28 September 2020

News Flash

रडवण्याचा हक्क एकालाच..

फुटलेल्या कोंबामुळे अवघड जागचे दुखणे नाहक सहन करावे लागले.

संग्रहित छायाचित्र

 

‘‘हे बघ, आता माझ्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले म्हणून तू हिरमसून जाण्याचे काही कारण नाही. तसेही आपण चुलत भाऊच. आपल्या दोघांच्या अस्तित्वाशिवाय स्वयंपाकघराला पूर्णत्वच येत नाही. पदार्थ कोणताही असो, कढईत पडण्याचा पहिला मान तुलाच मिळतो. अनेकदा तर तुझ्या जोडीला इतर किती तरी भाज्या.. मी प्राधान्यक्रमातसुद्धा नसतो.  गेल्या तीन-चार महिन्यांत चित्र बदलले. माणसे रिकामटेकडी असली की त्यांना मीच दिसू लागतो हा माझा अनुभव जुनाच आहे. या काळातसुद्धा तेच घडले व घराघरांत माझ्यावर सडकून ताव मारला गेला. नंतर मिळणार नाही या काळजीपोटी लोकांनी पोत्यांत भरून भरून मला घरात नेले. अनेक घरांत मला वापराविनाही पडून राहावे लागले. फुटलेल्या कोंबामुळे अवघड जागचे दुखणे नाहक सहन करावे लागले. आता या भानगडीत माझी किंमत वाढली तर त्याला मी दोषी कसा? करोना, टाळेबंदी यालाही मी जबाबदार नाही हे लक्षात घे.’’ एवढे बोलून बटाटा थकला, पण कांद्याचा राग काही गेलेला त्याला दिसला नाही. मला कापले की लोकांच्या डोळ्यात आपसूकच पाणी येते, तुझ्यामुळे नाही- असे काहीसे तो पुटपुटल्याचे बटाटय़ाच्या लक्षात आले. मग बटाटाकथन पुन्हा सुरू झाले. ‘‘हे बघ आपण भांडून काही फायदा नाही. शेवटी आपली जातकुळी एकच. जमिनीच्या उदरातून जन्म घेण्याची पद्धतही सारखीच. मला कापल्याने भले लोकांच्या डोळ्यात पाणी येत नसेल, पण आता किमतीमुळे येऊ लागले. याची असूया तू बाळगण्याचे काही कारण नाही. आजवर अनेकदा तू राजकारणातले तुझे उपद्रवमूल्य सिद्ध केलेस. अनेकांना निवडणुका जिंकून दिल्यास तर अनेकांचा पराभव घडवून आणलास. देशातले सारे मुद्दे विसरायला लावण्याची ताकद तुझ्यात आहे. तुझ्यामुळे अनेकांची खुर्ची गेली. त्यामुळे हल्ली तुझा विषय निघाला की अनेक जण तुला अस्तित्वहीन ठरवण्याचा प्रयत्न करू लागतात. कांदा खाल्ला नाही तर काय बिघडते अशी उद्दाम भाषा वापरतात. तरीही प्रत्येक घरातले तुझे स्थान अजिबात डळमळीत झालेले नाही. आजही माध्यमे माझ्यापेक्षा तुझ्यावरच जास्त प्रेम करतात. तू पाच पैशाने महाग झालास तरी व स्वस्त झालास तरी चर्चा तुझीच होते.  या करोनाकाळामुळे पहिल्यांदाच माझ्या नावाची चर्चा सुरू झाली. तुझी उपमा मला दिली गेली. यामुळे तुला आनंदच व्हायला हवा. बाजारात फिरणाऱ्या प्रत्येक पिशवीत तुझ्यासोबत मी आजवर विनासायास पडत आलो. कायम दुय्यम भूमिका घेत आलो. तरीही मी कधी नाराजी दर्शवली नाही. मी कायम लहान भावाच्या भूमिकेतूनच तुझ्याकडे बघितले. आता अचानक थोडेफार मिरवण्याची संधी मला मिळाली तर तू आनंदी व्हायला हवे.’’

एवढय़ा समजावणीनंतरही कांद्याचा चेहरा उतरलेलाच होता. भाऊ असला म्हणून काय झाले, आपले स्थान दुसऱ्याला देणे इतके सहज असत नाही हे या बटाटय़ाला कसे कळणार? हा राजकारणात नवखा आहे. मी तर राजकारण कोळून प्यालेलो. स्थानाची अदलाबदल शक्यच नाही. आता या बटाटय़ाची चर्चा थांबवण्यासाठी काही तरी करायलाच हवे या विचारात असतानाच वरून एक हात आला व कांदा अलगदपणे उचलला गेला. आतापर्यंत समजावत असलेला बटाटा त्याच्याकडे बघून फिदीफिदी हसत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 12:00 am

Web Title: loksatta ulta chashma article on onion abn 97
Next Stories
1 ‘तिथली’च पदवी!
2 शिक्का पुसला जाईल कसा?
3 ‘ययाती’ची भीती!
Just Now!
X