किती उत्तम योग जुळून आला होता खरे तर! पण नाही… राममनोहर लोहियांची जयंती अभिनव पद्धतीने साजरी करण्याचा आनंद बिहारचे मुख्यमंत्री आणि पूर्वाश्रमीचे लोहियावादी नेते नितीशकुमार यांना मिळू शकला नाही. तो हिरावला गेला. अर्थातच, विरोधी पक्षीयांनी आणि त्यातही ‘लालूपुत्र’ तेजस्वी यादव यांनी मिठाचा खडा टाकला. एवढे नेमके झाले तरी काय?

गोवामुक्तीचे अग्रणी  व ‘बिगरकाँग्रेसवादा’चे प्रणेते लोहिया यांच्यानावे उत्तर प्रदेशात एक कायदा विद्यापीठ आहे. त्याच राज्यातील ‘डॉ. आंबेडकर पोलीस अकादमी’ने मध्यंतरी लोहिया कायदा विद्यापीठाशी करार केला की, पोलीस अधिकारी वा वरिष्ठांना कायद्याचे धडे तुम्हीच द्या. उत्तर प्रदेशपेक्षा बिहारला नेहमीच पुढे राखण्यास नितीश आसुसलेलेच. त्यांनी अशी खेळी केली की, बिहारच्या पोलिसांना- किंवा त्यांपैकी अनेकांना- फार कायदेबियदे पाळावेच लागू नयेत!  त्यासाठी नितीश यांनी ‘बिहार सैन्य पुलीस’ म्हणून आधीपासूनच ओळखल्या जाणाऱ्या खास दलाचे रूपांतर आता आणखी खास दलात करून, ‘बिहार सशस्त्र पुलीस बल’ असे नवे नाव त्याला ठेवले. हा नावबदल काही फक्त शेताऐवजी शिवार म्हणण्यासारखा नसून, खरोखरच या ‘बला’ला बरेच अधिकार मिळणार आहेत. बिहारमध्ये जे कायदे लागू आहेत (हा विनोद नव्हे), त्यांपैकी अनेक कायद्यांच्या वर हे ‘बल’ असेल.  झडती, अटक वगैरे करण्याचे इतके अधिकार या बलाला असतील की ‘देश जानना चाहता है’वाल्या वाहिन्यांना या बलासाठी एखादा गडी २४ तास नेमावा लागेल. अशा या अमर्याद शक्तीच्या ‘बला’चे विधेयक बिहार विधानसभेत २३ मार्चला, लोहियांच्या जयंतीदिनी मांडून बिहारने उत्तर प्रदेशाला, ‘तुमच्यासारखे विद्यापीठ आमच्याकडे नाही, पण आमच्या पोलिसांना त्याची गरजच नाही’ असाच संदेश कोणत्याही जाहिरातीविना दिला नसता काय? पण तसे होणे नव्हते. ‘लालूपुत्रा’चे नेतृत्व मानणाऱ्या ७४ जणांनी या विधेयकाविरुद्ध निदर्शने केली. मग पोलिसांनीच या आमदारांना अक्षरश: खेचत बाहेर नेले. ती दृश्ये लालूपुत्रानेच समाजमाध्यमांवर सुसाट सोडली आणि वर ‘लोहिया जयंतीदिनी हे केलेत तुम्ही नितीश!’ अशी भावपूर्ण बतावणीही केली. ‘विरोधक पोलिसांना कमकुवतच ठेवू पाहातात’ असे प्रत्युत्तर नितीश कोणत्या तोंडाने देणार, इतकी ताकद पोलिसांनी दाखवली होती!

पण लोहियाजयंतीस बिहारच्या पोलिसांची ही ताकद – तीसुद्धा त्या नव्या विधेयकाआधीच- पाहून मनोमन सुखावले असतील ते केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद. महाराष्ट्रातील पोलिस आणि लोकप्रतिनिधी यांच्या झुंजीबद्दल प्रसाद बोलत असले, तरी त्यांचे मन स्वत:च्या बिहार राज्यात घुटमळणारच… आणि बिहारात आमदारांपेक्षा ‘चोपदारा’च्या भूमिकेतले पोलीसच कसे सरस, हे पाहून प्रसादही सुखावणारच!