सकाळी ऑफिसला निघताना गाडीला किक मारण्याआधी घरातून धावत डबा घेऊन येणाऱ्या बायकोवर ‘उशीर झाला’ म्हणत खेकसण्याची त्याची नेहमीची सवय. हाच खरा पुरुषार्थ ही त्याची ठाम समजूत. त्याच सवयीनुसार तो ऐटीत आपल्या टेबलाजवळ पोहोचला. डबा ठेवल्यावर त्याने शेजारच्या सहकारी महिलेकडे तिरपा कटाक्ष टाकताच तिने झटकन मान वळवली. या बाईंना काय झाले ते याला कळेना. त्याने इतरांकडे बघितले तर तेही सारे कामात मग्न. मग त्यानेही सायंकाळच्या ‘बैठकी’चा बेत मनात घोळवत कामात डोके खुपसले. थोडय़ाच वेळात इतर कक्षातले सहकारी अचानक आले व एकमेकांना ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिना’च्या शुभेच्छा देऊ लागले, पण त्याच्याकडे कुणी फिरकेना. त्यातल्या काहींकडे बघून त्याने स्मितहास्य केले; पण त्यांनीही ओळखत नसल्यागत माना वळवल्या. तेवढय़ात त्याला लेखा विभागातून बोलावणे आले. तिकडे जाताना सारेच फिदीफिदी हसत असल्याचा भास त्याला झाला. तिथे जाताच कारकुनाने एक कागद त्याच्यासमोर ठेवला. तो वाचताना त्याला दरदरून घाम फुटला. बायकोची एवढी हिंमत, असे काहीसे पुटपुटत तो जागेवर येऊन बसला. मग त्याचे डोकेच चालेना. काय कमी ठेवले आहे मी तिच्या आयुष्यात. तरीही ‘माहितीच्या अधिकारा’त पगार किती म्हणून विचारते? बाईचे वय व पुरुषाचा पगार या काय विचारण्याच्या गोष्टी असतात का? सरकार काहीही म्हणो, शेवटी संसार तर दोघांना करायचा ना! बाईच्या जातीने कसे निमूटपणे वागायचे असते. हिला नक्कीच कुणी तरी पढवलेले दिसते. आजकाल त्या मुक्तीवाल्या व्हॉट्सअ‍ॅपवरही प्रचार करत असतील ना! आयुष्यात करतो थोडीशी ‘मस्ती’ पण घरी तर वेळेतच जातो ना! कमावत्याला कधी हिशेब मागायचा नसतो. त्याने ‘अहं’ दुखावतो हे या बायकांना कळत कसे नाही? आयुष्यात कधी हात उगारला नाही. कैकदा संशय घेतला तरी तोल ढळू दिला नाही. आता खेकसण्याचे म्हणाल तर तेवढेही नवरेपण गाजवण्यात काय चूक आहे? कर्त्यां माणसाला एवढा अधिकार तर असायलाच हवा ना! तरीही थेट कार्यालयातच अर्ज! इभ्रतीवर घालाच की हा! घरातले वाणसामान, मुलांचे शिक्षण, महिन्याला एकदा ‘शॉपिंग’, मध्ये केव्हा तरी एखादा सिनेमा. यापेक्षा आणखी काय हवे एका सुखी कुटुंबासाठी.. हे सर्व करूनही प्रश्नाची उत्तरे मिळावीत अशी अपेक्षा बायकोने बाळगावी? नाही नाही हे अतिच झाले. विचार करता करता त्याचे डोके सुन्न झाले. मान वर करून त्याने बघितले तर सारेच त्याच्याकडे बघत असलेले. नजरेला नजर मिळताच साऱ्यांनी माना खाली घातल्या. शेजारणीने तर खुर्चीच तिरपी केलेली. आता इथे बसण्यात काही राम नाही हे लक्षात येताच ‘हाफ डे’ टाकून तो थेट निघाला.

घरी पोहोचला तर समोरच्या खोलीत आजूबाजूच्या बायकांची बैठक जमली होती. त्याची बायको त्या साऱ्यांना माहितीचा अर्ज कसा भरायचा याचे प्रशिक्षण देत असलेली दिसली. महत्प्रयासाने स्वत:ला आवरत तो त्याच्या खोलीत शिरला. थोडे रागावले तरी डोळ्यांतून पाणी काढणारी हीच का ती असा प्रश्न त्याला पडला. ‘स्त्री-पुरुष समानता कसे थोतांड आहे’ अशा चर्चेत हिरिरीने भाग घेणारे आपण घरीच या जाळ्यात अडकलो की काय अशी शंका त्याच्या मनाला चाटून गेली. तेवढय़ात बायको आलीच. त्याने लगेच तिला तिने केलेल्या अर्जाचा मोबाइलमध्ये काढलेला फोटो दाखवला. तो बघून हसत ती म्हणाली, ‘अहो, माझ्या काही मैत्रिणींचे नवरे त्यांचा पगार किती हे घरी सांगतात. असे सांगणे म्हणजे नवरा उत्कृष्ट असल्याची प्रशस्तीच. तुम्ही सांगायला तयार नव्हते, त्यामुळे तुम्ही उत्कृष्ट असूनही तसे म्हणता येत नव्हते म्हणून केला अर्ज. पण हा अर्ज तुम्हाला दाखवला कसा काय गेला, हा तर गोपनीयतेचा भंगच’ हे ऐकताच त्याने कपाळावर हात मारून घेतला.