काहीही झाले तरी नागपूर ही परिवाराची मायभूमी हो. मग तिथून मिळालेले निमंत्रण कसे नाकारणार? महामहीम असो वा आणखी कुणी, मुख्यालयाचा आदेश पाळावाच लागतो. आणि ते घटनात्मक पद वगैरे काय घेऊन बसलात. पद कोणतेही असले तरी विचाराला आधी प्राधान्य अशी शिकवणच दिलेली असते साऱ्यांना. हे विचार आता शतक गाठतील. बरे निधी संकलनाचे म्हणाल तर त्यात काही गैरव्यवहार होण्याची सुतराम शक्यता नाहीच. परिवारातील शीर्षस्थ संस्था भले नोंदणीकृत नसू दे, पण सारे काम कसे निष्ठेने चालते. पै न् पैचा हिशेब ठेवला जातो. मागे विटा गोळा केल्या त्याचाही हिशेब ठेवलाच की! महामहिमांना हे ठाऊक आहे म्हणूनच तर त्यांनी निमंत्रण स्वीकारले. तसेही परिवाराकडून होणारी प्रत्येक कृती ही राष्ट्रकार्य म्हणूनच ओळखली जाते. त्यामुळे त्यात भाग घेण्यास कुणाची हरकत असण्याचे काही कारणच नाही. ते पुरोगाम्यांचे म्हणाल तर त्यांची कोल्हेकुई सुरूच असते; नेहमी ऊठसूट घटनेचा हवाला देत असतात. मागे पुतळ्यासाठी गोळा केलेल्या लोखंडाचे काय झाले असे विचारतात. अहो, पाहिजे तेवढे लोखंड नाही मिळाले. लोक भंगार द्यायला लागले म्हणून सोडावी लागली ती मोहीम. घ्यावा लागला चीनचा आधार. होते असे कधी कधी, म्हणून काय अख्ख्या परिवाराला नापास ठरवणार काय? आणि तेव्हा थोडीच बोलावले होते आम्ही महामहिमांना? हे मंदिर उभारणीचे कार्य तर राष्ट्रीय अस्मितेशी जोडले गेले आहे. मग त्यात त्यांचा सहभाग असायला हवा ना! घटना शिरसावंद्यच, पण अस्मिताही मोठी असे आम्ही मानतो. महामहिमांचे म्हणाल तर त्यांच्या नसानसांत भक्ती भरलेली आहे. मध्यंतरी त्यांनी राज्याच्या कारभाऱ्यांना पत्र लिहून त्याचा परिचय दिला होता. आठवते ना तुम्हाला? हो, नसेल त्यांच्या अधिकृत दौऱ्यात हा कार्यक्रम; पण नंतर त्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी तो स्वीकारला ना! याचा संबंध त्यांच्या ताडोबा जंगलातील वास्तव्याशी जोडायचा? प्रभुरामालाही दीर्घकाळ जंगलात राहावे लागले होते. पण त्यामुळे जंगलात जाताच त्यांना राम आठवला, निवृत्तीवादी माणसाला जंगलात गेल्यावरच देव आठवतो, अशी तर्कटे हे पुरोगामीच मांडू शकतात, खरे राष्ट्रभक्त नाही. अहो, आमचे महामहीम खरे प्रवृत्तीवादी आहेत. त्यामुळे भवन असो वा जंगल, ते दोन्ही ठिकाणी सक्रिय असतात. आयुष्यभर शिक्षकी पेशात रमलेला माणूस. इतर दिखाऊ हिंदुत्ववादी पक्षांसारखे एक कोटी रुपये कुठून देणार? मग निधी संकलनाला हजेरी लावून कुवतीप्रमाणे त्यात सहभाग नोंदवला तर त्यात वाईट काय? जास्तीत जास्त लोकसहभाग हाच राष्ट्रकार्याचा पाया असतो हे या नतद्रष्ट पुरोगाम्यांना कधी कळणार कुणास ठाऊक? अरे, राष्ट्राचे सर्वोच्च नेते भूमिपूजनाला हजेरी लावू शकतात तर महामहीम का नाही, या साध्या तर्कावर जरा विचार करा ना! किती दिवस त्या धर्मनिरपेक्षतेत अडकून पडणार? ती बेगडी ठरवली ना कधीच! हो, घेतलीय शपथ महामहिमांनी, म्हणून काय जीवननिष्ठेला तिलांजली देणार काय? युतीचा गळा घोटून बेगडींच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या कथित हिंदुत्ववाद्यांना धडा शिकवण्यासाठी केला वापर महामहिमांचा, तर फरक काय पडतो? शेवटी प्रश्न परिवाराचा आहे हे लक्षात घ्या.