प्रतिक्रिया पहिली :  विदर्भासारख्या मागास भागातून येणाऱ्या नेत्यावर बिहारसारख्या मागास राज्याची निवडणूक- जबाबदारी पक्षाने सोपवली! ही  खरे तर पदोन्नतीच आहे. राष्ट्रीय राजकारणाची सवय व्हायला अशा नेमणुका कामी येतात. उत्तरेकडचे राजकारण एकदा समजले की, माणूस राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी सज्ज होतो  म्हणतात, तेच खरे! शेवटी कुणी कितीही ओरडो, जोवर मोदींच्या ‘गुडबुक’मध्ये भाऊ आहेत तोवर विरोधकांची चिंता करायचे काही कारण नाही. राजकारणात एकदा अपयशी ठरल्यावर दुसऱ्यांदा कुणी विश्वास टाकत नाही पण मोदींची बातच वेगळी! तसे बिहारचे राजकारण कर्कश आहे म्हणा, पण आमच्या माजी मुख्यमंत्र्यांचाही आवाज काही कमी नाही. आता या आनंदात उद्याची सायंशाखा संपल्यावर चंदनाचा (चिवडा भक्षण) कार्यक्रम करणार आहोत.

प्रतिक्रिया दुसरी : इथे सत्ता घालवली, आता तिथे जाऊन काय दिवे लावणार? या शीर्षस्थांच्या मनात काय आहे काही कळायलाच मार्ग नाही. तिथे नितीशकुमारांबरोबर युती आहे. निकाल लागल्यावर त्या कुमारांनी लालूंच्या कळपाला जवळ केले तर? इथे अधिक जागा मिळून सत्ता गमावली. सेना हातोहात निसटली. तिथेही तसेच झाले तर? युती सांभाळता येत नसलेल्या नेत्याला पुन्हा युती असलेल्या ठिकाणी पाठवायचे? या शीर्षस्थांचे डोके ठिकाणावर आहे की नाही? महाराष्ट्र तसे समंजस राज्य. येथे या भाऊची दबंगगिरी खपून गेली. तिथे तर एकापेक्षा एक वरचढ आहेत. वादविवादात बिहारींना हरवणे सोपे नसते याची कल्पना नसेल शीर्षस्थांना? प्रतिक्रिया तिसरी :  बरे झाले, सुंठीवाचून खोकला गेला.. मोदींच्या जवळचे असल्याने त्यांच्या विरोधात बोलायला संधीच नव्हती. पद मिळाल्यापासून किती मी मीपणा चालवला होता यांनी! पक्षात अनेक कर्तबगार नेते आहेत. त्यांना संधी मिळायला हवी. आता बिहारमधून इकडे परत आणू नका. निकाल लागला की परस्पर केंद्रात सामावून घ्या. आम्ही राज्याचे नेतृत्व कुणी करायचे ते आपसात बसून ठरवून घेतो. किमान यापुढे तरी दिल्लीचा निर्णय लादू नका. पक्षात लोकशाही आहे हे लक्षात ठेवा.

प्रतिक्रिया चौथी : मी पक्षाध्यक्ष असताना बिहारमध्ये संघटनेचा विस्तार केला. केंद्रात असल्याने आजही आठवडय़ातून एकदा पाटण्याला जातोच. युती व आघाडय़ा कशा हाताळायच्या हे मला चांगले ठाऊक आहे. तरीही कालच्या पोराच्या हातात सूत्रे देता? कशासाठी तर मला डिवचण्यासाठी? आधी राज्यातून माझा पत्ता कापला. आता याचा. नागपूरचे महत्त्व कमी करायचे धोरण दिसते. आता मोहनजींशी एकदा सविस्तर बोलावेच लागेल.

प्रतिक्रिया पाचवी : औंढा नागनाथ पावला रे बाप्पा एकदाचा. आम्हाला डच्चू देता काय? आता जा बसा बिहारमध्ये घसा फोडत. पुन्हा राज्यात परत नका येऊ. उशिरा का होईना पक्ष श्रेष्ठींना शहाणपण सुचले. आता ‘ई-पास’ काढून जळगावला नाथाभाऊंना भेटायला पाहिजे एकदा.

.. या प्रतिक्रिया करोनाची भीती न बाळगता राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या भाऊंनी गाडीतच मोबाइलवर वाचल्या. नित्याच्या क्रियाकलापांत बदल न करता, सुहास्य वदनाने ते कोविड वॉर्डाच्या दिशेने चालू लागले.