीची वेळ, तशात वेळेत नेमून दिलेल्या ठिकाणी पोहोचायची घाई आणि बरोबर ईव्हीएम नावाचे जबाबदारीचे लचांड. मग कोणीही शहाणा जे करेल तेच केले त्या अधिकाऱ्यांनी. दाखवला हात गाडीला. गाडीवानही भला माणूस. त्याने लगेच ईव्हीएमसह त्या अधिकाऱ्यांना गाडीत घेतले. नक्कीच राष्ट्रवादाचे बाळकडू मिळालेले असणार! त्याशिवाय का इतका सुसंस्कृत? राष्ट्रकार्यच ते… त्यामुळे एकमेकांना मदत करायलाच हवी. तर… पुढे गेल्यावर हाऽऽ जमाव. गाडी थांबवली आणि म्हणे भाजपच्या गाडीत मतदान यंत्र नेण्यात येत आहे, हा मोठा निवडणूक घोटाळा आहे! आता घ्या!! देशभर गोंधळ उडवलाय नुसता. आमच्या महाराष्ट्रातल्या जुन्या मित्राला तर आयतीच संधी मिळाली. म्हणतात कसे, ‘‘ईव्हीएमवरील उरलासुरला विश्वास उडविण्याबरोबरच निवडणूक आयोगाच्या झोलबाजीवर या प्रकारामुळे शिक्कामोर्तब झालेय.’’ अरे, जिभेला काही हाड. जणू काही नव्वदच्या दशकात बिहार-उत्तर प्रदेशात कसे बंदुकीच्या धाकाने मतपेटी पळवायचे तो प्रकार. कमाल आहे. म्हणजे भाजपच्या लोकांनी राष्ट्रीय कार्यात मदतच करायची नाही का? रात्रीबेरात्री त्या निवडणूक अधिकाऱ्यांना व त्यांच्या पथकाला असेच रस्त्यावर सोडून द्यायला हवे होते का? बरे, विरोधकांना समज नाही हे ठीक… मीडियाबद्दल तर न बोललेले बरे! आणि निवडणूक आयोगासारख्या नि:स्पृह यंत्रणेसाठी ‘झोलबाजी’ हा शब्द? असे काय घोडे मारले आयोगाने? अरे, त्या भाजपच्या हिमंत बिस्वा शर्मा यांनी आसाममधील एका छोट्या पक्षाच्या प्रमुखाला ‘एनआयए’ची भीती दाखवून तुरुंगात पाठविण्याची धमकी दिल्याच्या बातम्या दिल्या गेल्या. ते पाहून त्यांच्यावर निवडणूक आयोगाने लागलीच ४८ तासांची प्रचारबंदी लावली. आता माणुसकीचा काही विचार असतो की नाही? त्यानुसार केली थोडी कमी आणि ४८ तासांची बंदी २४ तासांवर आणली, तर असे कोणते पाप केले? म्हणे, हे सर्व निर्णय निवडणूक आयोग कोणाला तरी खूश करण्यासाठी करतो. हा आयोगही जरा विचित्रच. जरा आरडाओरडा झाला नाही, की लगेच त्या अधिकाऱ्यांवर कारवाईही केली. त्या ममता व तृणमूलकडे बघा की जरा, एक नाही शेकडो गोष्टी सापडतील. करा जरा त्यांच्यावर कारवाई…