तुम्हीच सांगा, तुमच्या महाराष्ट्रातल्या एखाद्या शहरात राफेल विमानं उतरली असती, तर पाहावंसं नसतं वाटलं? आम्ही आमच्या अम्बाल्यात आवाज ऐकले घरात बसून, पण विमानं पाहण्यासाठी छतावर- म्हणजे गच्चीत- जायला बंदी केली होती पोलिसांनी! विमानं जिथं उतरली तिथं- एअरबेसला खेटून धूलकोट, पंजखोडम वगैरे वस्त्या आहेत तिथं तर कडकडीत संचारबंदी होती. त्या विमानांचे फोटो लावले होते सगळीभर इकडच्या भाजपनेत्यांनी, ‘स्वागत करतो’ म्हणून स्वत:च्या छबीसकट. पण आम्हाला आकाशातल्या विमानाचे फोटो काढायला बंदी! ही गोष्ट २९ जुलैची. त्याला महिना उलटला. आम्ही अम्बालावाले मोठे दिलदार. विसरूनही गेलो सारं. आठवण काय असल्या अनुभवांची ठेवायची? हॅट्- लॉकडाऊन उघडला तशी पूरणसिंगची चिकन आणि पुरी, हलवाई बाजारातल्या नत्थूजी किंवा दाऊजीकडले रबडीवाले घेवर.. करोनाचीसुद्धा आठवण नाही राहिली आम्हाला, असं आमचं अम्बाला.. ‘स्ट्रीट फूड’साठी प्रसिद्ध! आम्ही जे काही खातो ते रस्त्यावर.. तुम्हीच पाहा- भारतभर ‘ओबेराय’ म्हटलं की पंचतारांकित महागडी हॉटेलं आठवतात ना? आम्ही अम्बालावाले अपवाद. आम्हाला आठवतो तो आमचा ओबेराय ढाबाच! या एकदा आमच्या अम्बाल्याला..

पण नाही.. कारण कसं सांगू? या राफेलचं आम्ही काय घोडं मारलंय कळेना. आता आमच्या खाद्यप्रेमालाही चाप लागणार. कारण राफेलच.. का? तर म्हणे, कचरा फार करतो आम्ही. आमच्याबद्दल ही ओरड जुनीच आहे- ‘स्वच्छ भारत’ नव्हताच तेव्हापासूनची. आम्ही कचरा करतो आणि म्हणून एअरबेसवरल्या विमानांना त्रास होतो, अशी कुरकुर २०१० सालीच काँग्रेसवाल्यांनी सुरू केली होती. मग अम्बाल्यात रस्त्यावरल्या ढाब्यांना पाचपाचशे रुपये दंड करणार म्हणून फर्मानं निघाली. पण ते टळलं. देशभरात एअरबेस असलेल्या शहरांना स्वच्छ करण्यासाठी त्याच वर्षी १११ कोटी रुपये मंजूर झाले होते, त्यापैकी अम्बाल्यासाठी ११ कोटी होते म्हणतात.. कुठे गेले ते? एवढय़ा पैशात स्वच्छतेचं समाधान नाही मिळालं? थुत्..

तिकडे गुजरातमध्ये सुरत, बडोदा, अहमदाबाद मध्ये, किंवा तुमच्या पुण्यात काय रस्त्यावर खात नसतील? पण अम्बालेवाल्यांचाच कचरा दिसतो? पुण्यात काय एअरबेस नाही? तरी आम्हालाच गेल्या महिन्यात त्या नॅशनल ग्रीन ट्रायब्यूनलनं दम भरला- कचरा विल्हेवाट यंत्रणा नीट नसेल तर दंड! अरे काय आमच्या दंडातूनच राफेलचा खर्च काढता का काय?

तुमचं बरोबर आहे, लॉजिक पाहिजे ना काही तरी. आता मला सांगा.. कबुतरांना कशाचं प्रतीक मानतात? शांततेचं की नाही? लहानपणापासून तसंच शिकवलंय ना आपल्याला? ते संस्कार विसरायचे आणि कबुतरं ही राफेलसारख्या तगडय़ा विमानाला धोका आहेत असं मानायचं आम्ही? लॉजिकची बात करा ना काही.. काय तर म्हणे कचऱ्यामुळे कबुतरं येतात. मग ती कबुतरं उडतात. बरं उडून उडून सगळी कबुतरं राफेलच्याच दिशेनं कशाला उडतील? राफेललाच कशाला अपघात करतील? तरी पत्रकं काढतात- मीडियाला बातम्या देतात- म्हणे अम्बाल्याच्या कचऱ्यावर पोट भरणाऱ्या कबुतर वगैरे पक्ष्यांपासून राफेल विमानांना धोका. छे: आम्ही तर ठरवलंय. आमचे संस्कार काही बदलणार नाहीत. राफेल पुण्याला जाईल.. जाऊदे,आम्ही तर ते इथंही टीव्हीवरच पाहिलंय..

की फर्क पैन्दा? काय फरक काय पडणार?