‘मै अण्णा’ असा आवाज पलीकडून येताच पक्षाच्या बाह्य़भक्त हाताळणी विभागाच्या प्रमुखाने त्रासिक चेहरा करत फोन कानापासून दूर नेला. तुमचा प्रभाव आता ओसरला, त्यामुळे ‘वापरणे आणि दूर सारणे ’या पक्षनीतीत आता तुम्ही बसता असे या माणसाला तोंडावर सुनवावे असे प्रमुखाच्या मनात आले, पण लगेच त्याने तो विचार रहित केला. तिकडून अण्णा भराभर बोलतच होते. ‘लोक मला शिव्या घालत आहेत. गाढ झोपले म्हणताहेत. संघाचा प्यादा अशी दूषणे देत आहेत. कुछ तो करो ना’ काकुळतीच्या स्वरातले हे म्हणणे ऐकून प्रमुखाला दया आली. लवकरच तुम्हाला नवा प्लान पाठवतो असे प्रमुखाने म्हणताच अण्णांचा चेहरा उजळला. जणू दिल्लीतील सर्वोच्च नेत्याने आपल्या पत्राला प्रतिसाद दिला अशा थाटात ते मंदिरात येरझारा घालू लागले. उपोषणाची गर्जना करा असा आदेश येताच अण्णा खूश झाले. तरीही आदेशाचे त्रोटक स्वरूप बघून त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. हे दिल्लीवाले मोठे चतुर असतात. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. माझा वापर करून साऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. कुणी मुख्यमंत्री झाले तर कुणी राज्यपाल. तेव्हाच ठरवले. आपल्यामुळे ज्यांना सत्तेचा लाभ झाला त्यांच्या म्हणण्यात राहायचे. त्यासाठी मौनाचा आधार घ्यायचा. नतद्रष्ट विरोधक ओरडू लागले तेव्हा प्रारंभी त्याकडे दुर्लक्ष केले पण बळीराजाच्या आंदोलनाने आपली चांगलीच पंचाईत केली. पुन्हा शिव्यांचा भडिमार सुरू झाला. शेवटी न राहवून फोन करावाच लागला. आता या प्लानचा वापर करून मी प्यादा नाही हे ओरडून सांगता येईल. पुन्हा राष्ट्रपित्याचे नाव घेता येईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतरांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने उपोषणकाळात आपल्याशी चर्चा सुरू केली व तोडगा काढण्यात यश आले तर पुन्हा देशभर आपला जयजयकार सुरू होईल. जे हजारो शेतकऱ्यांना जमले नाही ते आपण करून दाखवले असे छातीठोकपणे सांगता येईल. आपल्याला पद तर नकोच, केवळ नाव हवे. यातून गेल्या सहा वर्षांत लागलेली सारी किटाळेही नष्ट होतील. स्वप्ने रंगवता रंगवता अण्णांनी डोळे मिटले. हातात तिरंगा घेऊन दिल्लीजवळच्या कोणत्या तरी सीमेवर आपण बसलो आहोत, समोर ‘मै हू अण्णा’ अशा टोप्या घातलेले व पक्षाने पाठवलेले हजारो भक्त नारे देताहेत असा भास त्यांना झाला. त्यांनी लगेच एका कार्यकर्त्यांला शेजारच्या गावात पाठवून उपोषण सोडण्यासाठी एखादी चिमुरडी पाहून ठेव असे सांगितले. तेवढय़ात दिल्लीचा फोन वाजला. सर्वोच्च नेत्याने तुमच्या संभाव्य आंदोलनाची दखल घेत चर्चेसाठी अमूक अमूक नेत्यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ अहो पण आंदोलन तर सुरू करू द्या’ ही अण्णांची विनवणी न ऐकताच फोन कट झाला. हिरमुसलेले अण्णा चर्चेत सहभागी झाले. हे गुऱ्हाळ आठ ते दहा दिवस चालवायचे असे प्रारंभीच नागपूरच्या भाऊंनी स्पष्ट केल्यावर त्यांना समोर काय याचा अंदाज आलाच. किमान दोन दिवस तरी उपोषण करू द्या, अशी विनंती त्यांनी वारंवार केली पण त्याकडे दुर्लक्ष करत सारे नेते अण्णांच्या नावाने आधी स्वत:च तयार केलेल्या मागण्या व त्यावर स्वत:च दिलेल्या उत्तराचा ‘समझोता मसुदा’ तयार करण्यात व्यग्र! अण्णांनी खूपच त्रागा सुरू केल्यावर दिल्लीहून आलेल्या नेत्याने ‘भारतरत्न’ असा शब्द उच्चारताच ते एकदम शांत झाले. नंतर झालेल्या पत्रपरिषदेत सुद्धा केवळ या शब्दामुळे त्यांना विश्वासार्हतेचा प्रश्न ऐकूच गेला नाही.