सोन्याची मुखपट्टी घातलेल्या धनवानाची बातमी वाचून अस्वस्थ झालेल्या काकांनी पेपर ताडकन मेजावर फेकला व खुर्चीतून उठून शेजारच्या खिडकीचे गज धरून बाहेर बघू लागले. अंगणातल्या एका झाडावर मंजूळ स्वरात कोकीळ गात होता. पण त्याकडे त्यांचे लक्ष नव्हतेच. शून्यात नजर लावलेल्या काकांच्या डोक्यात आठवणीचा एकेक पट उलगडू लागला. एके काळी हे शहर अभिजाततेसाठी ओळखले जायचे. मूल्यांसाठी झिजणे हाच या शहराचा धर्म होता. स्वातंत्र्य चळवळ असो वा विविध सामाजिक चळवळी. त्या प्रत्येकाचा केंद्रबिंदू हे शहर राहिले. जे अभिजात तेच सोने, या तत्त्वावर शहराचा गाढा विश्वास होता. वेगवेगळ्या विचारसरणी व वादांवर चौफेर बौद्धिक चर्चा याच शहरात झडायच्या. आता काळाच्या ओघात सारे बदलले. इतके की उन्नती की अवनती असा प्रश्न पडावा. आम्ही लहान होतो तेव्हा अभिमानाने म्हणायचो. पुणे तिथे काय उणे. आता पुणे तेथे सोनेच सोने असे म्हणायची वेळ या नव्या पिढीने आणली आहे. एके काळी बुद्धीची करामत दाखवून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेण्यात आम्ही आघाडीवर होतो. आता सोन्याच्या करामतीचे दिवस आले आहेत. आपले जुळे शहर ही खरी उद्योगनगरी, पण तीही अस्ताव्यस्त वाढत गेली आणि हे सोन्याचे पॅटर्न सुरू झाले.

खिडकीचे गज घट्ट पकडूनसुद्धा आपले अंग थरथरते आहे याची जाणीव काकांना झाली.

आयुष्यभर एक विचारधारा जोपासली. साधे जगण्याचा प्रयत्न निष्ठेने केला. हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल यासाठी झटलो. पण, लोक पैशामागेच गेले. आता हे सुवर्णजडित चेहरे आपल्याकडेच बघून छद्मी हसताहेत असा भास होतो. काही वर्षांपूर्वी एक मनसेवाला सोन्याचा सदराच अंगावर चढवून थेट विधिमंडळात गेला. आमदार झाल्याच्या आनंदात त्याने हे केले म्हणे! पण, आता काय? सध्याचे दिवस तर आजाराच्या सावटाचे. म्हणजेच दु:खाचे. तरीही ते साजरे करण्याची बुद्धी सुचावी, तोही आपल्या जुळ्या शहरातलाच निघावा!  आपली वाटचाल नेमकी होतेय कोणत्या दिशेने? यावर काका थबकले. मग त्यांना शरद जोशींचा एक व्यंगात्मक लेख आठवला. ऑलिम्पिकमध्ये एकही सुवर्णपदक जिंकू न शकणाऱ्या भारताला सोन्याचे आकर्षण कसे नाही हे सांगणारा. तेव्हा त्यावर झडलेल्या एका पेठीय चर्चेत भारतीयांना जीवनापेक्षा मोक्षाचीच आकांक्षा कशी जास्त आहे असा युक्तिवाद ऐकल्याचे काकांना आठवले. आता पेठांमधल्या चर्चा थांबल्या. बुद्धीची जागा पैशाने घेतली. तो करोनाचा विषाणू सोनेरी तारांमुळे दूर पळतो असाही युक्तिवाद कदाचित ऐकायला मिळेल. विचार करून काका शिणून गेले. तेवढय़ात बाहेर आलेल्या काकूंनी त्यांना फिरायला चलण्याची खूण केली. विचाराच्या तंद्रीतच काका बाहेर पडले. मग काकू त्यांना सांगू लागल्या, ‘‘गावातील एका पाटलिणीने सोन्याच्या दोन बांगडय़ा हातात घातल्या, पण तिच्याकडे कुणी बघेचना. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या त्या बाईने अंगणातील गवताच्या गंजीला आग लावली व ओरडायला सुरुवात केली. लोक धावले. आग विझवली गेली. तेव्हा धावपळ करणाऱ्या बाईंच्या हातातील बांगडय़ा बघून लोक प्रश्न विचारायला लागले. त्यामुळे त्या सुखावल्या. तात्पर्य हेच की, लोकांनी विचारल्याशिवाय सोने घालण्याला अर्थ नाही.’’ ही कथा ऐकून काका जोरात हसले. काकूंनी त्यांच्याकडे बघितले तर तोंड मोकळेच. ‘‘अहो, तुमची समाजवादी मुखपट्टी कुठाय?’’ आता वरमण्याची पाळी काकांवर आली होती.