‘नैसर्गिक मृत्यू अभावानेच वाटय़ाला येणारा जीव म्हणजे बकरा’ असे एक पाकिस्तानी कवी म्हणून गेलाय. यात तथ्य नाही असे (कवी पाकिस्तानी असला, तरीही) कुणी म्हणणार नाही. यंदा करोनाच्या कहरामुळे बकरेच काय, पण कोंबडे सुद्धा काही काळ हर्षोल्हासित झाले होते. टाळेबंदीच्या काळात त्यांचे मरण बराच काळ टळले. आता बंदी उठली तरी तिचा असर कायम असल्याने यंदा नैसर्गिक मृत्यू येणार या आशेवर असलेल्या या बकऱ्यांनी नव्या संकटाची कल्पनाच केलेली नसली तरी, नुकतेच ते त्यांच्यावर ओढवलेच. बिचाऱ्या या जिवांना मुखपट्टी लावली नाही म्हणून दिवसभर पोलीस कोठडीत राहावे लागले. तेही कानपूरच्या, जिथे विकास दुबे असायला हवा होता तिथे आपल्याला ठेवले गेले या कल्पनेनेच हे जीव घाबरून गेले. शेवटी पोलिसांच्या लेखी दुबे काय किंवा बकरे काय, दोघेही बळी घेण्यासाठी सारखेच. पोलिसी भाषेत माणसांना सुद्धा बकराच म्हणतात हेही या जिवांना ठाऊक नाही. त्यामुळे अटकेत आल्यावर गोळी नाही, पण सुरी तरी चालणार अशी भीती या जिवांमध्ये निर्माण झाली. मात्र ते सुदैवी निघाले. मुखपट्टीवरच प्रकरण निभावले. आता या पट्टीची एवढी धास्ती कानपूर पोलिसांनी का घेतली आहे हे या बकऱ्यांना कळेना! थोडय़ा काळात तोही उलगडा झालाच. त्या दुबेचा ‘गेम’ करताना त्याच्या तोंडावरची मुखपट्टी तशीच राहून गेली होती..  एवढी मोठी पळापळ, त्यानंतर झालेली चकमक, तरीही मुखपट्टी जशीच्या तशी कशी असा प्रश्न बोरूबहाद्दरांनी विचारताच झालेली चूक पोलिसांच्या लक्षात आली असणार. तेव्हापासून कानपूर पोलिसांना स्वप्नातही मुखपट्टय़ाच दिसतात म्हणे! या स्वप्नांनी बेजार झालेल्या एका शिपायाने या बकऱ्यांनाच पकडले. त्यासाठी या शिपायाला तरी कसा दोष देणार? मग मूर्खपणाचा गवगवा झाल्यावर बकऱ्यांच्या मालकाने मुखपट्टी घातली नव्हती असा पवित्रा पोलिसांना घ्यावा लागला. आता सुटका झाली तरीही मालकाची शिक्षा आपल्याला का मिळाली याचे कोडे बकऱ्यांना अजून उलगडले नाही म्हणे! आजकाल कुत्रेही मुखपट्टी घालून फिरायला लागले, मग बकऱ्यांनी का नाही घालायची असा मोलाचा प्रश्न कारवाई करणाऱ्या शिपायाने उपस्थित केल्यावर बकऱ्यांच्या जीवात जीव आला. तसेही आपल्याला कुत्र्यापेक्षा कमीच लेखले जाते याची जाणीव बकऱ्यांना आहे. खरे तर हे दोघेही पाळीव प्राणी, पण त्यात भेद करणाऱ्या मानवी वृत्तीची शिकार कायम बकरेच होत आलेले. लहानगी मांजर सुद्धा आपल्यापेक्षा नशीबवान, हेही बकऱ्यांना कळलेले आहे. आता या कारवाईनंतर तरी आपले महत्त्व वाढेल का? आपल्यालाही कुत्र्यांसारखी मुखपट्टी मिळेल का? सांभाळणारा माणूस दयाभावाने बघेल का? अशा प्रश्नांनी सध्या बकरे हैराण झालेत म्हणे! नाही तर, जरा जास्त काळ ओरडले, थोडे धष्टपुष्ट दिसायला लागले किंवा खुरात जळवा यायला लागल्या की सुरी फिरण्याची भीती ठरलेली.

त्यामुळे, पाळीव असले तरी माणसांच्या सान्निध्यात सांभाळूनच राहावे लागणाऱ्या या बकऱ्यांना आता कानपूर पोलिसांनी आशेचा किरण दाखवला असा अर्थ काढायला काहीही हरकत नाही. जीव जाण्याचे नंतर बघू, पण करोनाकाळात किमान मुखपट्टी तरी मिळेल अशी या मुक्या जिवांची आशा, जणू दु:खातली सुखपट्टी. हे ज्याच्यामुळे घडले त्या दुबेला आता बकरे धन्यवाद देत असतील, बें बें करून! याचा अर्थ मालकाला समजला, तरी पुरेसे आहे. अन्यथा आहेतच पोलीस पुन्हा कारवाईस सज्ज!