22 September 2020

News Flash

आयपीएलांजली!

भगव्या रंगाचे झाकण असलेल्या या वाहनावर ‘प्रकृती का आशीर्वाद’ असेही आवर्जून नमूद केले होते

संग्रहित छायाचित्र

 

‘‘..और अब पतंजलि ‘स्ट्रॅटेजिक टाइम आऊट’! ’’अशी घोषणा समालोचक सुनील गावस्करने करताच शारजा क्रिकेट स्टेडियममधील ड्रेसिंग रूमच्या शेजारील मोकळ्या जागेतून एका डब्याच्या आकाराची गाडी मैदानाकडे प्रस्थान करू लागली. भगव्या रंगाचे झाकण असलेल्या या वाहनावर ‘प्रकृती का आशीर्वाद’ असेही आवर्जून नमूद केले होते. रॉयल चॅलेंजस बेंगळूरुचे फलंदाज विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स फलंदाजीसाठी मैदानावर होते, तर महेंद्रसिंह धोनीचा संघ गोलंदाजी करीत होता. धोनीने आवळा सरबत तर विराटने पेरूचे सरबत प्यायला घेतले. सर्वच खेळाडूंना च्यवनप्राश आणि मधाचे सेवन करणे बंधनकारक होते. विराटने सहजपणे धोनीकडे विषय काढला. ‘‘तुझ्या निवृत्तीची क्रिकेटजगतात जोरदार चर्चा सुरू आहे?’’ पण धोनीने शांतपणे उत्तरला, ‘‘अजून मी काही वर्षे खेळू शकतो. सध्या मी दिव्य काया कल्प वटीचे सेवन करतो.’’ धोनी दुखावला जाऊ नये, म्हणून विराटने नवा विषय काढला. ‘‘आज अनुष्का मला कपालभाती शिकवत होती. पण मला जमतच नव्हते.’’ मग धोनीने धीरोदात्तपणे त्याला सल्ला दिला, ‘‘माझ्याप्रमाणे हॅलिकॉप्टर शॉट खेळायचा असेल, तर त्रिकोणासन नक्की शिक!’’ ..इतक्यात विश्रांती संपली आणि पुन्हा मैदानी लढत सुरू झाली. टेलिव्हिजन चाहत्यांचा उत्साह जसा शिगेला पोहोचला होता, तसाच स्टेडियममध्ये हजर राहण्याची परवानगी मिळालेल्या एक-तृतीयांश प्रेक्षकांचा जल्लोषही पाहायला मिळत होता. प्रेक्षकांसाठीसुद्धा काही विशिष्ट स्पर्धा ‘प्रमुख प्रायोजकां’नीच ठेवल्या होत्या.  आसनानुरूप जल्लोष करणाऱ्या प्रेक्षकाला वर्षभराची पतंजलि उत्पादने मोफत मिळणार होती. चौकार-षटकार मारल्यानंतर सीमारेषेबाहेरील चार छोटेखानी व्यासपीठांवर चीअरगर्लच्या नृत्याची जागा संगीताच्या ठेक्यावर बहरणाऱ्या विशिष्ट आसनांनी घेतली होती.

संयुक्त अरब अमिरातीमधील ‘आयपीएल’साठी सर्वच क्रिकेटपटूंना प्रमाणित कार्यपद्धती लागू करण्यात आली होती. जैव-सुरक्षेचे आयुर्वेदिक शिष्टाचार प्रत्येक खेळाडूसाठी बंधनकारक होते. त्याचे पालन न केल्यास चार तास सलग आसने करायची शिक्षाही होती. याशिवाय पुढील १५ दिवस त्या क्रिकेटपटूला कारले-आवळा स्वरस प्राशन करण्याची तरतूद होती. पहाटे सहा वाजता उठल्यावर झूमद्वारे खुद्द बाबांचे ऑनलाइन योगमार्गदर्शन वर्ग भरायचे. मध्यरात्री संपलेल्या सामन्यानंतर डोळे चोळतच स्टीव्ह स्मिथ, श्रेयस अय्यर यांच्यासह सर्वच खेळाडू आसने करीत होते. मग दैनंदिन सराव आटोपल्यावर भगव्या रंगाची पीपीई वस्त्रे परिधान केलेला चमू प्रत्येक संघाला त्यांच्या निवासस्थानी करोनीलच्या गोळ्या देण्याचे कार्य दररोज करीत होता. प्रत्येक संघातील खेळाडूलाही संपूर्ण दिवसभर लागणारे हल्दी चंदन कांती साबणापासून प्रत्येक साहित्य अर्थातच, ‘प्रमुख प्रायोजकां’नी पुरवलेले होते.

दिनांक १० नोव्हेंबरचा अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला ‘पतंजलि आयपीएल’ चषक मिळणार होता.. तसेच विजेत्या संघाच्या प्रत्येक खेळाडूला स्वदेशी समृद्धी कार्डसुद्धा मिळणार होते. विजेता संघही मग बहुधा, आवळा सरबताच्याच बाटलीचे बूच उडवणार होता!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 12:00 am

Web Title: loksatta ulta chashma article on ipl abn 97
Next Stories
1 कांदे-तज्ज्ञ
2 इतिहासाच्या पायऱ्या..
3 चला, जरा अक्कल येऊ द्या!
Just Now!
X