परीक्षेच्या दिवशी सकाळीच काकांनी घराच्या एका खोलीत तयार केलेल्या परीक्षा केंद्राची कसून पाहणी केली. खिडकीची फटही उघडी राहू नये याची काळजी त्यांनी आदल्या दिवशी दिवसभर खपून घेतलीच होती. एकूणच घरीच परीक्षा होणार यामुळे आनंदाने उडय़ा मारणाऱ्या बंडय़ाला व त्याची कड घेणाऱ्या त्याच्या आईला झटका द्यायचाच हे काकांनी मनोमन ठरवले होते. यावरून रात्री तिघांमध्ये झालेला वाद त्यांना आठवला. परीक्षा घरीच असल्याने त्याला पुस्तके बघून प्रश्न सोडवू द्या, या सत्रात चांगले गुण मिळाले तर त्याची पदवीची सरासरी वधारेल या काकूंच्या युक्तिवादाला त्यांनी धुडकावून लावले होते. पदव्युत्तरचे शिक्षण घेणाऱ्या दोन मित्रांना सोबत घेत पेपर सोडवण्याचा त्याचा मनसुबा त्यांनी उधळून तर लावलाच, शिवाय मदतीसाठी तयार असलेल्या त्या दोघांना दिवसभर घराकडे फिरकायचे नाही अशी तंबी देखील दिली होती. घरून परीक्षेचे सूत्र लागू करणाऱ्या सामंतांना सुद्धा पुस्तके बघा व पेपर सोडवा हेच अपेक्षित आहे असे काकूंनी सांगताच काका भडकले होते. त्यांनी स्वत: दिली असेल अशी परीक्षा पण मी गैरप्रकार होऊ देणार नाही, असे त्यांनी ठणकावले होते. प्रश्नपत्रिका घेऊन येणाऱ्या विद्यापीठाच्या माणसाला अजिबात लालूच दाखवायची नाही. त्याच्याशी बोलायचे नाही. अशी तंबी काकांनी दोघांना रात्रीच दिली होती. करोनाच्या भीतीमुळे बंडय़ाची मानसिक स्थिती ढळली आहे असा युक्तिवाद काकूंनी करताच, ‘दोनवेळ भरपेट जेवून गावभर उनाडक्या करायला, चौकात गप्पांचे फड रंगवायला, यूटय़ूबवरच्या मालिका मिटक्या मारत बघायला तुझ्या सुपुत्राजवळ वेळ आहे, अभ्यासासाठी नाही?’ असे म्हणत त्यांनी काकूंना निरुत्तर केले होते. अखेर सकाळचे नऊ वाजले. विद्यापीठाचा माणूस घरात शिरताच काकांनी बंडय़ाची अंगझडती घ्यायला लावली. शर्टाच्या कॉलरमध्ये, पँटच्या अस्तरात लपवलेले अनेक कागद झडतीतून बाहेर पडले. काका रागाने लालबुंद झाले पण त्यांनी स्वत:ला आवरले. मग कॉपीमुक्त बंडय़ाला खोलीत सोडण्यात आले. हा प्रकार बघून विद्यापीठाचा माणूस क्षणभर बावचळलाच. इतर ठिकाणी पाहुणचार, शेवटी चिरीमिरीची सवय झालेल्या या माणसाला येथे काही मिळणार नाही याची जाणीव झाली. मग काका त्याला घेऊन खोलीच्या सभोवताल एक चक्कर टाकून आले. मित्रांकरवी कॉपीपुरवठा होत नाही ना, याची खात्री त्यांनी करून घेतली. तेवढय़ात काकूंनी चहा करू का, असे विचारताच काकांनी डोळे वटारले. चहासुद्धा एकप्रकारची लाचच आहे असे त्यांनी विद्यापीठाच्या माणसाला तोंडावर सांगून टाकले. तीन तासानंतर हिरमुसला चेहरा करून बंडय़ा बाहेर आला. उत्तरपत्रिका मिळताच विद्यापीठाच्या माणसाने घरातून काढता पाय घेतला. तो थोडा दूर जात नाही तोच बंडय़ाच्या दोन मित्रांनी त्याला अडवले व स्वत:च्या घरी नेले. तोवर धापा टाकत बंडय़ाही पोहचला. चिरीमिरी हाती पडताच तो माणूस आणखी एक तास थांबण्यास तयार झाला.

मग तिघांनी मिळून यथेच्छ पेपर ‘सोडवला’. पूर्णपणे भरलेली उत्तरपत्रिका घेऊन तो माणूस रवाना होताच तिघांनी सामंतांचे मनोमन आभार मानले. तिकडे जग जिंकल्याच्या थाटात काका खोलीतील वस्तू हलवत होते, खिडक्या उघडत होते. स्वत: ‘ओपन बुक एक्झाम’ देऊन प्रीमॅट्रिक झालेल्या आपल्या नवऱ्याचे हे तात्त्विक ढोंग बघून काकू संतापाने थरथरत होत्या. तेवढय़ात बंडय़ाने घरात येत अंगठा दाखवताच काकूंचा जीव भांडय़ात पडला.