‘एक राजा होता. एकदा त्याच्या दरबारात एक गवई आला. त्याचे गायन ऐकून राजाने संतुष्ट होत काय मागायचे ते माग म्हटले. राज्यात गायनाकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे, तेव्हा त्याचा प्रसार होण्यासाठी राज्यातील प्रत्येकावर गाण्यातच बोलण्याची सक्ती करावी अशी मागणी गवयाने केली. राजाने मागचा-पुढचा विचार न करता सक्तीचा आदेश काढला. काही दिवसांतच जनता या पद्धतीच्या बोलण्याला कंटाळली. हळूहळू असंतोष वाढत गेला. प्रधानाने ही बाब लक्षात आणून दिल्यावर राजा काळजीत पडला. राजाच तो, आदेश मागे कसा घेणार? शेवटी प्रांतोप्रांतीच्या प्रमुखांना पुढाकार घ्यायला सांगण्यात आले. त्यांनी ‘अशा बोलण्याने हवेत प्रदूषण होते असे कारण देत आदेश मागे घेतला!’

.. झोपेतली ही स्वप्निल कथा संपताच ते जागे झाले. आपल्या टाळेबंदीच्या निर्णयाशी तर या कथेचा संबंध नसेल, अशी शंका त्यांना आली. तुमच्या आयुष्यातले २१ दिवस द्या, असे म्हणत आपण नंतरचे अनेक दिवस टाळेबंदीत ढकलले. तरीही करोना हद्दपार झाला नाही. तेव्हा घाईगडबडीत घेतलेल्या भूमिकेवर आता घूमजाव करताना बरीच कसरत करावी लागते आहे. आजच आपणही प्रांतप्रमुखांशी बोललो. टाळेबंदीच्या विरोधी, पण मिनी टाळेबंदीच्या बाजूने सूर लावला. नंतर बैठक संपताच लगेच फुटेज बघून घेतले. दाढी मोठी झाल्याने चेहऱ्यावरचे भाव काही दिसत नव्हते म्हणून बचावलो. हे प्रमुखसुद्धा नुसती नक्कल करण्यात धन्यता मानतात. टाळेबंदी नको असा स्पष्ट आदेश काढला, तरीही यांचे जनता कर्फ्यूच्या नावावर तेच सुरू. ते तरी काय करणार म्हणा! ‘महाजनो येन गत: स पंथ:’ अशी संस्कृतमधली म्हण आहे. मोठी माणसे ज्या दिशेने जातात त्याच दिशेने लहान वाटचाल करतात.. या जाणिवेने त्यांच्यामधील ‘मोठा माणूस’ सुखावला. मात्र ढासळत्या अर्थव्यवस्थेचा विचार मनात येताच त्यांचा चेहरा पुन्हा चिंताक्रांत बनला. त्यामुळेच पुन्हा बंदी नको अशी घूमजावी भूमिका घ्यावी लागली. जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून ही बंदी जगात कशी यशस्वी ठरली अशी भलामणसुद्धा करावी लागली.

शेवटी सर्वोच्च पदावर असलेल्याने झालेल्या चुकीची कबुली द्यायची नसते. ती आपल्या देशाची परंपरासुद्धा नाही. भले अशा चुका मनाला कुरतडत राहोत. जाहीरपणे मात्र निर्णयाचे समर्थनच करायचे- कुणी दुबळा म्हणू नये म्हणून! बंदीसारखे निर्णय घेण्याआधी त्याची कठोर चिकित्सा करा असे बैठकीत म्हणालो तेव्हाही मनात कळ उठलीच होती. मार्चमध्ये आरंभशूरता दाखवण्याच्या नादात आपलेच अशा चिकित्सेकडे दुर्लक्ष झाले, हे आठवले. पण आता या राज्यांनी तरी चुकायला नको ना! म्हणूनच चुकीची कबुली न देता चिकित्सेचा उल्लेख करावा लागला.

विचार करून थकल्यासारखे झालेल्या शेठनी घडय़ाळात बघितले.. पहाटेचे तीन! म्हणजे अजून दोन तास झोपायचे. तोवर मोरांसोबत बागडायची वेळ होईल असे म्हणत त्यांनी डोळे मिटले. थोडय़ाच वेळात त्यांच्या स्वप्नात एक साधू आला. ‘हे भाई, तमारी भूल थई गई’ असे

तो सारखे म्हणत होता. ऐकून झोप उडाली ती उडालीच. ते उठून वऱ्हांडय़ात आले तर मोर टाहो फोडत होता. त्यांना तोही ‘भूल थई गई’ म्हणत असल्याचा भास झाला. आपण पोलादी पुरुष, त्यामुळे काहीही झाले तरी चुकीची कबुली द्यायची नाही असे म्हणत ते आन्हिकासाठी वळले.