‘अरे हे घर आहे की होस्टेल? म्हणे टेबलावर ठेवलेले अन्न एकेकाने वाढून घ्यायचे. साऱ्यांची जेवणाची वेळ एकच म्हटल्यावर दहा जणांची गर्दी आलीच. ती व्हायला नको म्हणून रांगेत लागायचे. वेगवेगळ्या ठिकाणी बसून जेवायचे. आयुष्यभर अनुभवलेली एकत्र जेवणाची गंमत गेली. काय दिवस आणले या करोनाने. हा आपला उदय आहे ना, जरा अतिच करतो. आता म्हणे घरातही मुखपट्टी. एकदा ती तोंडावर चढली की सारेच एकमेकांकडे संशयाने बघणार. काल त्या धाकट्या तनयच्या मुलीला ‘अनुजा इकडे ये’ असे प्रेमाने म्हटले तर ती ‘मी अनुजा नव्हे तनुजा’ म्हणत खोलीत पळाली. या भल्यामोठ्या मुखपट्ट्यांमुळे नातवंडेही ओळखू न येणे यापेक्षा दुर्दैव ते कोणते? खजिल होऊन इकडेतिकडे पाहात पुन्हा त्याच्या खोलीकडे बघितले तर सुनेचे वटारलेले डोळेच दिसले. घरातल्या घरात राहून कुणी जवळही यायचे नाही म्हणे! अरे, हे उतारवय नातवंडांच्या सहवासाला आतुरलेले असते रे!’ अंगणातल्या झोपाळ्यावर बसून सुरू असलेली नानांची बडबड शेजारी खुर्ची टाकून बसलेल्या नानी शांतपणे ऐकत होत्या. स्वेटर विणता विणता त्यांनी वर पाहिल्याबरोबर नानांनी गळ्याखाली आणलेली मुखपट्टी परत तोंडावर चढवली. त्या अटकाव करत नाहीत हे लक्षात येताच नानांना हुरूप आला व पुन्हा ते बोलू लागले. ‘परवा वामकुक्षी घेत असताना तीनचारदा शिंका आल्या तर लगेच दोन्ही पोरांची धावपळ सुरू. मी जिवाच्या आकांताने सांगून राहिलो, या ‘त्या’ शिंका नाहीत. जेवल्यावर विड्याचे पान खाताना मुखपट्टी लावलेली होती. त्या पानातली थंडाई पट्टीवर उडाली म्हणून शिंकतोय. तरीही ते ऐकायलाच तयार नाहीत. सारखा दवाखान्याचा आग्रह. शेवटी शिंका थांबल्या तेव्हाच शांत झाले. आता मुखपट्टी लावून पान खायची सवय करून घ्यावी लागणार. पान खाऊन थुंकणे विसरावे लागणार. तरी बरे, तंबाखू खात नाही मी’ नानांनी हे म्हणताच नानी त्यांच्याकडे बघून आदरयुक्त हसल्या. त्यामुळे आनंदून जात ते पुन्हा सुरू झाले. ‘या करोनाने घरात एकाचे तीन टीव्ही केले. अरे मुखपट्टी लावू पण एकत्रच टीव्ही बघू असे दोघांनाही सांगितले पण त्यांनी ऐकले नाही. आपले ठीक, पण मुलांनी ऐकले नाही नि झालाच संसर्ग तर मग काय, असा दोघांचा सवाल. आवडीचे कार्यक्रम एकत्र बघण्याची मजाच गेली. नातवांच्या बाळबोध प्रश्नांना मुकलो ते वेगळेच. स्वत:च्या खोलीतून चार वेळा आतबाहेर केले तरी दोघे व सुना नाराजीने बघणार. परवा नवा ‘मास्क’ दे असे खोलीबाहेरूनच सांगितले तर मोठा ‘फ्लास्क’मध्ये चहा घेऊन आला. एकदा चहा आल्यावर ब्रेड मागितला तर धाकटा ब्लेड घेऊन आला. तीन दिवसांपूर्वी दुपारी दार लावा म्हटले तर तू ‘साऱ्या सुरीकात्र्यांना आताच धार लावलीय’ म्हणालीस. आधीच माझे अर्धे दात पडलेले, त्यात ही मुखपट्टी. म्हणून हा गोंधळ! त्यामुळे आजकाल काही सांगायचीही भीती वाटते. ते शेजारचे तात्या आता फोनवरच भेटतात, त्यांचेही अनेक शब्द कळतच नाहीत. त्या दोन बहिऱ्यांच्या गोष्टीसारखी अवस्था झालीय. त्यातला एक पारावर बसलेला. तो रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्याला विचारतो ‘काय बाजारात चालले का’ दुसरा म्हणतो ‘नाही नाही बाजारातच चाललो’ मग पहिला म्हणतो ‘नाही मला वाटले बाजारात चालले’ – ऐकून नानी हसल्या. म्हणाल्या, ‘कालच उदय सांगत होता. आता घरातही मुखपट्टीच्या वर मुखावरण घालण्याचा नियम येणार म्हणे’ हे ऐकून तात्यांचे झोके घेणे थांबले.