कृष्णाप्पा गौतम.. रायली मेरेडिथ.. शाहरुख खान.. झाये रिचर्डसन.. आपण यांना पाहिलंत का? ही नावं ओळखीची वाटतात का? होय, यातलं एक तर सुपरिचित नव्हे का? शाहरुख खान.. पण अभिनय सोडून आता क्रिकेट खेळण्याचं त्यानं मनावर घेतलं की काय? त्याला कोण रोखणार म्हणा. कोलकाता नाइट रायडर ही त्याचीच तर टीम. पण थांबा. काहीतरी घोळ होतोय. कारण शाहरुख गेला पंजाबकडे! म्हणजे आपण समजतोय तो हा शाहरुख खान नाही तर.. शिवाय ती वर दिलेली नावं कोणाची? आयपीएलचा लिलाव सुरू आहे ना. मग त्याचं काय? तो तर दर तीन वर्षांनी, काही वेळा दरवर्षी, काही वेळा दर तीन महिन्यांनी होतो. उद्या दररोजही होईल. त्याचं काय? तर यंदाच्या आयपीएल लिलावामधील हे नवोदित नवकोट नारायण!  कोटीच्या कोटी लावले गेले यांच्या नावावर. या प्रत्येकाचा परिचय करून घ्यावा हे उत्तम नव्हे का? आयपीएलमध्ये मुळात कोटय़धीश कितीतरी. तशात ही ‘नवकोट’ मंडळी तर ठाऊकही नसतात. इतक्या महान खेळाडूंविषयी काहीही माहिती नसणं हे योग्य नाही. म्हणून त्यांचा परिचय करून घ्यावाच लागेल. आदल्या वर्षांत जयदेव उनाडकट, स्वप्नील असनोडकर यांचा परिचय करून काय मिळालं म्हणून विचारता? ते नंतर काय करतात याचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी आमची नाही. आता ही मंडळीदेखील पुढे काय करतील हे तपासण्याची जबाबदारी आमची नाही. त्यांचा परिचय करता येऊच नये यासाठी तुम्ही कट रचताय हे आमच्या लक्षात आलंच आहे एव्हाना! पण आम्ही तो उधळून राहिल्याशिवाय राहणार नाही. तर परिचय :

कृष्णाप्पा गौतम. नावाबाबत अजून थोडा गोंधळ सुरू आहे. गौतम की गौथम.. की गॉथॅम? बरं ते सोडा. त्याच्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जनी मोजले सव्वानऊ कोटी रुपये! भारतासाठी किती सामने खेळला? शून्य. टी-२०, वनडे.. गेलाबाजार कसोटी सामने? शून्य! मग कसा काय बुवा इतका वर्षांव? वय वर्षे ३०च्या वर आहे. चेन्नईला गेली काही वर्ष तोच निकष निर्णायक ठरतो, म्हणे.

रायली मेरेडिथ. विचित्र नावं असली की बोली अधिक लागत असावी का? असो. पंजाबने त्याच्यासाठी किती मोजले? आठ कोटी. ऑस्ट्रेलियाकडून किती सामने खेळला? शून्य. ऑस्ट्रेलियात किती सामने खेळला? पन्नासपण नाही. मग इतके घबाड कसे काय? किंग्ज इलेव्हन पंजाबने यंदा त्यांचं नाव बदललंय. पंजाब किंग्ज म्हणतात आता त्यांना. ते एक कारण असू शकेल.

शाहरुख खान. त्याच्यासाठी मोजले सव्वापाच कोटी. कोणी? तेच ते वर पाहिलेले. पंजाब किंग्ज. ‘त्या’ शाहरुख खानला त्याच्या सुरुवातीच्या सिनेमांसाठी मिळाले नसतील, इतके ‘या’ शाहरुखच्या नावे एका दिवसात लागले. किती सामने खेळला हा भारताकडून? शून्य. किती सामने खेळला हा भारतात? अब तक ५६! कारण? शाहरुखच्या नावातच जादू आहे राव. कारण काय विचारता..

झाये रिचर्डसन. कोणी? पंजाब किंग्ज. किती? १४ कोटी. कारण?.. कारण? हा १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळलाय. शून्य सामने खेळलेल्यांसाठी आठ पाच कोटी मोजले. मग यालाकाहीच दिले नाही, तर हसतील ना लोक! शिवाय याचं नाव पण वेगळंच नाहीये का? झाये.. दिलेत कोटी कोटी तर कुणाचे काय जाये?.. हा विनोद वाईट खरा, पण आयपीएल म्हणजे तरी वेगळं काय असतं?