हो, लागला असेल सिमेंटचा शोध ग्रीसमधल्या पोर्टलँडच्या बेटावर, इमारतीसाठी लागणाऱ्या काँक्रीटचे तंत्रज्ञानसुद्धा असेल परदेशातले. म्हणून काय सदासर्वकाळ त्याचाच उदोउदो करत राहायचे? अरे कधी तरी आत्मनिर्भरतेचा विचार आपण करणार की नाही? आता होतेच की सिमेंट भारतात तयार. काँक्रीटमध्येही किती नवनवीन प्रयोग केलेत परिवारातल्या लोकांनी. त्याचा अभ्यास करायचे सोडून विदेशी तंत्रज्ञानाचे गोडवे किती काळ गात बसणार? ते काही नाही. आता सारे बंद म्हणजे बंदच! अरे, रामायण, महाभारत जरा वाचा. पानोपानी तुम्हाला अभियांत्रिकीचे नवे आविष्कार दिसतील. फक्त त्यासाठी नजर ‘उजवी’ हवी. किती काळ विदेशींचे अंधानुकरण कराल? जरा देशातल्या संशोधनाकडे लक्ष द्या. काय म्हणता? उपयोजित यंत्रशास्त्र या विषयाचे एकही देशी पुस्तक उपलब्ध नाही? थांबा जरा, ‘विचारधन प्रेस’मध्ये शेकडय़ाने पुस्तके छापली जात आहेत या विषयावरची. परिवारातले २५ विद्वान कामाला भिडले आहेत. आम्ही आधी उपाय शोधतो व मगच निर्णय घेतो हे लक्षात ठेवा. नसेल या विषयावर एकही भारतीय संशोधन उपलब्ध, पण आम्ही देऊ ती पुस्तके तर देशी भाषेतली असतील ना! त्यालाच स्वदेशी समजून वाचायचे. आणि त्या टाटा-मॅग्रोहिल प्रकाशनाचे तर नावही काढू नका. आजवर साऱ्या विदेशी पुस्तकांचा मारा केला त्यांनी विद्यार्थ्यांवर. म्हणूनच मुले परदेशी पळतात. स्वदेशीचा गुण शिक्षणातूनच रुजवला तर कुणी तिकडे जाणार नाही. त्या ‘लॉ रिसोर्सेस’च्या संकेतस्थळावर तर बंदीच घालायला हवी. देशी लेखकांना वावच नाही तिथे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात उगाच भारतीयांबद्दल हीन भावना तयार होते. संशोधन, सिद्धांत असू द्या हो परदेशी. त्याला भारतीय स्वरूपात सादर केले तरच विद्यार्थ्यांना देशीवाद कळेल आणि ते आत्मनिर्भर होतील ना! मग ‘विचारधन’मध्ये तेच तर सुरू आहे. तरीही आम्ही चीनच्या मार्गाने जात नाही. त्यांनी तर सायबरमधून पूर्ण उचलेगिरीच केली. कुणी म्हणेल, सोलरमधले सगळे संशोधन चीनचे! अरे ते चोरीवर आधारलेले आहे. आम्ही तर शुद्ध देशी साजात सारी पुस्तके आणू. देशातल्या साऱ्या प्रकाशकांना सूचना दिल्यात. अभियांत्रिकीची पुस्तके कुणीच छापायची नाहीत, ‘विचारधन’मधून घ्यायची म्हणून! तिकडे कोस्टगार्डलाही सांगून ठेवलेय. परदेशी पुस्तकांची तस्करी पकडा म्हणून. आणि त्या संकेतस्थळांची चिंताच करू नका. एकेक करून सारी बंद केली जातील. बरेच विद्यार्थी केवळ नोट्स वाचतात, पुस्तके नाही.. हे अजिबात चालणार नाही यापुढे. किमान या विद्याशाखेत तरी त्यांना देशी पुस्तके वाचावीच लागतील. स्वबळावर उभे राहण्यासाठी कठोर पावले उचलायची वेळ आली आता. या शाखेत आधी रशियन पुस्तकांचा बोलबाला होता. मग वेगवेगळ्या देशांतली पुस्तके आली. अखेर परदेशी विचारावर किती काळ विद्यार्थ्यांना पोसायचे? म्हणून तर आता स्वदेशीचा आग्रह धरतोय आम्ही. काय म्हणता? भारतीय संशोधनाला जगात मान्यता नाही. अहो, गेले ते दिवस. आता फक्त आमच्या नेत्याने एक शब्द टाकायचा अवकाश; की पाहिजे त्या संशोधनाला पटकन मान्यता मिळेल. त्यांचा गोबरगॅसचा आविष्कार जगभर नावाजला गेलाच की!  विद्यार्थी नाराज असतील म्हणताय, ते असू द्या हो, सरळ मार्गाने ऐकले नाही की त्यांनाही आंदोलनजीवी ठरवून टाकू. त्यात काय एवढे! पण स्वदेशीशी तडजोड नाही म्हणजे नाहीच. काय म्हणतो ते समजले ना!