22 October 2020

News Flash

चुकले ते बैलांचेच..

बैल माणसांचा गुलाम, तसा माणूस सरकारचा गुलाम याच मानसिकतेत सारे अडकलेले.

संग्रहित छायाचित्र

तसेही ते बिचारे आयुष्यभर तोंडावर पट्टी बांधूनच असतात. मालकाने टोचणी दिली की चालायचे व वेसण ओढली की थांबायचे, एवढेच त्यांना ठाऊक असते. फारच त्रास झाला तर मटकन खाली बसायचे व राग आला तर फुरफुरायचे. कामाच्या ओझ्याखाली ओरडणे विसरून गेलेल्या या जनावराला इवलासा विषाणू घाबरवणे तसे अशक्यच. पण करोनांधळे झालेल्या प्रशासनाला हे कोण सांगणार? काढला आदेश त्यांनी. मुखपट्टी असेल, तरच बैलपोळा. तसेही गेल्या काही महिन्यांपासून असे हजारो आदेश न कुरकुरता पाळण्याची सवय माणसांना झालेली. तिथे बैलाचे काय? ते तर आजन्म आदेशच पाळत आलेले. त्यामुळे प्रशासनाचा आदेश माणसांसाठी आहे की बैलांसाठी याची खातरजमा न करताच मुखपट्टीचा साज या मुक्या प्राण्याला चढवला गेला, तोही त्याचा सण अशी ओळख असलेल्या पोळ्याच्या दिवशी. मुखपट्टीचा आकार माणसाचे तोंड पाहून बनलेला. बैलाचे तोंड मोठे. तरीही मागचापुढचा विचार न करता बांधली पट्टी बैलाला. जिथे माणसेच विरोध करणे विसरू लागली तिथे बैलाचे काय? त्यांनी मान न हलवता हा साज चढवून घेतला. त्यांना वाटले, असेल हा पोळ्याच्या निमित्ताने सजवण्याचाच एक प्रकार. खरे तर हा सण बैलांना काय हवे हे ओळखण्याचा. त्यांना वंदन करून त्यांच्या मेहनतीचे गोडवे गाण्याचा. अशा दिवशी तरी त्यांना मोकळा श्वास घेता यावा याचा विचार ना सरकारी बाबूंनी केला, ना माणसांनी! आपली भीती दुसऱ्याच्या पदरात टाकणे हा माणसाचा खास गुणधर्म. हे निमित्त साधून माणूस या भीतीचा धोंडा बैलाच्या गळ्यात टाकून मोकळा झाला. बैलाला मुखपट्टी बांधण्यात आली! सारासार विवेक न बाळगता सरकारी आदेश पाळण्याची आपली सवय तशी जुनी. पार स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची. यालाच गुलामाची मानसिकता असेही म्हणतात म्हणे! बैल माणसांचा गुलाम, तसा माणूस सरकारचा गुलाम याच मानसिकतेत सारे अडकलेले. त्यामुळे आदेश कुणासाठी याची शहानिशा न करताच तो पाळण्याचा सोपस्कार पूर्ण झाला. मुखपट्टीमुळे श्वास घ्यायला त्रास झाला तर ती खालीवर करण्याचे भान माणसांच्या अंगी. बैलांच्या नशिबात तर तेही नाही. त्यामुळे त्यांच्याच सणाच्या दिवशी त्यांच्यावर श्वसनावरोध सहन करण्याची पाळी आलेली. इकडे माणूस मात्र सणाच्या निमित्ताने गोडधोडात व्यग्र. मोकळे सोडलेल्या बैलांनी पिके खाऊ नये म्हणून त्यांच्या तोंडाला मुसक्या बांधण्याची पद्धत फार जुनी व माणसांच्या अंगवळणी पडलेली. त्याचाच आधुनिक प्रकार म्हणजे ही मुखपट्टी असा सुज्ञ विचार करून माणसांनी हा उपद्व्याप केला असेल तर त्याला दोष तरी कसा द्यायचा?

आता उरले प्रशासन. त्यांना तर आदेश काढणे व नंतरच्या सारवासारवीची सवय जडलेली. त्यामुळे त्यांचेही चुकले नाहीच.

चुकले ते बैलाचे. आता त्यानेच आदेश झुगारण्याची, निषेध करण्याची, कुणी अन्याय केला तर त्याविरुद्ध लढण्याची, जाच, त्रास सहन न करण्याची सवय लावून घ्यायला हवी. विवेकशून्य होत चाललेल्या व्यवस्थेत प्राण्यांकडून अपेक्षा बाळगली तर त्यात गैर ते काय? बुद्धीचा थोडा अंश त्यांच्यात झिरपला तर ते किमान विवेकाने तर नक्कीच वागू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:00 am

Web Title: loksatta ulta chashma article on bail pola abn 97
Next Stories
1 ‘मस्कऱ्या’..
2 प्रतिक्रिया आहेत.. क्रिया कधी?
3 पार्थशैली की पवारशैली?
Just Now!
X