सांप्रतकाळी अवघा महाराष्ट्र ज्ञानी झाला आहे. पदवीच्या परीक्षा हव्यात की नको, या विषयात प्रत्येकाने जणू पीएच.डी.धारकांएवढी तज्ज्ञता मिळवली आहे. परीक्षा होणे कसे चूक, हे ज्ञान आता बऱ्याच विद्यार्थ्यांना संघटितपणे झाले आहे, तर काही विद्यार्थी एकटेदुकटे पडल्यामुळे त्यांना परीक्षा होणे योग्य, असेही अभ्यासूपणेच वाटते आहे. थोडक्यात, परीक्षाविषयक ज्ञानाची गंगा भरभरून वाहाते आहे. जेथे ज्ञान असते, तेथे त्या ज्ञानाच्या परीक्षेचीही अपेक्षा करणे योग्य. तेव्हा परीक्षाविषयक ज्ञानाचीही काहीएक चाचणी हवी की नको, अशा विचारात असतानाच कुठूनसा एक कागद आमच्या हाती आला. त्यावर जो काही मजकूर होता, तो वाचकांसाठी येथे जसाच्या तसा देत आहोत..

(गुण – ‘ऐच्छिक’; वेळ – हवा तेवढा)

प्रश्न १ : सविस्तर उत्तरे लिहा :

अ) विद्यार्थी संघटनांमध्ये विद्यार्थी किती?

आ) विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर कसे करावे?

इ) विद्यार्थ्यांनी संकटाचा सामना करण्यास कसे शिकावे? संकट करोनाचे की परीक्षेचेच?

प्रश्न २ : बनावट प्रमाणपत्रे, फुटलेल्या प्रश्नपत्रिका, वाङ्मयचौर्य असलेले शोधनिबंध, अमान्य विद्यापीठे यांद्वारे दिलेल्या पदव्यांची वैधता स्पष्ट करा.

किंवा

निबंध लिहा : ‘सरासरीने उत्तीर्ण’

प्रश्न ३ : संदर्भासहित स्पष्टीकरण द्या :

अ) गोव्यातील परीक्षांना अभाविपचा विरोध

आ) विद्यापीठांची स्वायत्तता

इ) ज्ञानदाते कुलगुरू

प्रश्न ४ :  विधानांचा परस्पर संबंध स्पष्ट करा

अ) ‘देशपातळीवर परीक्षांचे एकच सूत्र हवे’ आणि ‘यूजीसीच्या सूचना बंधनकारक नाहीत.’

आ) ‘हॉटेल सुरू करण्यास परवानगी’ आणि ‘परीक्षा घेणे धोकादायक’

इ) ‘परीक्षाकेंद्री शिक्षण व्यवस्था घातक’ आणि ‘परीक्षांशिवाय पदवी देणे अयोग्य’

प्रश्न ५ :  कल्पनाविस्तार करा :

अ) परीक्षेविना पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत

आ) उच्चशिक्षणमंत्र्यांच्या पदवीचे आत्मवृत्त

प्रश्न ६ : शास्त्रीय कारणे द्या :

अ) विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागल्यास संसर्गाचा धोका संभवतो, पण जिल्हाधिकारी कार्यालयापुढे घोषणा देताना संसर्ग होऊच शकत नाही.

आ) ऑनलाइन परीक्षा दिल्ली विद्यापीठात तसेच मुंबई-पुण्याच्या अभिमत विद्यापीठांत होऊ शकतात, पण पुणे वा मुंबईत होऊ शकत नाहीत.

इ) परीक्षा झाल्याने राज्यातील पर्यावरण (आणि पर्यायाने, पर्यटन) धोक्यात येऊ शकते.